“माझ्या वैभवशाली महाराष्ट्राला मर्यादित शब्दात बांधणे अशक्य”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
“माझ्या वैभवशाली महाराष्ट्राला मर्यादित शब्दात बांधणे अशक्य”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
होय… वैभवशालीच आहे माझी जन्मभूमी. पांझरा नदीचा सुजलाम सुफलाम किनारा. कधीही न आटणारी मोक्षगंगा. शेतीमध्ये संपन्नता, राजकारणात गावाचा दरारा, जाती-धर्माची एकजूट, आई भवानीचे सुंदर मंदिर, काय नाही तिथे? ‘आईच्या सुसंस्कारांसोबत वडिलांच्या ज्ञानदानाचा समृद्ध वारसा. या सर्व गोष्टींचा मला मनस्वी अभिमान आहे’.
माझी जन्मभूमी, ज्या धुळे जिल्ह्यात आहे; त्यात त्याच्या वैभवशाली परंपरेला काय पाहणं? चंदीगड पाठोपाठचे हे रेखीव शहर. लळिंगचा समृद्ध किल्ला, अहिराणीचं माहेरघर, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची योजना केल्याचा वैभवशाली इतिहास. संपूर्ण जिल्ह्यात पांझरा नदीवरची फडसिंचन पद्धती,राजवाडे, संशोधन मंदिर व नानासाहेब शंकरराव देव यांसारख्या महान हस्तींचा येथे वावर. महात्मा गांधींनी ‘हरिजन सेवक’ संघाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली होती, ते ‘काकासाहेब बर्वे’ असोत की ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार दोघेही धुळ्याचेच. धुळे जिल्हा ज्या भूमीत वसलेला आहे तो माझा ‘महाराष्ट्र वैभवशाली’ आहे. म्हणून तर आपण गौरवाने म्हणतो..
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा….” काय नाही हो माझ्या या महाराष्ट्र भूमीत? छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने व आऊसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने तर, संभाजी महाराजांच्या पराक्रमानं ही वैभवशाली भूमी संपन्न झालेली आहे. हिमालयाच्या मदतीला नेहमीच धावून जाणारा सह्याद्रीही इथेच आहे. गणरायाच्या उपासनेची प्राचीन परंपरा आहे. स्वच्छ सुंदर सागर किनारपट्टी आहे.
‘बहु असोत सुंदर संपन्न हा महाराष्ट्र आहे.’
गड किल्ल्यांची अभेद्य तटबंदी आहे, आधी कळस मग पाया या धर्तीवर साकारलेलं कैलास लेणं आहे, तर अकराशे वर्षांपूर्वीच्या चित्राने सजलेला अजंठा ही येथेच आहे. ताडोबात वाघांचा वावर आहे, तर ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ जगप्रसिद्ध आहे. पंढरीची वारी हे आमचं सांस्कृतिक ऐश्वर्य आहे तर दीक्षाभूमीतले बाबासाहेबांचे वास्तव्य साऱ्या जगासाठी आदर्श आहे. माझ्या वैभवशाली महाराष्ट्राला मर्यादित शब्दात बांधणे, केवळ अशक्य आहे आणि माझा महाराष्ट्र ज्या भारत भूमीत आहे त्या भारतभूमीचं वर्णन तर अंतराळवीर राकेश शर्मांनी केलेलेच आहे. “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा..”.
अशा या सर्व वैभवशाली परंपरांना आज आठवण करण्याची वेळ आली ती म्हणजे, ‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने. समूहाचे सर्वेसर्वा आ.राहुल सरांनी ‘वैभवशाली’ हा विषय दिला आणि सर्व कवी कवयित्रींनी विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आजच्या परीक्षणार्थ रचना वाचल्यावर मी एकच सांगेन, की ‘काही विषय असे असतात त्यांना कवेत घेणं खरंच कठीण असतं’. आजचा विषय अगदी तसाच या विषयाची व्याप्ती समुद्राएवढी मोठी आहे. तरी असता.. आपण सर्व कवी कवयित्रींनी विषयाला न्याय देत आपापल्या परीने सुंदर रचना साकारल्यात. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह





