शिक्षक दिनाच्या औचित्याने प्री-प्रायमरी शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
पाया रचणारे हात उपेक्षित का?

शिक्षक दिनाच्या औचित्याने प्री-प्रायमरी शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
पाया रचणारे हात उपेक्षित का?
वानाडोंगरी, हिंगणा : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव, सत्कार आणि कौतुक केले जाते. मात्र, शिक्षणाच्या भव्य इमारतीचा सर्वात मजबूत पाया घालणाऱ्या प्री-प्रायमरी अर्थात पूर्व-प्राथमिक शिक्षकांकडे मात्र अद्यापही दुर्लक्षच होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
आईच्या पदराला धरून वाढलेले तीन-चार वर्षांचे चिमुकले पहिल्यांदा घराबाहेर पडून शाळेत येतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत भीती आणि अश्रू असतात. अशा वेळी त्यांना अक्षर-आकड्यांपेक्षा आधी गरज असते ती मायेची, सुरक्षिततेची आणि विश्वासाची. रडणाऱ्या मुलाला जवळ घेणे, त्याचे अश्रू पुसणे, जेवण भरवणे, स्वच्छतेची काळजी घेणे, खेळ-गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करणे, ही जबाबदारी प्री-प्रायमरी शिक्षक अत्यंत संयमाने पार पाडतात.
या वयातील शिक्षक केवळ अध्यापनाचे काम करत नाहीत, तर अनेकदा ते मुलांसाठी ‘दुसरी आई’ बनतात. मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया, त्याचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, शिस्त आणि सामाजिक वर्तनाची पहिली शिकवण याच टप्प्यावर आकार घेत असते. त्यामुळे पुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पूर्व-प्राथमिक शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
चकचकीत शाळांच्या मागे शिक्षकांचे अंधारमय वास्तव
आज शहरांपासून ग्रामीण व निमशहरी भागापर्यंत प्ले-ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या शाळांचे जाळे विस्तारले आहे. पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते; मात्र या संस्थांमध्ये काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना त्याच्या तुलनेत अत्यल्प वेतन मिळत असल्याची परिस्थिती आहे.
नोकरीची हमी नाही, निश्चित सेवाशर्ती नाहीत, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा किंवा पुरेशा रजा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक प्रश्नांना या शिक्षकांना सामोरे जावे लागते. दिवसभर चिमुकल्यांच्या गराड्यात राहून प्रत्येक मुलाकडे स्वतंत्र लक्ष देणे हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक काम असतानाही त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन त्यांच्या योगदानाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याची भावना या क्षेत्रातील शिक्षक व्यक्त करतात.
दुर्दैवाची बाब म्हणजे, काही ठिकाणी या शिक्षकांकडे ‘शिक्षक’ म्हणून नव्हे तर केवळ मुलांची देखभाल करणारे कर्मचारी म्हणून पाहिले जाते. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कारण मुलाला पहिल्यांदा पेन्सिल पकडायला शिकवणारा, पहिल्यांदा वर्गात उभे राहण्याचा आत्मविश्वास देणारा आणि शाळेची भीती दूर करणारा शिक्षक त्याच्या शैक्षणिक प्रवासातील पहिला शिल्पकार असतो.
शिक्षक दिनाचा खरा अर्थ काय?
शिक्षक दिनाच्या दिवशी मोठमोठी भाषणे, सत्कार आणि पुरस्कार होत असताना या मूक शिल्पकारांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाला औपचारिक शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग मानून या शिक्षकांसाठी निश्चित सेवाशर्ती, सन्मानजनक किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
पालकांनीही आपल्या मुलांच्या आयुष्यातील या पहिल्या शिक्षकांकडे केवळ ‘केअरटेकर’ म्हणून न पाहता शिक्षणाच्या पायाभरणीचे शिल्पकार म्हणून सन्मानाने पाहिले पाहिजे.
इमारतीचा कळस कितीही भव्य असला तरी तिचे अस्तित्व पायावरच टिकून असते. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या इमारतीचा पहिला आणि सर्वात नाजूक पाया घडवणाऱ्या प्री-प्रायमरी शिक्षकांना न्याय, सन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळाल्याशिवाय शिक्षक दिनाचा उत्सव खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही.
रोशन विनायक बनकर
वानाडोंगरी, हिंगणा, नागपूर



