मणिपुरी लोकांचे प्रिय “ओजाशंकर ” भय्याजी काणे सर
लेखिका - अमृता खाकुर्डीकर

मणिपुरी लोकांचे प्रिय “ओजाशंकर ” भय्याजी काणे सर
ईशान्येचे घडवले भविष्य…ध्यासपर्व झाले सारे आयुष
“भैय्याजी काणे” जन्मशताब्दी समारोप विशेष लेख…
लेखिका – अमृता खाकुर्डीकर
नयनमनोहर निसर्गसौंदर्याने नटलेला रम्य ईशान्य भारत म्हणजे सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा प्रदेश. परंतु दुर्दैवाने तिकडचे ईम्फाळ, त्रिपुरा, मणिपूर ही नावे नेहमी दंगली, जाळपोळ, दहशतवाद यासाठीच कानावर पडतात. भारताचा फार मोठ्या लांबीचा सीमावर्ती भाग ईशान्येला लागून असल्याने सीमेपलीकडून होणारी शत्रुदेशाची सततची घुसखोरी या प्रदेशाला सारखं धगधगत ठेवते. ही समस्याग्रस्त स्थिती स्थानिकांचे जगणे सदैव अस्वस्थ करणारी आहे . पण… हिच अस्वस्थता दूर करण्यासाठी साधारण पन्नास वर्षापूर्वी हाती ज्ञानदीप घेऊन इथे एक देवदूत अवतरला आणि थोड्याच दिवसात मणिपूरींना एका शिक्षकाच्या रूपात आपला प्रिय ओजाशंकर मिळाला.
“ओजा” म्हणजे मणिपुरी भाषेत ‘पूजनीय गुरू’ आणि शंकर म्हणजे अर्थात भय्याजी, अर्थात शंकर दिनकर काणे. या प्रिय “ओजाशंकराच्या” जन्मशताब्दी निमित्त पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या वतीने पुणे, मुंबई, सांगली, नाशिक, मणिपूरसह अनेक शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले. आणि आता या शताब्दीचा भावपूर्ण समारोप पुण्यात समारंभपूर्वक मान्यवरांच्या उपस्थितीत बी एम सी सी काॅलेजच्या टाटा सभागृहात नुकताच साजरा करण्यात आला.
मूर्तीमंत त्यागमय समर्पित अशा भय्याजीं काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षामुळे त्यांचे कार्य पुन्हा एकदा ठळकपणे सर्वांसमोर आले आहे. मणिपूर व परिसरात घडून आलेले सामाजिक परिवर्तन हे भय्याजींच्या दूरदृष्टीचे साक्षात रूप आहे. या असामान्य कार्यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या वतीने एका लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून हिंदी व मराठी भाषेतील या लघुपटात ईशान्येची सामाजिक वास्तव स्थिती मांडताना तिथे आज दृष्टीस पडणा-या राष्ट्रीय एकात्मतेचे चित्र स्पष्ट दिसते.
पूर्वोत्तरी अष्टप्रदेशांचा हा भूभाग डोंगर द-यांनी वेढलेला. अरूंद रस्ते, अपूरी साधने, गरीबी आणि अज्ञान , विकासाचा अभाव यामुळे इथल्या स्थानिकांचे दैनंदिन जीवन खडतर. ही सर्व स्थिती जवळून बघितल्यावर भय्याजींनी या बिकट स्थितीत सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हेच माध्यम योग्य असल्याचे ठरवून इथे शाळांची स्थापना केली. सुरवातीला एका छोट्या खोलीत प्राथमिक शालेय शिक्षणाचा हा पाया रचताना भय्याजींना खात्री होती, शिक्षण हाच पर्याय या लोकांच्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल. भविष्यात त्यांचा हा तर्क कमालीचा खरा ठरला. या कामासाठी भय्याजींचे ईशान्येला येणे, हा ईश्वरी संकेत असावा. ईशान्येचा विकास, हाच त्यांचा जीवनध्यास होऊन बसला. आजवर या प्रदेशाला फक्त दुःख-वेदनाच सहन कराव्या लागल्या होत्या. पण आपल्या पूर्वोत्तरी देश बांधवांचे दुःखाश्रू पुसण्याचे व्रत घेऊन भय्याजी कंबर कसून या कामात उतरले, आणि कमालीचे यशस्वी झाले. अर्थात हे काम सोपे नव्हते.
सुरवातीला ईशान्य भारतात इम्फाळ मधल्या एका पंजाबी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रूजू झालेल्या भैय्याजींना कोकणातल्या दुर्गम भागात कामाचा अनुभव होताच; पण इथे एक गोष्ट मात्र अगदीच वेगळी होती. एकेकाळचा तापदायक कट्टर शत्रुदेश चीन आणि त्याच्या जोडीला म्यानमार यांच्या सीमा या प्रदेशाला अगदी लागून होत्या. त्यामुळे सहजतेने होणारी घुसखोरी आणि तिकडून होणारा अंमली पदार्थाचा अवैध व्यापार, तसेच बेकायदा शस्त्रवाहतुक अशा भयंकर गुन्हेगारीत स्थानिक तरूण खोलवर आडकले होते.
आजही अफूच्या शेतीशिवाय दुसरे कोणतेही नीटसे उत्पन्न तिथल्या गोरगरीबांना नाही. बांधकाम कंत्राटदार आणि बढ्या जमिनदारांची मुजोरी , बेरोजगारी, विकासाचा अभाव आणि अरूंद घाटदार धोकादायक रस्ते अशी सगळीच स्थिती विपरीत. यातून बाहेर येण्यासाठी तिथल्या लोकांनी आपली मुले शाळेत पाठवावी, याकरिता अत्यंत चिकाटीने प्रयत्न करावे लागले. घरोघर जाऊन विद्यार्थी गोळा करणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधणे अतिशय कठीण होते. अनोळखी भाषा, भिन्न खाणेपिणे, अनोखी संस्कृती, नवख्या लोकांना सहजपणे न स्वीकारणारा स्थानिकांचा स्वभाव या संपूर्ण प्रतिकूल स्थितीशी समरस होण्यासाठी भय्याजी या लोकांमधलेच एक होऊन राहिले. प्रेमळ बोलणे, प्रामाणिक वागणे आणि तळमळीने शिकवणे या त्यांच्या गुणांमुळे हळूहळू आपुलकीचा धागा गुंफला गेला. दरी कमी झाली. तरीही.. काही स्थानिक विरोधकांनी या कार्यात खूप आडथळे आणले. कित्येकदा तर जीवावरही बेतले. असा विरोध, राग, द्वेश, उपेक्षा, इत्यादी आडथळ्यांना पार करता करता कालांतराने अंतिम ध्येय साध्य झाले. एका छोट्याशा खोलीत लावलेले शाळेचे ईवलेसे रोपटे आज “ओजाशंकर” विद्यालयाच्या वास्तूरूपात एक विशाल वटवृक्ष होऊन डवरले… बहरले! त्या छायेत अनेक विद्यार्थी शिकून धन्य झाले.
सातत्याने घेतलेल्या मेहनतीने मणिपूरच्या ईम्फाळ परिसरात अपेक्षित शैक्षणिक कार्य विस्तारत गेले. कल्पनेतल्या शाळा, प्रत्यक्ष दिमाखदार ईमारतींच्या रूपात ऊभ्या राहिल्या. इम्फाळ पासून साधारण 150 कि.मी. अंतरावर छोट्या वाडी-वस्तीवर काही शाळा सुरू झाल्या. परिसरात शालेय मुलांची किलबिल वाढली. 10 वी पास मुलांच्या अनेक बॅचेस बाहेर पडल्या. यानंतर 10वीच्या पुढच्या शिक्षणाची सोय होणे गरजेचे होते. म्हणून विविध शहरांमध्ये विद्यार्थी वसतिगृहे बांधण्यासाठी भैय्याजींनी पुन्हा कंबर कसली. कष्टाला यश आले. वसतिगृहे सुरू झाली. सध्या आठ शहरात अशी वसतिगृहे सुरू असून ही संख्या वाढवण्याचे प्रयत्न आहेत . या शाळांमधून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्य, कला व क्रीडा याचेही प्रशिक्षण मिळावे, असे नियोजन विचारपूर्वक आखण्यात आले.
हाती घेतलेले काम तडीस नेण्याची पक्की शिकवण बालपणीच भय्याजीना वडिलांकडून मिळाली होती. त्यांचे वडील नाशिकला शिक्षक होते. भय्याजींचा जन्म नाशिकचाच. दि.६ डिसेंबर १९२४ हा त्यांचा जन्मदिवस. ते मूळचे कोकणातले.
नाशिक,पुणे, बेळगाव असे त्यांचे शिक्षण झाले. १९४० ला मॅट्रिक झाल्यानंतर १९४१ साली ते पुण्यात आले. एस. पी. कॉलेजला इंटर आर्टसला प्रवेश घेऊन १९४२ ला संस्कृत विषयात पदवीधर झाले. लगेचच ‘इंडियन एअर फोर्स’ मध्ये ग्राऊंड इंजिनिंरिंग कोअर शाखेत त्यांना नोकरीही मिळाली. या नोकरीनिमित्त लाहोर, कोलकाता, सिकंदराबाद अशा विविध राज्यातील शहरांमध्ये भ्रमंती करताना परकी भाषा, जीवन संस्कृती यातून ते अनुभव समृध्द होत गेले. घरापासून दूर राहण्याचीही सवय झाली. पण लवकरच त्यांनी ही नोकरी सोडून दिली. कारण त्यांना मनापासून फक्त शिक्षकच व्हायचे होते. त्यांचा आवडत्या शिक्षकी पेशाचा प्रवास चिपळूण, कर्नाटक, छत्तीसगड या दुर्गम भागातून अखेरी ईशान्येस अधिकच दुर्गम भागात येऊन पोहचला.
विद्यार्थीप्रिय शिक्षक असे उपाधी लाभलेले भय्याजीं. ज्ञानाचा दिवा तेवता ठेवण्यासाठी नियतीनेच त्यांना ईशान्येला आणून ठेवले असावे. भारताचा हा पूर्वोत्तर कोपरा स्वातंत्र्यानंतर देशापासून काहीसा तुटून वेगळा पडल्यासारखा झाला होता. या तुटल्या धाग्याला उर्वरीत भारताशी जोडण्याचे राष्ट्रीय काम भय्याजींनी प्राणपणाने पार पाडले. चीन म्यानमारच्या प्रभावाखाली असलेले लोक जिथे स्वतःला भारताचा भागही मानत नव्हते, तिथे आज भारतीय नागरिक म्हणवून घेण्यात त्यांना अभिमान वाटतो. जिथे 15 ऑगस्ट कधीच साजरा होत नव्हता, तिथे आज शाळांमध्ये गौरवाने तिरंगा फडकवला जातो. विद्यार्थ्यांसह पालक स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. जिथे एकेकाळी मणिपूरला एक एक विद्यार्थी गोळा करून भय्याजींनी शाळा चालवली , तिथे आज स्वतःहून आदिवासी जनजातीचे लोक आपल्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी धडपडतात. सर्वात मोठा शिक्षणाचा लक्षणीय फायदा म्हणजे इथल्या शाळेत शिकून जे विद्यार्थी बाहेर पडतात, ते व्यसनांपासून दूर आहेत. शिकून नोकरी करतात. शस्त्रांच्या अवैध व्यापाराच्या विळख्यातून मुक्त झाले आहेत. यापेक्षा संपूर्ण सकारात्मक परिवर्तन वेगळे काय असू शकेल?
अनेक शाळांच्या भिंतीवर आपण एक वचन वाचतो, “ज्ञानाचा दिवा , जगी लावा.. अज्ञानाचा अंधार दूर ठेवा”, हे वचन फक्त भिंतीवर न राहता भय्याजींनी ते मणिपूरींच्या भाळावर लिहिले. एखादे ध्येयस्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणून परिवर्तनाचा चमत्कार घडवता येतो, हा विश्वास भय्यजींच्या या कार्याने समोर साक्षात ऊभा आहे. राष्ट्र हिताच्या भावनेला असामान्य कार्याचे कोंदण घालून हि-यासारखे चमकदार करण्याची किमया करणारा भैय्याजी काणे नावाचा हा कोणी जादूगार नव्हे; तर एक सच्चा देशभक्त आणि हाडाचा शिक्षक होता. मनात पक्क्या केलेल्या एका ध्येयाला संपूर्ण वाहून घेतलेले असे समर्पित व्यक्तीमत्त्वं पुढच्या पिढीसाठी एक तेजस्वी प्रेरणास्रोत आहे. म्हणूनच आज “पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या”कार्यात शेकडो तरूण-तरूणींनी स्वतःला झोकून दिले.
भय्याजींचे परम शिष्य , तितकेच ध्येयवादी, जिद्दी आणि तसेच प्रेमळ, आदरणीय जयवंत कोंडविलकर हे प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह म्हणून धडाडीने काम करतात.
कोकणच्या छोट्या खेड्यातून वयाच्या 11 व्या वर्षी भय्याजींसोबत ईशान्य भारतात आले. तिथेच शिकून तिथेच शिक्षकही झाले. शाळा स्थापनेच्या कामात संपूर्ण जीवन समर्पित करणारा असा छोटा मुलगा ईतिहासात दुसरा नसेल. आज त्यांच्या कुशल मार्गदर्शनात ईशान्य भारताचे अश्रू पुसण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे. हे यश अधिक वृध्दींगत होण्यासाठी भैय्याजीं काणे जन्मशताब्दी निमित्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मणिपूरसह ईशान्य भारतात 100 शाळा बांधण्याचा संकल्प सोडला आहे. आजपर्यंत या उदात्त कार्याला जनतेतून जसा प्रतिसाद मिळला, तसाच जनता जनर्दनाच्या आशीर्वादाने हा संकल्पही निश्चित पूर्ण होईल!
त्यागमय व्हावे जीवन..समर्पित व्हावेत प्राण
卐भैय्याजींच्या पुण्यस्मृतीस शत शत प्रणाम卐
अमृता अरूण खाकुर्डीकर
amruta.khakurdikar@gmail.com
पूर्व सीमा प्रतिष्ठान, कार्यकारिणी सदस्य, पुणे.





