चिंचा बोरांना बहार..अन् झोंबता वारा’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय आम्ही बालकवी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘चिंचा बोरांना बहार..अन् झोंबता वारा’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय आम्ही बालकवी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
काय म्हणालात, चिंचा आणि बोरे? ऐकून तोंडाला पाणी सुटले ना. काटेरी बोरीच्या झाडावर लटकलेली लाल पिवळी गाभूळलेली बोरे आणि बोरे सापडत फिरणारा बाल चमू. मध्येच आढळणारे एखादे चिंचाचे झाड.. त्यावर लकडलेले चिंचांचे आकडे.. हळूच डोकावणारी गाभुळलेली चिंच, चिंचा काढण्यासाठी झाडावर चढणे, मला एक दे ना, मला एक दे ना असे मित्रांचे खालून ओरडणे.. काय ते रम्य बालपण! काय त्या जुन्या आठवणी!चिंचा -बोरे खात खात झोंबणारा थंडगार वारा घेत घेत रानी वनी भटकताना येणारी मज्जा ती काय ? त्या आनंदाचे मोल कुठे?
थंडीचे दिवस आले की, चिंचा बोरी ,सीताफळे, करवंदे या रानमेव्याला बहार येते. मग थंडी, वारा याचा विचार न करता लहान चिमुकले रानावनात हिंडत राहतात. मग या थंड वाऱ्यांमुळे सर्दी झाली काय ?खोकला आला काय? नाक भरून वाहू लागले काय? याचा विचार कोणी करत नाही. तसेच शर्टच्या भाईला नाक पुसत पुसत मुले रानावनात हिंडताना आढळतात. त्यात त्या थंड वाऱ्याची मजाच न्यारी. वाऱ्याप्रमाणे मुलेही बेभान होऊन हिंडतात. वेगवेगळे खेळ खेळतात. रानी वनी रमतात, फुलतात ,बहरतात , मस्त मज्जा करतात.
आता म्हणाल कुठे हे स्वातंत्र्य ?कुठे हिंडतात मुले? आजकालची मुले तर मोबाईल, कॉम्प्युटर , व्हिडिओ गेम याच्या शिवाय दुसरे काही करतच नाहीत.आज काल मुलांची अतिशय प्रमाणात काळजी घेतली जाते. मुलांना परावलंबी बनवण्याचे काम पालकच करतात. रानावनात हिंडल्याने ,थंड हवा लागल्याने मुले दणकट ,राकट बनतात. शुद्ध हवेमुळे आरोग्य सुधारते. पण आज कालच्या मुलांच्या नशिबात ते कुठे? चार भिंतीच्या आत काय समजणार तो झोंबणारा वारा आणि कसला तो रानमेवा.
शहरात जरी राहत असू तरी आवर्जून आपल्या मुलांना आठवड्यातून, पंधरा दिवसातून एक दिवस खेड्यामध्ये घेऊन जा. तिथल्या लोकांचा संपर्क येऊ द्या ,जीवन काय असते हे त्यांना कळू द्या. शेतकऱ्यांचे कष्ट त्यांना पाहू द्या. ताजा ताजा रानमेवा त्यांना चाखू द्या. अंगाला झोंबणाऱ्या थंडगार वाऱ्याची मज्जा त्यांना घेऊ द्या. येईल नाकाला पाणी पण त्याचाही आनंद त्यांना घेऊ द्या. थंडगार वाऱ्याप्रमाणे त्यांना लहरू द्या, बहरू द्या. देशाचे भविष्य ते ,त्यांना जीवन जगणे शिकू द्या.
आता म्हणाल हे चिंचा, बोरे ,रानमेवा, तो थंडगार झोंबणारा वारा हे काय सुरू आहे? अहो ,मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय नाही का ‘झोंबणारा वारा’ आपल्या राहुल दादांनी दिला. समूहामध्ये आज हा झोंबणारा वारा भरपूर प्रमाणामध्ये थंडगार हवेच्या लहरी घेऊन आला. आणि या थंडगार वाऱ्याच्या आठवणी बरोबरच सर्व खेड्यापाड्यातील आठवणींना जागे करून गेला. आज समूहामध्ये हा वारा मनमुक्तपणे सर्वांना थंडावा देत होता. या झोंबत्या वाऱ्यातही सकाळी लवकर उठावे लागते, शाळेत जावे लागते ,शेतात जावे लागते आणि मुलांना खेळण्याची मजा घेता येते. खाण्यापिण्याची रेल चेल होते. अशा विविध अंगी कवितांचा समावेश अ आज समूहामध्ये झाला. सर्व बालकविता शिलेदारांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपले बालमन असेच बहरत राहो व झोंबणाऱ्या वाऱ्यासवे लहरत राहो. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद. तूर्तास इतकेच….!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
सहप्रशासक/ परिक्षक/लेखिका/कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह





