न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न
तारका रूखमोडे, प्रतिनिधी अर्जुनी/ मोर, जि. गोंदिया

न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न
तारका रूखमोडे, प्रतिनिधी
अर्जुनी/ मोर, जि. गोंदियाबिनधास्त न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : (दि २४ जुलै) तालुक्यातील न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स ज्युनियर कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर शाळेचे संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार, प्राचार्य सूरज मोटघरे,पर्यवेक्षिका तारका रुखमोडे, प्रतिक्षा राऊत, पुष्पाताई खोब्रागडे,छाया गायकवाड,गौतम साखरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली.प्रास्ताविकात सभा घेण्यामागचा उद्देश व पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी केलेलं नियोजन प्रा. रुखमोडे मॅडम यांनी पालकांसमोर मांडले. त्यानंतर संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. पुढे प्राचार्य सूरज मोटघरे यांनी शाळेची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच शिस्त, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी पालक-शिक्षक संघटनेची स्थापना करण्यात आली. तसेच पालकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या विविध शंका, सूचना आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. उपस्थित पालकांनी मांडलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा व पालक यांनी परस्पर सहकार्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे पालक आणि शाळा यांच्यातील विश्वास, संवाद आणि सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत झाली. सूत्रसंचालन प्रा. निकीता मानापुरे व आभार निकीता बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



