“शब्दसरींची उधळण करीत सरला विदर्भस्तरीय ‘श्रावणधारा’ कवी संमेलन सोहळा”
कवयित्री ज्योती चारभे यांच्या 'अपराजिता' काव्यसंग्रहाचे थाटात लोकार्पण
“शब्दसरींची उधळण करीत सरला विदर्भस्तरीय ‘श्रावणधारा’ कवी संमेलन सोहळा”
कवयित्री ज्योती चारभे यांच्या ‘अपराजिता’ काव्यसंग्रहाचे थाटात लोकार्पण
सत्कारमूर्ती ‘चरणदास चारभे’ यांच्या सेवापूर्ती समारंभास आप्तेष्टांची भेट
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दि. ०२/०८/२०२५ रोजी वर्धा येथील संत ब-हाणपुरे महाराज सभागृह येथे त्रिसंगमीय अभूतपूर्व समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात नुकतेच सेवानिवृत्त झालेले मा. चरणदास चारभे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. वर्धा यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार व त्यांच्या सहचारिणी प्रसिद्ध कवयित्री व पदवीधर शिक्षिका ज्योती चारभे यांच्या पहिल्याच ‘अपराजिता’ कविता संग्रहाचा लोकार्पण समारंभ व विदर्भस्तरीय निमंत्रितांचे ‘श्रावणधारा’ कवी संमेलन मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ‘चरणदास चारभे’ सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार, तसेच त्यांच्या पत्नी ज्योती चारभे यांच्या ‘अपराजिता’ या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. मा. धनराज तेलंग, माजी शिक्षणाधिकारी, वर्धा. तसेच माजी जि. प. सदस्य वर्धा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा. प्रा. डॉ सिद्धार्थ बुटले, सर या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला अरविंद पाटील, त्याचप्रमाणे कवी संमेलनाचे अध्यक्ष मा. सुधाकर भुरके, नागपूर, मराठीचे शिलेदार समुहाचे मुख्य प्रशासक तथा संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक, संपादक व प्रकाशक मा. राहुल पाटील, ज्येष्ठ कवियत्री मा. सविता धमगाये, नागपूर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे प्रमुख मा. राहुल पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते ज्योती चारभे यांच्या ‘अपराजिता’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज तेलंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ‘प्रत्येक व्यक्तीने मनाच्या विचारांवर ताबा मिळवत, समतेत राहून आपलं आयुष्य मार्गक्रमण करावं याबाबत मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा सर्व प्रमुख अतिथी यांनी चरणदास चारभे यांना सेवानिवृत्ती पर शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्रा सुशील मून ,(मोझरी) शेकापूर यांनी केले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात ‘श्रावणधारा’ काव्य मैफिलीचे अध्यक्ष मा. सुधाकर भुरके, नागपूर, तसेच प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवयित्री मा. सविता धमगाये यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने सुरुवात झाली. सानथोर कुणालाही विचारले की, ‘तुम्हाला आवडणारा ऋतू कोणता?’ तर ,जास्तीत जास्त ‘पावसाळा ऋतू’ ची उत्तरे हमखास मिळतात. पावसाळा ऋतू आहेच मनभावन आणि त्यातही श्रावण म्हणजे, त्यातलं सोनेरी कोंदण! सृष्टीची सर्जनशीलता ही हिरवाई शेतातल्या पिकांमधून ,डोंगर , कुरणांतून अंगणातून ,रस्त्यांच्या कड्या फटीतून ते वनांपर्यंत या महिन्यात चराचरातून ओसंडून वाहते. ऊन पावसाच्या या लपंडावात इंद्रधनुष्याच्या तोरणाखाली आपण सर्वच आनंदाने चिंब भिजतो.
सगळीकडे अगदी सृजनाचा सोहळा सुरू असतो. एखाद्या छोट्या झऱ्याचा धबधबा होतो, तर ओढ्याला नदीचे रूप प्राप्त होते. नद्यांचे पात्र विस्तारून त्यांच्यातलं सारं मळभ वाहून जातं आणि स्वच्छ ,सुंदर, नितळ पाणी आपलं स्वच्छ प्रतिबिंब दाखवतात. या रम्य वातावरणात साधारण व्यक्तीलाही काव्यप्रेरणा मिळते. तर ,कवी मनाच्या व्यक्तीला कवित्वाची भरती यावी, त्याप्रमाणे त्याच्या मनातील शब्दांना नवे धुमारे फुटतात! त्यांच्या मनातील भावतरंग पावसाच्या सरींप्रमाणे भरून नवनव्या कवितांचा जन्म याच ऋतूत होतो! या नव शब्द तरंगांचा पूर सर्व काव्यरसिक श्रोत्यांना अनुभवण्याची संधी मिळाली, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय व प्रकाशन संस्था, नागपूर द्वारा आयोजित विदर्भस्तरीय कवी संमेलन ‘श्रावणधारा’ या काव्यमैफिलीतून!
‘नभी मेघ दाटून पाहतो, होऊन मुक्त वाहतो वारा,
इंद्रधनुष्य सप्तरंग उधळतो, जेव्हा येती श्रावणधारा..’
अशा सुंदर शब्दात कवयित्री व लेखिका कुसुमलता दिलीप वाकडे, नागपूर यांनी ‘श्रावणधारा’ या कवितेतून त्यांनी श्रावण महिन्याचं सुंदर रूप मांडलं. शिरुड हिंगणघाटचे कवी आशिष वरघने यांनी आपल्या ‘शाळा आणि देश’ या कवितेतून श्रोत्यांना अंतर्मुख करून आपल्या पुढील शब्दात भाव व्यक्त केले.
शाळेच्या गणवेशावर
कुणी उधळत नाही गुलाल
म्हणून वाटायचं कधी कधी
खाकीतल्या पोलिसासारखं
पण काल लेक म्हणाली,
“पप्पा, शाळेत जायची भीती वाटते”
वर्धा येथील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रशांत ढोले यांनी ‘पावसाळा’ या कवितेतून पावसाचे यथोचित वर्णन पुढील शब्दात शब्दबद्ध केले.
सखा ऋतूराज!जगवितो आज!
सम्राटाचा साज! पावसाळा.
श्रावणाची धारा!अंगी बरसती!
आयुष्यच गाती! पावसाळा!
कवी हा संवेदनशील असतो ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं उगाच म्हटल्या जात नाही. आपल्या दैनंदिन नित्याच्या अनुभवातून त्यांना काव्य स्फुरण मिळतं…
शिक्षक म्हणजे
आरंभापासून अंतापर्यंत…
रोज अंधारलेल्या फळ्यावर
उजेडाची अक्षरे जीवाच्या आकांताने गिरवताना….
दरवर्षी एक एक पिढी घडवितांना
आयुष्य झिजवून टाकणारा एकमेव खडू
म्हणजे शिक्षक. अशा प्रकारचं सुंदर काव्य मांडलं. हिंगणघाट येथील ज्येष्ठ कवी प्रशांत शेळके यांनी त्यांच्या ‘शिक्षक म्हणजे’ या संवेदनशील कवितेतून….
‘जीव ठेवून माहेरी जाते सासरी नांदाले
आई बापाचं काळीज लेक जपते नात्याले,
हे पाहून वाटते लेक असावी साऱ्याले..’
लेकीच्या अस्तित्वाचे भाव रेखाटले आहेत. या ”लेक” सुंदर कवितेचे रचनाकार आहेत, हिंगणघाट येथील कवी गिरीधर काचोळे. वर्धा येथील कवयित्री शुभांगी पोकळे यांनी त्यांच्या कवितेतून मनातील श्रावणाला काही प्रश्न केले… आणि श्रावण प्रत्येकासाठी वेगळा असतो, असे भाव चित्र शब्दात गुंफले… त्यांच्या ‘मंतरलेला श्रावण: या कवितेतील काही ओळी…
लेण्यांसारख कोरलेलं आयुष्य
पानगळतीचा मोहर होते
उन्ह सावलीच्या पाठशिवणिच्या खेळात
श्रावण मात्र सुख पेरून जाते
हिंगणघाटच्या रा सू बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवी डॉ. बालाजी राजूरकर यांनी त्यांच्या ‘श्रावणसरींचा नाद’ या कवितेतून पावसाचे श्रोत्यांच्या मनाला चिंब भिजवणारे पुढील काव्यात वर्णन केले.
पावसाच्या सरी धावतात,
जशी लागली शर्यत खरी।
आंघोळ घालते पिकांना,
गात आनंदाने गाणी खरी।।
वर्धेचे प्रसिद्ध शिक्षक कवी घनश्याम थूल, तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका, कवयित्री यशश्री लोहकरे यांनी अतिशय सुंदर काव्य गायनाने रसिकांची मने जिंकून घेतली. रामटेक येथील प्रसिद्ध कवी राहुल श्यामकुवर यांनी आपल्या वैदर्भीय बोलीभाषेतून त्यांच्या ‘रोवणं’ या कवितेतून शेतकऱ्याची व्यथा आणि सद्य परिस्थिती अतिशय सार्थ शब्दांत ओवली!
वर्धेचे तरुण कवी जगदीश ढुमणे यांनी आपल्या प्रगल्भ शब्द काव्यश्रोत्यांना नवा संदेश दिला..
एक वेळ मंदिराच्या घंटा
थांबल्या तरी चालेल ,
पण माणसांनी दिलेल्या हाकांना,
उत्तर मिळालं पाहिजे
एवढा तरी तुकोबा अन् विठ्ठल कळाला पाहिजे!
हिंगणघाटच्या शिक्षण तज्ञ सुनीताताई गडवार यांनी श्रावणाच्या अनुषंगाने बेलाच्या झाडाचं आत्मवृत्त आपल्या कवितेतून व्यक्त केलं! कवी वसंत गिरडे यांनी आपल्या मनातल्या श्रावण पुढील शब्दात मांडला.
आला आला श्रावण
हिरवे हिरवे झाले रान
नभी इंद्रधनुष्य बघून
आनंदले माझे मन.
कवयित्री चैताली येंगडे यांनी सुद्धा आपल्या काव्यरचनातून श्रोत्यांना रिझविले. विदर्भातील वर्धा, नागपूर ,यवतमाळ येथील सर्व वयोगटातील सहभागी झालेल्या कवी, कवयित्रींनी श्रोत्यांच्या मनाला पाऊस आणि कविता या दोन्हींच्या शब्द जाळ्यातून शहारा देणारे काव्य सादर केलं. ‘श्रावणधारा काव्य मैफिल’ वातावरणात अतिशय सुरेल शब्दांचा ओलावा निर्माण करून गेली. काव्य मैफिलीच्या सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री स्वाती इंद्रजीत लभाने यांनी केले. तर ‘अपराजिता’कार कवयित्री ज्योती चारभे यांनी आपल्या काव्य सादरीकरणाने सर्व उपस्थित वैदर्भीय कवी, कवयित्रींचे आभार मानले. वर्षावासाच्या प्रारंभी श्राणमासाचे औचित्य साधून ‘मराठीचे शिलेदार’ समूहाने आयोजित केलेला नयनरम्य असा विदर्भस्तरीय ‘श्रावणधारा’ कवी संमेलन सोहळा शब्दसरींची उधळण करीत सरला. या त्रिसंगमीय समारंभास शिक्षण क्षेत्रातील तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
शब्दांकन:
स्वाती लभाने, वर्धा (कवयित्री/लेखिका)
राहुल पाटील, नागपूर (संपादक/प्रकाशक)





