“मूळ ते पान, अखंड देहदान करणारे, वृक्षच खरे महान”;विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“मूळ ते पान, अखंड देहदान करणारे, वृक्षच खरे महान”;विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
मानवाला अनेक अद्भूत कलांचे वरदान देणारा निसर्ग स्वतः किती अवलिया कलाकार आहे याची कल्पनाही करवत नाही. किंबहुना मानवी कल्पनेबाहेरचा कलाविष्कार निसर्ग दाखवत असतो. निसर्गात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीवाला काही ना काही देत असते. अशा अनेक गोष्टींपैकी वृक्ष ही एक अशी गोष्ट आहे की, जी मानवाला जनन ते मरण कोणत्या ना कोणत्या रूपात सतत उपयोगी पडत असते. निसर्गात हजारो जातीचे वृक्ष वल्ली वनस्पती आहेत. ज्याचा प्रत्येक जीवाशी काही ना काही संबंध येतो.
फूल, फळ, रस, रंग, गंध, लाकूड, औषधी, थोडक्यात मूळ ते पान हर अवयव इतर सजीवांना दान देत अखंड सेवाकार्य बजावणारे वृक्षमंडळी स्वतः समर्पित भावनेने जगत असतात. मानवाला तर जन्माला आला की पाळणा, पलंग, खुर्ची, टेबल, पाट, कपाट, खिडक्या, दरवाजे, देव्हारे, नाना खेळणी, सरपण आणि शेवटी सरणापर्यंत साथ देणारे लाकूड वृक्षच देत असतात. अनेक रोगांवर रामबाण औषधी वृक्षच देत असतात.आणि माणूस मात्र हातात कुर्हाड घेऊन त्याच्या मुळावर घाव घालायला तयार असतो. तशा वेळी सुद्धा त्याच्या डोक्यावर वृक्ष गार सावली धरत असतात. तर घाव घालणाऱ्या हाताना फळे देत असतात.
शेकडो वर्षे वयोमान असलेले महाकाय वृक्ष म्हणजे अनेक पक्षांचे निवासस्थान असते. अनेक पिढ्या स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवत असतात. शेवटी ज्याचा उदय त्याचा अस्त निश्चित. याच नैसर्गिक नियमानुसार वृक्षही अखंड देहदानाचा वसा जपत जपतच कालबाह्य होतात. काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरीता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र खूप काही सांगून जाते. वरकरनी एका महाकाय वृक्षाचा जीर्ण बुंधा दिसत असला तरी त्यातून अनेक भावना व्यक्त होतात. वयोमान सरले, पर्णबहार गळले, खंबीर मुळे कमजोर झाली, आणि श्वासाची दोरीही तुटली. ओलावा आटला, आणि मागे उरला एक जीर्ण बोडखा सांगाडा, उभे आयुष्य ज्या पक्षांचे संसार सांभाळले, ते पक्षीही आता पांगले, मात्र मनात आणि नसानसात त्यांनीच इतक घर केलेले की, शेवटच्या क्षणी त्या आठवातच जीव निमाला. आणि उरल्या सुरल्या ओंडका रूपी देहाने त्या पाखरांचेच रूप घेतले. ज्यांना ह्रदयात जागा दिली. त्यांना विसरू तरी कसे? असेच तर सांगत असेल ना तो?
चित्र समूहात येताक्षणीच रचनांचा ओघ सुरू झाला. निर्धारित वेळेत अनेक कल्पनाविष्कारांचे अद्भूत दर्शन घडवणारे हायकू वाचायला मिळाले. शेवटी स्पर्धा म्हंटले की नियमांचे बंधन आलेच.. ज्यांच्या रचना सर्वोत्तम यादीत नसतात त्या रचना सुमार असतात असा अर्थ अजिबात होत नाही. त्यामुळे सर्वांनी मन लावून लिहिते व्हावे. लेखणी प्रवाहित असणे आवश्यक आहे. समूह सर्वांनाच योग्य न्याय देत राहील.
विष्णू संकपाळ बजाजनगर. छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





