“सख्यांगणातून सुरू झालेला प्रवास आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करते”; सविता पाटील ठाकरे
“सख्यांगणातून सुरू झालेला प्रवास आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करते”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
मी कधीपासून तिची चुळबूळ अनुभवत होती. स्टेशनच्या गर्दीत ती कुणालातरी शोधत होती, किंबहुना कुणाची तरी वाट पाहत होती. माझ्या नजरेतून तिचा कावरे बावरेपणा सुटत नव्हता. तिच्या हातात एक बॅग होती आणि चेहऱ्यावर प्रचंड दडपण. बहुतेक तिला कुठेतरी जायचं होतं. खूप वेळानंतर तो आला, तिने पटकन त्याचा हात घट्ट पकडला. ‘त्याला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या’. त्याने बॅग स्वतःच्या हातात घेतली तिचा हात पकडून ते दोघे स्टेशनच्या बाहेर जाऊ लागले. आता ती जरा निर्धास्त वाटत होती. मला असे वाटते. बहुतेक ती घरून पळून आली असावी व त्या दोघांचा लग्नाचा विचार असावा.
“सख्यांगणी जाण्याचा तिचा असा प्रवास जरी मनाची घालमेल करणारा असला तरी, तिच्या चेहऱ्यावरचे तो आल्यानंतर बदललेले भाव खूप काही सांगून गेले होते.” हल्ली असं आजूबाजूला अनुभवतोय आपण. प्रेम….एक अशी भावना ज्यात जात-पात,धर्म, पंथ साऱ्यांना तिलांजली देत केवळ त्या दोघांचंच विश्व असते आणि त्या विश्वात ‘विश्वास’ असतो आणि त्याच विश्वासाच्या बळावर संसाररुपी नौका पैलतिरी नेण्याचे धाडस दाखवणारे मात्र खूप कमी असतात. तिचा अन् तिच्यासारख्या कित्येकांचा सख्यांगणी पोहचण्याचा हा प्रवास म्हणजे विलक्षण वेध..!
ज्येष्ठ कवी ज्ञानेश वाकुडकर सर म्हणतात त्याप्रमाणे…
तुझी चाहूल घेऊन,आला पहाटचा वारा …
मला खुणावितो वेडा,तुझ्या गावाचा किनारा…
दूर राहिला किनारा,माझी चिखलात नाव…
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं ईवलसं गाव….
सख्याची सजनीसाठीची तळमळ म्हणजे प्रेम…पाण्यावर पसरलेल्या आगीसारखी… अत्यंत क्षणभंगूर भावना म्हणजे प्रेम…प्रेम म्हणजे उल्का… प्रेम म्हणजे पौर्णिमेचा अविष्कार….आणि त्याच प्रेमाच्या विश्वासावर सख्यांगणीचा तिचा प्रवास म्हणजे त्यागाचं दुसरं नाव. सख्यांगणीचा हा प्रवास जरी तिचा असला तरी, तो दोघांसाठीचा असतो. दोघांच्या हृदयाजवळचा हा विषय असतो. कधी यावर खूप बोलायचं असतं तर, कधी कुणालाच काही सांगायचं नसतं. सारं हृदयात साठवायचं असतं, जपून ठेवायचं असतं. मनाच्या गाभाऱ्यात त्याला कधीतरी प्रज्वलित ही करायचं असतं.
मराठी सारस्वत दादा ताई “मराठीचे शिलेदार” समुहाच्या माध्यमातून आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने समुहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘सख्यांंगणी’ हा आगळावेगळा विषय दिला. सर्व कवी कवयित्रींनी या विषयाला अधिक रोमांचित बनवले हे मी परीक्षणार्थ रचना वाचताना अनुभवले. ‘सख्यांगणी’ तिने ठेवलेलं ते पहिलं पाऊल आणि तिथपासून सुरू झालेला तिचा प्रवास. ऊन, वारा, सुख, दुःख, सारंच झेलणारी ती …अख्या आयुष्यात कर्म ते मर्म ती तिथेच अनुभवते. सर्वांना ती घरात सामावून घेते तर कधी कधी तिला त्या उंबरठ्याला कायम सोडण्याची ही वेळ तिच्यावर येते. तिचा तो शेवटचा प्रवास कधी त्याच्या सोबत असतो तर, कधी तो आधीच साथ सोडून निघून गेलेला असतो. तरीही ती तो प्रवास त्याच अंगणातून सुरू करते व एक वर्तुळ पूर्ण करते.
सख्याचं अंगण फुलवायचं, बहरवायचं,प्रफुल्लित ठेवायचं. सारं काही ती पार पाडते आणि एक दिवस सारे सोडून त्याच सख्यांगणातून निरोप घेते तोही कायमचा. रसिक मंडळी हो, असा नाजूक विषय काव्यातून फुलवतांना आज आपण खूप छान व्यक्त झालात. सत्य आणि कल्पीत यांच्यात सुंदर समतोल साधला व सर्वांनाच अंतःर्बाह्य व्यापून टाकले.तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह