‘तुझं हे अस्सल ‘गंधवेड’ मनाला भुरळ पाडणारे’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘तुझं हे अस्सल ‘गंधवेड’ मनाला भुरळ पाडणारे’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
तू येतेस अलवार पावलांनी, झाडाआडून हळूच डोकावून पाहते.. मला वाट पाहताना पाहून क्षणभर मोहरते, पण तू आल्याची चाहूल मला लागते ती तुझ्याजवळ असलेल्या सोनचाफ्याच्या ओंजळीने.. तो वेडावणारा गंध.. तू आल्याची वार्ता आधीच देतो मला. “आला छेडित वारा, दरवळ आसमंती उधळला, तू आल्याची चाहूल, गंध सांगून गेला..!” गंधवेडीच तू…. पावसाची पहिली सर जमिनीवर पडली की, आसमंत मृद्गंधाने वेडावतो. तो गंध हृदयकुपीत साठवून ठेवण्यासाठी तुझी धडपड चालते.. तुला तसे पाहून मन माझे वेडावते.. नि सहजच मनात येते..!
“धरणीस भेटायला सखा पाऊस आला.,
किती झाला आनंद.. गंध सांगून गेला..”!
प्रत्येक ऋतूत येणारी फुले निराळी, त्यांचे गंध निराळे, पण कुठलाही गंध असो क्षणात तू पारखतेस. श्रावणात कुठल्या घरी पारिजात फुललाय याची तुला दुरूनच चाहूल लागते अन् तो गंध श्वासात भरायला तुझी पावले वळवते.. नव्हे नव्हे तुझाही अगदी भ्रमर होतो. श्रावणसरीत डोलणारी रानफुले असोत की कृष्णकमळ असो.. तो दरवळ मनात साठवताना तुझी अगदी तंद्री लागते.
“गंध सांगून गेला, बघ फुललाय पारिजात,
आला आला तो भ्रमर, घाले पिंगा परसात..”!!
बकुळ, रातराणी, निशीगंध, सोनचाफा, मोगरा… अहाहा.. या फुलांच्या हृदयात देवानं कुठलं अत्तर भरले असेल? असं नेहमी तू विचारतेस. बघ ना हा बकुळ.. सुकला तरी गंधाचं दान देतच राहतो. रातराणी, निशीगंध यांनी तर जणू रात्रभर जागून गंधपेरणीचा वसाच घेतलाय. सोनचाफा तर कुठेही ठेवा.. ओढ लावतोच लावतो.. दिवसा झाडाला चांदणे लगडावे तसा हा मोगरा ग्रीष्माच्या उन्हातही शीतलतेची अनुभूती देतो.. किती सहज बोलता बोलता तू हे सांगतेस.. अन् तेव्हा मला वाटतं..!
“बकुळ, मोगरा, जाईजुई, चाफा की रातराणी,
गंध सांगून गेला, खोलली हृदयकुपी सुमनांनी..”!
तुझं हे अस्सल गंधवेड पाहून मलाही त्याची भुरळ पडते. मग घेऊन येतो मीही अंगणात लावायला फुलझाडे.. झेंडू, गुलाब, शेवंती.. हे तर केवळ परिमल पसरवतात असे नाही तर एक आगळंवेगळं टवटवीतपणही जपतात. होय.. तेच टवटवीतपण तूही जपलंय तुझ्या वागण्यात, बोलण्यात, हसण्यात अन् कामातही.. मग अचानक आठवतं.. खरंय गं..
कर्तृत्वाचाही गंध असतोच की..!
उगळिता चंदन, परिमळू लागला
कर्तृत्वाने भारणं, गंध सांगून गेला..!
सुख असो, दु:ख असो.. सहजे वागायला
विसरतो का अत्तर, कधी दरवळायला ?
अनेक असतात गंध.. ओढ लावणारे, कर्तृत्व सांगणारे, चाहूल देणारे, हृदयकुपीत राहणारे. पहिल्या पावसाचा, वसंतबहराचा, कस्तुरीचा, अत्तराचा.. आज असाच शब्दगंध पसरलेला. ‘मराठीचे शिलेदार’ समूहात गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेसाठी. रानफुलांमधून चालणारी तरूणी.. ती गंधवेडीच जणू. फुलांमधून चालताना गंधाचा एकेक पैलू समजावत पुढे जात आहे. अन् तो पाहून मन धुंद होत आहे. अगदी असेच वाटले चित्र पाहून.. मग एकेक कल्पनांनी फेर धरला नि शब्दगंध दरवळू लागला. आजच्या रचना वाचतानाही गंध बरेच काही सांगत होता.
ओघवतेपणाने विरह, प्रीत, प्रतीक्षा, कर्तृत्व.. कुणास हळवी आठवण कातर करून गेली. तर कुठे फुलेही बोलली. शब्दरूपात गंध सांगून गेला, बोलते झाला. असेच विविधांगी लिहित रहा. सूक्ष्म निरीक्षण व संवेदन यांचा मेळ होताच शब्दगंध पसरायला वेळ लागणार नाही. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. ७ मे २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या काव्यवाचन स्पर्धेतही आपण उत्साहाने सहभागी व्हाल अशी आशा करते. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका/ सहप्रशासक
©मराठीचे शिलेदार समूह



