‘टाईम लेस ईंम्प्रेशन्स’ रविवर्मा यांच्या लिथोग्राफ चित्रांचे प्रदर्शन
शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या कलादालनात चित्र प्रदर्शन
‘टाईम लेस ईंम्प्रेशन्स’ रविवर्मा यांच्या लिथोग्राफ चित्रांचे प्रदर्शन
उद्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन
शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या कलादालनात चित्र प्रदर्शन
जिल्हा प्रतिनिधी, नागपूर
नागपूर : (दि.११): युरोपीय आधुनिक कलानिर्मिती तंत्राचा वापर करून भारतीय चित्रकलेला स्वतंत्र ओळख देणारे चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रांनी कला रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजतागायत कालातीत ठरणाऱ्या चित्रकाराच्या मुद्राचित्रांचे प्रदर्शन शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर येथे ‘ टाईमलेस इंप्रेशन्स ‘ आयोजित करण्यात आले आहे.
यानिमित्ताने विदर्भातील, शहरातील, कला क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध होत आहे. रविवर्मा यांची जवळपास तीनशेहून अधिक ओलिओग्राफ संग्रहित करणारे मुंबईतील संग्राहक अमर रेड्डी यांनी महाविद्यालयासाठी विनामूल्य
उपलब्ध करून दिली. सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक १२ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या कलादालनात सायंकाळी ४.०० वाजता रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी लेखक व समीक्षक संजय आर्वीकर यांचे रविवर्मा यांच्या चित्रांवर विशेष व्याख्यान होणार आहे. जेष्ठ चित्रकार प्रा प्रभाकर पाटील आणि संग्राहक अमर रेड्डी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जून्या पिढीसोबत नव्या पिढीतील कलारसिकांच्या जाणिवा अधिक समृध्द व्हाव्यात ह्या सामाजिक बांधिलकीतून महाविद्यालयाने
हा उपक्रम आयोजित केला आहे.
दिनांक १३ डिसेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमिक द्रृष्टिकोनातून रविवर्मा यांचे योगदान या विषयावर जेष्ठ कलाअभ्यासक व चित्रकर्ती प्रा मनिषा पाटील यांचे व्याख्यान दुपारी १२ वाजता आयोजित केले आहे. शहरातील निवडक शाळेतील कलाशिक्षक व या क्षेत्रात येऊ पहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘मुद्रणकला कार्यशाळा’ दिनांक १४ डिसेंबर रोजी महाविद्यालयात सकाळी १०.३० ते ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून लिथोग्राफ मुद्रणतंत्र व ईतर मुद्रणकला तंत्रज्ञान अवगत करून दिले जाणार आहे. यासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. भाग दोन अंतर्गत तृतीय व अंतिम वर्ष रंगकला विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय स्तरावर दिल्ली येथील जेष्ठ लिथोमुद्राचित्रकार आणि चित्रकार दत्तात्रय आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळेचे आयोजन दिनांक २० डिसेंबर रोजी केले आहे. उपयोजित कला विभागात जेष्ठ जाहिरात तज्ज्ञ मधुकर डोईफोडे मार्गदर्शन करणार आहेत. आजची जाहिरात क्षेत्रातील बदलते स्वरूप तसेच आधुनिक समकालीन मुद्रणतंत्र कलाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवगत व्हावे या हेतूने अशा कार्यशाळेचे आयोजन मागील वर्षापासून होत आहे.
मागील वर्षी ज्येष्ठ चित्रकार प्रा रवि मंडलिक तर उपयोजित कला विभागात ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती.याच उपक्रमाला जोडून
दिनांक १५ डिसेंबर रोजी ‘अनव्हेलिंग ट्रेजर्स’ क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन किरण फाउंडेशन ट्रस्ट च्या सहयोगाने सकाळी १०.३० ते ५.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी होणार असून शहरातील कला रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा.
या कला उपक्रमाला शहरातील कलारसिक, कलाकार व शिक्षक-विद्यार्थी यांनी भेट द्यावी, उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे नव्यानेच मुंबईतून आलेले अधिष्ठाता डॉ विश्वनाथ साबळे यांनी केले आहे. प्रदर्शनाच्या आयोजन समितीचे प्रा संजय जठार आणि इतर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.