“द्वेषाचा अंधार संपवून, उजेडाचा प्रेमभाव निर्माण करू या”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्य परीक्षण
“द्वेषाचा अंधार संपवून, उजेडाचा प्रेमभाव निर्माण करू या”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्य परीक्षण
“अहो… आई… होय,आईच आहात तुम्ही माझ्यासाठी”. जरी माझ्या सासूबाई असाल. खरंच हो.. मुद्दाम नाही बशी फुटली माझ्याकडून. नकळत झालेली चूक मी मान्यही करते. मला माफ करा एकदा. मी नेहमी पाहते, माझ्या भावनांचा खेळ. हवं तर मारून घ्या मला, पण..जे या जगातच नाहीत त्या माझ्या आई-वडिलांचा उद्धार नका ना करू. खूप जण खेळलेत माझ्या भावनांशी. लहानपणापासून मी एकच गोष्ट शोधत आहे. नाही हो अजून मला मिळाले. माझ्या भावनांना जपणारे. किती टाकून बोलतात मला सर्व. सहनशीलतेचा अंत झाला की, माझे अश्रू मला साथ देतात. माझ्या पेंगुळलेल्या पापण्यांना त्यांचीच तर खरी सोबत. त्यांना आहे जाणीव माझ्या दुःखाची, माझ्या अनाथ जीवनाची. शेवटी तेच मन मोठं करायला भाग पाडतात आणि मला म्हणतात पण ते..’जपू या ना’ भावनांना. का तू एवढी निराश होतेस? प्रत्येक अंधार नष्ट करायला सूर्योदय होतोच ना.
भावनांचा हा खेळ मोठा चमत्कारी आहे. अगदी ताजे वर्तमानपत्र आणि कालचे किती फरक आहे. अवघ्या चोवीस तासाच्या आयुष्यानंतर अडगळीत पडावे लागते तरीही ते खुश असतेच ना? कोण जपते त्याच्या निर्जीव भावनांना. होय…आई वडील वारले होते माझ्या लहानपणीच. मला सांभाळणारी लहानाचे मोठे करणारी आजी. आहे अजून पण तिही अडगळीत पडलीय बिचारी. तिच्याच भावनांना जपणारे कुणी नाही, तर ती कसे मला जपेल.?
“खरं तर आयुष्याच्या रंगमंचावर कुठलीही भूमिका साकारणं, एखाद्याच्या भावना जपणं, मनात घर करणं सोपं नसतं.”. विरंगुळा, प्रेम, स्नेह, आपुलकी, गारवा या सा-या भावना आहेत हो.! पण या भावना आपण जपतो का?आत्मचिंतन करायला लावणारा प्रश्न आहे. पण या भावना जपायला आज वर्षारंभीच सांगताहेत. ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आ.राहुल सर बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतून. ‘भावना जपू या’ या सहा अक्षरांत किती गहनता दडलीय. आज प्रत्येक कवी, कवयित्रींची लेखणीही लिहितांना थरथरली असेल. सर्वांनी छानच प्रयत्न करत भावना जपून मृत्यूलोकीच स्वर्गसुखाची अनुभूती घ्यायचा संदेश दिलाय. तेव्हा तुम्हां सर्व कवी, कवयित्रींचे मनापासून अभिनंदन.
शेवटी एकच की, “आपल्या सौम्य सूर्यकिरणांनी धरित्रीचा मळकट देह प्रकाशमान करणाऱ्या सूर्याने आपली तीव्रता वाढवली, तरी धरित्रीचा सूर्याप्रतिचा भाव जराही ढासळत नाही’. आपणही असाच प्रेमाचा तेजोवलय आणला तर, नका अडवू लाटांना, नका थोपवू वादळांना. पण, ‘नात्यातील धागे उसवू नयेत म्हणून प्रयत्न करूया ना’. मायेचा सागर बनू नका. पण समोरच्याला आपलं दुःख सांगण्यासाठी आपल्या मनात थोडीशी हक्काची जागा देऊ या ना. भावनांची भरती, ओहोटी जपण्यासाठी किनारा बनूया ना? दुःखाची लकीर कुणाच्या आयुष्यात घेऊन जाण्यापेक्षा स्वतः तीव्र चटके झेलून, आसरा बनून प्रेमानं आपल्या छायेत सामावून तर बघा. कसं आयुष्य रंगीबेरंगी होतं ते. अहो प्रेमाचे दोन शब्दही दुर्धर आजार बरे करतात. चला तर.. मग आपणही द्वेषाचा अंधार संपवून, उजेडाचा प्रेमभाव उत्पन्न करून दुःखाचाही सुखासोहळा करू या. आपणा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन लेखणीस विराम देते.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह