भिजकी वही’ म्हणजे प्रत्येक साहित्यिकांचा दुर्दम्य आत्मविश्वास; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘भिजकी वही’ म्हणजे प्रत्येक साहित्यिकांचा दुर्दम्य आत्मविश्वास; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“जे का रंजले गांजले !
त्यासि म्हणे जो आपुलें,
तोचि साधू ओळखावा!
देव तेथेचि जाणावा !”
भारतात सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे ‘संत तुकाराम’ महाराज अतिशय वास्तववादी, निर्भीड व तत्कालीन दांभिक परिस्थितीवर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे महान संत होते. भागवत धर्माचा कळस असलेले ‘संत तुकाराम महाराज’ यांचे अभंग आजही महाराष्ट्राच्या हृदयात पाझरत आहेत. संत तुकाराम महाराजांची गाथा ही तर अखंड ज्ञानाचा स्त्रोतच आहे. साडेचार हजार अभंग असलेली गाथा म्हणजे, ‘आत्मशोध व आत्मसाक्षात्काराचा जणू राजमार्गच होय’.परंतु काही तथाकथित समाज विकृत लोकांनी ही गाथा इंद्रायणीत बुडवण्याचा प्रयत्न केला असे म्हणतात…भले ती भिजकी वही झालीही असेल, परंतु त्यांचे अभंग लोकांच्या मनात, स्मरणात आणि मुखोद्गत होते… ते कसे बरं नष्ट होतील?
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.यांनी आपल्या “तुका झालासे कळस” या नाटकात म्हटले आहे. पाण्यावर अभंग लिहिलेली पोथी तरंगून आली. त्यापेक्षा त्यांचे अभंग लोकांच्या एवढे मुखोद्गत होते की गाथा बुडवण्याचा हेतू निष्फळ ठरला, त्यांची भिजकी वही जनमान्य होती हा त्याचाच पुरावा आहे म्हणूनच आजही…
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी l
कर कटेवरी ठेवोनिया II
तुळशीहार गळा कासे पितांबर I
आवडे निरंतर हेच ध्यान II
महाराष्ट्राच्या पांडुरंगाचे नमन करणारी ही तुकाराम भक्ती म्हटल्याशिवाय कोणताच धार्मिक कार्यक्रम पूर्ण होत नाही. भिजकी वही तसा पाच अक्षरी शब्द..परंतु त्याची साहित्याशी जोडलेली नाळ मात्र खूप मजबूत आहे. तेव्हाच तर कवी अरुण कोल्हटकर यांनी म्हटले होते.
ही वही कोरडी ठेवू नकोस
माझी वही भिजो
शाई फूटो
ही अक्षर विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणाऱ्या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो
‘भिजकी वही’ या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांनी स्त्रियांचं एकंदर जीवन जाणिवांचा प्रपंच मांडला आहे. एकंदरीत भिजकी वही म्हणजे प्रत्येकाचा दुर्दम्य आत्मविश्वास असं मला वाटतं. रसिक सृजनहो भिजू द्या तुमचेही साहित्य…कधी भिजेल, कधी कुणी चोरेल, कुणी नक्कल करेल….करू द्या; पण जर ते तुकारामांच्या गाथेसारखं निखळ आहे तर, तुम्ही निर्धास्त रहा. तुमच्या साहित्याचा सुगंध कस्तुरी सारखा सर्वत्र दरवळेल यावर पूर्णतः विश्वास ठेवा.
अजून एक गोष्ट….माझ्या ग्रामीण दुर्गम महाराष्ट्रात कित्येक बालकांची शिक्षणरुपी वही अगदी कायमचीच भिजलेली आहे. त्यांना कुठून येते छत्री, रेनकोट, जाता येताना दप्तर ओलं होतच परंतु ते कुठे थांबतात?? ती अक्षरं भले वहीत भिजत असतील, परंतु मनाच्या कंगोऱ्यावर कोरलेली ती शब्दलेणी कशी बरे भिजतील? आज या मुसळधार पावसासोबत ‘भिजकी वही’ या अनोख्या विषयाला ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सर्वांसमक्ष ठेवला. अर्थात कवी कवयित्रींनीही यास योग्य प्रतिसाद दिला. तेव्हा तुम्हां सर्व कवी कवयित्रींच्या प्रतिभाशक्तीला माझा मानाचा मुजरा व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा…!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





