उपेक्षित अंधारयात्रीस प्रकाशवाटेची गरज; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

उपेक्षित अंधारयात्रीस प्रकाशवाटेची गरज; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
मुलगा: बाबा… डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलय ना,”शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते जो पितो…तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मी मोठा झालो,शिकलोय आता मला नाही आवडत इथे राहणं आणि तुम्ही करत असलेला उद्योग. स्मशान..अहो स्मशानाचं नाव जरी घेतलं तरी, लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. अशा स्मशानात आपण राहतोय.अशा ठिकाणी तुमचं वास्तव्य तेही जन्मापासून आजपर्यंत..ठीक आहे हो…पण आता बदला ना स्वतःला..नको, नको,आता इथे राहायचं नाही आपण…मला, मला लाज वाटते हो कधी कधी तुमच्या या व्यवसायाची. असा कसला हा व्यवसाय. प्रेत जळायला सुरुवात झाल्यापासून प्रेताची कवटी फुटेपर्यंत तुम्ही निर्भय म्हणून तिथेच बसून राहतात एखाद्या अंधारयात्री प्रमाणे…शेवटी राखही सावरतात… ना कसलं भय ना कसली भीती.
आई: अरे पोरा….तुझा बाप कधी ऐकतोय का कुणाचं? त्यांचे हे काम व्रत समजतात ते. अरे कित्येक बेवारस लोकांना अग्नी देऊन तळ हातांप्रमाणे मन ही भाजलय त्यांचं..ते नाही ऐकणार कुणाचंच.
मुलगा: ठीक आहे मग..नाही ना ऐकत तुम्ही माझे..मग या स्मशानातले अंधारयात्री तुम्हीच रहा…तुम्हाला लख लाभो तुमचा हा व्यवसाय.मी जातोय घर सोडून कायमचं..शहरात जाऊन नोकरी करीन मी,खूप मोठा होईल, किमान कुणी मसनजोगीचा पोर म्हणून तरी नाही ना हिणवणार मला.
बाबा :काय उत्तर देऊ रे पोरा तुला… अरे पूर्वी भिकारी किंवा मागतकरी होतो आपण.जगण्याच्या संघर्षात कुठेही स्थान न मिळाल्याने स्मशानालाच आपलंसं केले.तू सांगतोस ना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा म्हटले आहे,”जगात कोणतंही काम कनिष्ठ नसतं,कनिष्ठ असते ती माणसाची वृत्ती”…आनंदी आहे मी इथे.. अगदी आनंदी… कित्येकांचा अखेरच्या क्षणांचा साक्षीदार झालोय मी..इथेच बालपण,तरुणपण आणि आता म्हातारपण…या म्हातारपणात नवीन कुठलं काय शोधू मी? आपला इथला अंधारयात्रीच बरा मी….राहू दे मला इथेच.. सुखी आहे मी..हे स्मशानच माझा स्वर्ग आहे..मी नाही.. मी कुठेही जाणार नाही.
(काही काळानंतर)
मुलगा:आई,बाबा खूप आठवण येतेय आज तुम्हा दोघांची. या शहरात मी थोडा स्थिरावलो, सुख-समृद्धी सारं काही आहे पण याला तुमच्या दोघांच्या प्रेमाची सर कशी येईल. येतो मी तुम्हाला भेटायला,आजच येतो.
अरे,आज माझ्या गावात काही घडलंय का?? बिन अंतयात्रेची सगळीच पावलं माझ्या घराकडे का बरं जात आहेत.
काय म्हटलं..माझे बाबा देवाला प्रिय झालेत..बापरे असे कसे झाले…
बाबा…बाबा खरंच.. खरंच मी चुकलोय मला माफ करा.तुमच्या या अंधारयात्री प्रवासाला मी खरच नाही ओळखू शकलो.पण आज….तुमच्या अग्निपिंडातल्या प्रकाशात मी अंधार यात्री प्रती कायम कृतज्ञता ठेवील…आणि त्यातूनच नवी प्रकाशवाट शोधील…तुम्हाला आजन्म साथ देणारी माझी आई ही मला म्हणतेय, तुझ्या बाबांचा स्मशानातला समृद्ध वारसा मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवेल,चालवेल आणि माझा हा अंधारयात्री रुपी प्रवास ही इथेच संपवेल…सलाम तुम्हा दोघांच्या कर्मनिष्ठ वृत्तीला.
रसिक सुजनहो… हा खरा अंधारयात्री… आजवर मला नाही वाटत कोणी अशा अंधारयात्रीकडे लक्ष दिलं असेल. कायमच दुर्लक्षित असणारी ही जमात आज ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल
सरांच्या बुद्धिमत्तेला स्पर्शून गेली आणि आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेसाठी ‘अंधारयात्री’ हा विषय त्यांनी दिला. अर्थात सर्व कवी कवयित्री यांनी विषयाचा सन्मान करत लेखणीला न्याय दिला. सर्वच रचना बहारदार ठरल्यात.तेव्हा तुम्हा सर्वांचे मनस्वी अभिनंदन आणि काव्यकल्पनेची कौतुकही.. लिहत रहा..आणि महत्त्वाचे म्हणजे लिहिण्यात सातत्य ठेवा.तुमच्या लेखणीचा योग्य सन्मान करण्यासाठी मराठीचे शिलेदार समूह आणि आदरणीय राहुल सर तत्पर आहेत हा विश्वास आपणास देते. मला शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या परीक्षणाची दुहेरी जबाबदारी आ.राहुल सरांनी दिली त्याबद्दल राहुल सरांचेही मनापासून आभार मानते. तूर्तास एवढेच.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





