“दूध का दूध पाणी का पाणी, न्यायव्यवस्था हवी निष्पक्षपाती”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“दूध का दूध पाणी का पाणी, न्यायव्यवस्था हवी निष्पक्षपाती”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला सजा होता कामा नये. अशा प्रकारच्या तत्त्वप्रणालीने काम करणार्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी, एका हातात तराजू आणि दुसर्या हातात तलवार असे चित्र पूर्वी होते. काळी पट्टी हे निष्पषपातीपणाचे प्रतिक होते. यामुळे न्याय करताना गुन्हेगाराची जात, धर्म, पंथ,पत, प्रतिष्ठा, गरिब, श्रीमंत असा भेदाभेद न करता समन्यायी दृष्टीने हर गुन्हेगाराकडे त्रयस्थ दृष्टीने पाहिले जावे. आणि “सुजनस्य पूजा दुर्जनस्य दंडम्” असा न्याय निवाडा व्हावा. हीच अपेक्षा होती.
कधीकाळी राष्ट्रहितासाठी फासावर चढलेले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कुठे..? आणि न्यायदेवतेचीच दिशाभूल करत राष्ट्रद्रोह करणारे आजकालचे गुन्हेगार राजकारणी कुठे..? आज गुन्हेगारीचे उदात्तीकरण राजरोसपणे होत आहे. गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेले चक्क निवडणुका जिंकून लोकसभा, विधानसभचे प्रतिनिधीत्व करताहेत. याहून मोठे दुर्भाग्य लोकशाहीचे नाहीच..!
मात्र गेल्या काही दिवसापूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवून एका हातात तराजू आणि दुसर्या हातात तलवारीच्या जागी संविधान दिले आहे. अशा स्वरूपाचा बदल नव्या दृष्टीकोनाचे द्योतक समजायला हरकत नाही. कारण एकेकाळी “अंधा कानून” अशीच बनलेली प्रतिमा बदलवण्याचा हा प्रयत्न असावा. काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरीता आ. राहूल दादांनी दिलेले चित्र म्हणूनच खूप बोलके आहे. न्यायाचा तराजू समतोल राहण्यासाठी काही हात झटलेले दिसताहेत. जे आदर्श न्यायप्रणालीचे प्रतिक वाटतात.
तरीही एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात कायदेशीर कलमांचा काथ्याकूट करताना आरोपीची, साक्षीदारांची, पुराव्यांची, वकिली युक्तीवादातून अशी काही चिरफाड होते की कधी अनुकुल तर कधी प्रतिकूल न्याय जाहीर होतो. गुन्हेगार मातब्बर असेल तर तथाकथित कायदेतज्ज्ञ कायद्यातीलच पळवाटा शोधून अशा गुन्हेगारांना सहिसलामत बाहेर काढतात. असे प्रकार होणे निंदनीय आहे. कायदा हा समन्यायी असावा आणि “दूध का दूध पाणी का पाणी” करणारा असावा. याच पार्श्वभूमीवर आलेल्या रचना सुद्धा खूप मार्मिक भाष्य करणार्या आहेत. अनेकांचा प्रयत्न भावला. हायकू काव्यात असे क्षण पकडणे आणि परिणामकारक कलाटणी देत हायकू साकारणे कठिण असले तरी अशक्य नाही. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहूल दादां आणि टिमचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह