नागपूरकर अभिनेत्री ‘प्रणाली’ची मोठ्या पडद्यावर गरूडझेप
मुख्य संपादक:राहुल पाटील, नागपूर
नागपूरकर अभिनेत्री ‘प्रणाली’ची मोठ्या पडद्यावर गरूडझेप
रंगकर्मी, छोटा पडदा ते सिनेअभिनेत्री संघर्षमय ‘नाट्यप्रवास’
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कलावंताची वाणवा कधी नव्हतीच. परंतु नागपूरकर रंगकर्मींना व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट सृष्टीत हवा तसा ‘भाव’ दिल्या जात नव्हता, हे ही सत्य नाकारता येत नाही. यापूर्वीही अनेक नागपूरकर कलावंतानी चित्रपट क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याची नोंद आहे. परंतु, यशाची पायरी आजतागायत सर्वांनाच चढता आली असेल हे सांगता येणे शक्य नाही. यश सहजरित्या पदरात पडत नसते, हे ही तितकेच सत्य आहे. ज्या कलावंतामध्ये सातत्य, जिद्द व चिकाटी असेल ते संघर्ष करीत आपले ध्येय नक्कीच गाठतात. अशाच संघर्षमय वाटचालीचा एक ‘नाट्यप्रवास’ नागपूरच्या प्रतिभावंत रंगकर्मी, अभिनेत्री ‘प्रणाली राऊत’ हीने मोठ्या पडद्यावर घेतलेल्या गरूडझेपेने पूर्ण केला आहे.
गतसालीच आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ प्राप्त झाला. आणि गतकाळातील आठवणी स्मृतीपटलावर आल्यात. मराठी चित्रपटसृष्टीत ऐंशीच्या दशकात ‘लेक चाचली सासरला’ हे रडूबाईचे कथानक काय आले नि मराठी चित्रपटसृष्टीला जणू सुपरहिट कथानकाचा फॉर्म्युलाच सापडला. धडाधड सुनेवर होणार्या अत्याचाराच्या सुरस कथा खरडून खरडून हजारो कागद-पेन झिजले, परंतु कथा-पटकथाकारांचे हात काही झिजले नाहीत. दरम्यानच्या काळात काही पुळचट कॉमेडी चित्रपटांमुळे का होईना मराठी चित्रपटसृष्टीने तग धरला. परंतु एकच फॉर्म्युला किती दिवस प्रेक्षकांच्या माथी मारायचा, याचा विसर निर्माते दिग्दर्शकांना पडत गेला. नावान्याची वाणवा असल्याने प्रेक्षकांनीही पुरती पाठ फिरवली. हाच धागा पकडून नव्या दमाच्या लेखक, दिग्दर्शकांनी मराठी प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण कथा चित्रपटाच्या निमित्ताने देण्याचे ठरविले आणि ‘रायबा ईमानदार’ सारखा चित्रपट तयार झाला. निर्माता आणि लेखक म्हणून चित्रपट उभा करणाऱ्या ‘सचिन घोडे’ या नव्या दमाच्या तरुण मुलाचे कौतुक करावे लागेल. सोबतच त्याच्या संपूर्ण टीमच्या जिद्दीला व मेहनतीला तसेच विश्वासाला नक्कीच मराठी माणसाचा व नागपूरकर प्रेक्षकांचा आशीर्वाद लाभणार आहे.
नागपुरात ‘रायबा ईमानदार’ या चित्रपटाला दोन दिवस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होताच. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र ‘हाउसफुल्ल’चा बोर्ड लावावा लागला. मराठी चित्रपटाला ‘रायबा ईमानदार’ या चित्रपटाने एक हाऊसफुलचा सुवर्णक्षण दाखवला असं म्हणायला काही हरकत नाही. रायबा ईमानदार या चित्रपटात एका सामान्य कार्यकर्त्याचं जीवन कसं असतं, गावातील त्याचं जगणं, घरातील त्याचा कुटुंबाला सांभाळण्याचा आणि समाजासाठी स्वतः जवळील असलं नसलं सगळं खर्चून जगण्यातला संघर्ष लेखकाने छान मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे संजय खापरे, दीपक शिर्के सारखे दोन चेहरे मुंबईचे घेऊन व स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन हा चित्रपट तयार झाला आहे. सगळ्याच कलावंतांची भूमिका अप्रतिम झाली, परंतु यातील ‘प्रणाली’ने सर्वतोपरी चित्रपटात अभिनेत्री म्हणून तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तिच्या तोंडी असलेल्या प्रमाण भाषेतील आणि वैदर्भीय बोलीभाषेतील संवादामुळे प्रेक्षक अत्यंत भाऊक होऊन चित्रपट बघताना समरस झाले. हेच कलावंत म्हणून एका कलाकाराचं यश असतं. या चित्रपटाचे विशेष म्हणजे, प्रणालीचा अत्यंत साधा, सुंदर सोज्वळ लुक प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो.
संपूर्ण चित्रपटात प्रणालीची साधी वेणी आणि साध्या ‘सिंपल’ साडीत प्रणालीचे सावळे रूप अजूनच खुलून दिसते. तिचे बोलके डोळे चंदेरी पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ घालतात. आणि कुठेही स्वतःला एक्सपोज न करता, कुठलेही थोडे थोडके कपडे न घालता किंवा अंगप्रदर्शन न करता ती अभिनेत्री होते. केवळ स्वतःच्या अभिनयाच्या बळावर. चित्रपटातील गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. त्यातील लावणीही अप्रतिम झाली आहे. अभिनेत्री प्रणाली आणि अभिनेता संजय खापरे म्हणजेच, रायबा आणि कुसुमचे प्रेमगीत कोणतेही नृत्य न करता फक्त हावभावाच्या भरवशावर हिट झाल्याची पावती चित्रपट बघून बाहेर पडलेल्या नागपूरकर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रीया देतांना दिली.
मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हेच खरे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. स्व.दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज ख-या अर्थाने अंकुरले आहे. मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी असून, छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंत आपले अप्रतिम योगदान देत आहेत. केवळ कलावंतच नाही, तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हायला हवा, कौतुकाची थाप पडायला हवी, म्हणजे नव्या उमेदीने आणखी दर्जेदार मराठी चित्रपटाची निर्मिती होईल.
राहुल पाटील, नागपूर
marathicheshiledar6678@gmail.com



