दग्ध भावनांनी होरपळलेले, ‘आठवांचे निखारे’
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

दग्ध भावनांनी होरपळलेले, ‘आठवांचे निखारे’
तप्त कोळशावर भाजलेले
रसरस त्या आयुष्याचे धुमारे..!
त्या आगीत भस्मसात स्वप्नकोंब
राखेत शिल्लक फक्त आठवांचे निखारे..!!
‘आठवांचे निखारे’ श्रीमती वर्षा मोटे पंडित यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. पण जणू तो पेटलेल्या वनव्याचा दाह, क्षणाक्षणाला पोळलेल्या अंतरीचा घाव, भळभळत्या जखमांचे नवे नाव “आठवांचे निखारे”. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपले पतीवैभव गमावलेल्या कवयित्रीच्या जीवनात बहरलेल्या काळावर जणू दाहच कोसळला. भळभळणाऱ्या जखमांचे चार दिवस, वरकरणी समाजाचे सांत्वनही लाभले. पण हे चार दिवस संपल्यानंतर सुरू झाला कवयित्रीचा एकाकी प्रवास आणि या प्रवासाचे सोबती अगणित चटके. हा वेदनांचा दाह क्षणोक्षणी, पावलोपावली कवयित्रीला आपल्या पतीची कमतरताच नव्हे; तर वृक्ष छायेखाली, ओंजळीत जपून, मनाच्या कुपीत बंद ठेवणारे पती श्री वैभव मोटे यांच्या आठवणी तप्तरसात जाळू लागल्या आणि त्यातूनच जन्म घेतला आठवांच्या निखाऱ्यांनी.
स्वतः कवी मनाचे असणारे पती स्वहवासातून ,प्रेमातून आपल्या पत्नीची जपणूक करतात आणि त्यांनाही तितकेच संवेदनशील बनवतात. कदाचित भविष्यात याच कवितांचा सहारा त्यांना अपरिहार्य होता हे जणू ते जाणून होते. कवयित्री एक एक वेदनांचा हा घाव आपल्या पतीच्या स्मृतीस अर्पण करताना दिसते.ती म्हणते,
मरून जगलात तुम्ही, मी जगून मरते आहे..
श्वासाहूनही ज्यादा, मी तुम्हास स्मरते आहे..
जणू प्रत्येक श्वास कवयित्रीने मरणोत्तरही आपल्या पतीस अर्पण केला आहे. पावला पावलावर सहानुभूतीची दांभिकता कवयित्रीला छळते. सर्वच रान पेटले आहे आगीतून कसे बाहेर पडावे? ती म्हणते,
‘होरपळले पाऊल तरीही, निखारे तुडवीत चाललेय,
कुठे घ्यावा तरी विसावा, आता रानच सारे पेटलंय…’
‘नसल्यातले असणे’ कवयित्रीने प्राणपणाने जपले आहे. स्मृतीकोषमध्ये ती म्हणते,
‘तुझे अस्तित्व क्षितिजासारखे, दूरवर अगदी स्पष्ट दिसते,
मात्र जवळ येऊन पाहता, ते पुन्हा तितकेच दूर भासते..’
पतीच्या आठवणींनी व्याकुळ कवयित्री म्हणते…
‘तुझ्या आठवणी म्हणजे, उणा उणा मन गाभारा,
तुझ्या आठवणी म्हणजे, सुना देवावाचुन देव्हारा..,
वास्तव कितीही कटू परी कवयित्री कल्पनेतच का होत नाही आपल्या पतीच्या आठवांना सोबत करून म्हणते…
‘मात्र सरावलेले हात, चाचपडतात आजूबाजूला,
आणि धस्स होतं काळजात, तू नाहीस जोडीला..’
कवयित्री आपल्या पतीचा विरह मानायलाच तयार नाही. तिने आपल्या पतीचे कवी मन जणू कायम स्वतःला जोडून घेतले आहे. त्याचे “कायमचे असणे” स्वतःजवळ जपून ठेवण्यासाठी . हेच पतीचे शब्द पुढे ती आपल्या भावनांना उजागर करण्यासाठी वापरते आणि हेच शब्द तिच्याकडे तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी धाव घेतात. तेव्हा ती म्हणते… ‘गुज कळलेय शब्दांना, ज्यांची कविता होतेय’.
तिच्या वेदनांची तीव्रता वाचकांचे हृदय पिळवटून काढते. नव्हे तिच्या तप्त आयुष्याचे चटके वाचकाच्या मनाला ती देऊन जाते. ती क्रूरकाळाला न्यायाच्या पिंजऱ्यात उभा करते. ‘तू गेलास अन्’ मध्ये ती म्हणते…
‘तू गेलास अन् गेले वैभव माझ्या भाळाचे,
असे कसे वक्र पाऊल, पडले क्रूर काळाचे..’
पतीचे संवेदनशील मन व्यक्त करताना ती म्हणते, मी साधी कुस बदलली, तरीही तुला जाग यायची.. पण तोच पती काळ झोपेत लिन झाला आणि हे एकाकीपण आता.. ‘मीच जळेन जेव्हा सरणावर, तेव्हाच मिटेल सारे एकाकीपण’. असे म्हणून वाचकाच्या हृदयाचे ठोके थांबवण्याचे सामर्थ्य कवयित्री ठेवते. इतकी भावनांची दग्धता मांडूनही कवयित्री ‘अधुरी एक कहानी’ मध्ये म्हणते.. ‘शब्द पुरतील का रे, तुझ्या आठवणी सांगायला, कसं जमेल मला सांग ना, सारच कवितेतून मांडायला..’ हे भयंकर दुःख पचवताना जणू कवयित्री मौन झाली आहे.सआतल्या आत धुमसते आहे. ती म्हणते,
खरे तर तुझ्यासोबत, माझी वाचाच गेलीय
आणि लोक म्हणतात, ही खूप अबोल झालीय ..
कवयित्रीच्या मौनातच दुःख दडलेले आहे, कारण तिला आता मौनच सोबती आहे. स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या कवयत्रिचे स्वप्न नियतीने खुडले तेव्हा ती ‘गर्भित खेळी ‘मध्ये नियतीचा कपटीपणा उजागर करण्यास विसरत नाही. ती म्हणते,
‘आपल्या दोघांच्या मनात,एक भावगीत गाजत होते
आणि नियतीच्या मनात मात्र,वेगळेच काही शिजत होते..’
अनपेक्षित घटनांनी गोंधळलेली कवयित्री “वादळ”मध्ये म्हणते,
सारे कसे शांत शांत,आणि सुरळीत चालू होते
की ती वादळापूर्वीची शांतता,हेच कधी कळले नव्हते
स्वतः पासून पतीचे अस्तित्व दूर करण्याचे स्वप्नातही कवयित्रीने पाहिले नव्हते आणि ते स्वप्न ती जपून भविष्यातही आहे. ती ‘पाऊल खुणा’ मध्ये म्हणते,
आरशासमोर जेव्हा मी,कधी राहते सहज उभी
न्याहाळताना मला तिथे, दिसते तुझीच गोड छबी
अन् ती पुढे त्यालाच विचारते,
तुझ्याशिवाय एकटी,कशी समजू स्वतःला
आठवांचा गोतावळा,असताना सोबतीला
छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करणारे पती आणि त्यांच्या परिसरातील आठवणी कवयित्रीला व्याकुळ बनवतात.या आठवणींना ती ‘चाफा’मध्ये बोलते करते. एका फुलाच्या आवडीसाठी, तू चक्क झाडच अंगणात लावलास आज बहरलाय तो चाफा… अन् तो चाफा पाहून कवयित्रीच्या भावनांचा बांध फुटतो आणि ती, ‘अन् क्षणातच मी, घट्ट बिलगते बुंध्याला, तुझ्या लांब सडक पानांची बोटे जणू केसातून फिरल्याचा भास होतो..’ तिच्यासाठी ‘अकल्पित’ सारे जणू ती म्हणते,
‘आता फिके फिके सारे रंग, सख्या अंतरला तुझा संग
मात्र मंतरलेल्या सहवासाचा, आता उरला सोबतीला गंध..’
कवयित्रीच्या लेखणीचे सामर्थ्य इतके आहे कि, ती वाचकाला तिचे जीवन जगायला भाग पाडते. तिच्या भावनांची दग्धता मनाला पोळल्याशिवाय नक्कीच राहत नाही. मनास सुन्न करणाऱ्या या भावना, हे आठव, भावनांचे परमोच्च क्षण जणू जगायला भाग पाडतात.’ पुनर्भेट’ मध्ये कवयित्री म्हणते, ‘अहोरात तुझ्याच मी, हरवून जाते आठवात. होईल कधी भेट सख्या, भिजते आसवात’. पतीशिवाय जगण्यापेक्षा मरण बरे वाटणारी कवयित्री म्हणते,
‘सांग आधी कोण येणार, जर मृत्यूने विचारले असते,
तुझ्या आधी मी जाण्यास, कदापी मागे सरले नसते..’
अशी ही धगधगणारी कवयित्री आपल्या जगण्याचा आधार म्हणून शब्दांना, कवितेला शोधताना दिसते. ‘एकांतवास’ मध्ये ती म्हणते, ‘मनातल्या सुप्त भावभावना, मौनात जरी बंदिस्त. अश्रूंनी लिहिते कविता कधी व्हावे दुःख निद्रिस्त’. तिचे बहरले जीवन अचानक ‘वाळवंट’ बनले. आधारा वाचून हे हेळसांडलेले जीवन जगताना ती म्हणते,
‘तुझ्या भक्कम आधाराने, गगनाला स्पर्शले असते
आता निराधार वेल मी, येथे कशीतरी सरपटते..’
आठवणींचे उमाळे, उणीव , चक्रव्यूह ,यातनांचा दाह, श्वासाची किंमत ,आल्याड पल्याड, पंचप्राण अशा कितीतरी कवितांमधून भावनांची मनाला झळ दिल्याशिवाय ती राहत नाही. कवयित्री ची विरहाची आर्तता मनाला छिन्न विछिन्न करते. ती म्हणते, ‘देहाच्या कुडीत माझेही, पंचप्राण तळमळताहेत. तुझ्याकडे येण्यासाठी, देवालाच विनवताहेत’. पतीच्या अकाली जाण्याने पेटलेला रणसंग्राम, तिच्या मनाचे भाजणे, तिच्या अतृप्त इच्छा, पतीवरील अस्सीम प्रेम, त्याचा स्पर्श गंध, तिचे जीवन गाणे, त्याच्यासोबतचा सहवास व आठवणी, त्याच्या वाचून आलेला आसवांचा पूर.. एक ना अनेक भाव अक्षरशः वाचकांच्या मनाला पोळतात, भाजतात. अशा तप्त कोळशावर ,अश्रूंच्या अंगारावर कवयित्रीला अचानक दिसतात संसार वेलीवरील नुकतीच उमललेली दोन फुले आणि मग कवयित्री कंबर कसते, उसने धैर्य एकवटून आपल्या पतीच्या या सुंदर आठवणींना जपण्यासाठी जीवाचे रान करते. पाठ राखण, संसार वेल, फिनिक्स होईल यामधून ती उभा राहताना दिसते. तर एकांतात ती पुन्हा कोसळताना आढळते.
तिचा हुंदका एकांत वेळी बाहेर पडू देऊन ती रात्र भिजवते. पुन्हा नव्या किरणांबरोबर नव्या उमेदीने आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या फुलांची जपणूक करते. आपल्या पतीला निशब्द दिलेले वचन ती पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते. ही दुहेरी जीवन जगताना समाजाच्या नजरा, समाजाची खोटी सहानुभूती, आप्तांची छळवणूक तिच्या मनाला भगदाड पाडते. तिचे ‘स्मृती पुस्तक’ तिला स्वस्थ बसू देत नाही आणि ती लेखणी हातात घेते. लेखणीचा अंगार जणू या खोट्या सहानुभूतीला आता जाळूनच स्वस्थ बसणार की काय? असा प्रश्न वाचकाच्या मनाला शिवल्याशिवाय राहत नाही. जाळून होरपळून निघालेल्या अंगारावर कवयित्री आज उभी आहे.
हा अंगार, या वेदना, हे होरपळले क्षण ती आपले पती कैलासवासी वैभव मोटे यांना अर्पण करते. जणू तुझ्या अस्तित्वानंतरही माझे अस्तित्व तूच आहेस हेच सांगण्याचा ती प्रयत्न करत आहे. असे वाचकास भासते. या कवयित्रीचे दग्ध वेदनांचे अंगार अनुभवायचे असतील तर, नक्कीच वाचकांनी एक वेळा हे पुस्तक वाचावे व विधवेचे जीवन काट्यावर कसे चालते याचा अनुभव घ्यावा. एक जळजळीत कटाक्ष जणू कवियत्रीने समाजाकडे टाकला आहे. आणि समाजाला या कटाक्षाने जाळण्याची ताकद कवियत्री ठेवून आहे. हेच या आठवांच्या निखारा़ची यशस्वीता आहे.
या काव्यसंग्रहाचे शीर्षक “आठवांचे निखारे” हे खूप काही वाचकांना सांगून जाते. तसेच काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ पाहता एका विधवेची दाहकता,दग्धता,अंगार,होरपळ, घालमेल , अस्वस्थता,वेदना, अव्यक्त हुंदके, अश्रू आणि जिम्मेदारी याची जाणीव एका क्षणात होऊन जाते. तिच्या जीवनात पेटलेले वादळ अन् दाटलेला काळोख तसेच पायाखालील अंगार सर्व काही मुखपृष्ठच सांगून जाते. “आठवांचे निखारे” या काव्यसंग्रहाला प्रस्तावना विष्णू संकपाळ, ज्येष्ठ कवी, परीक्षक, समीक्षक छत्रपती संभाजी नगर यांची लाभली असून या पुस्तकाला शुभेच्छा शर्मिला देशमुख -घुमरे, बालकवयित्री, लेखिका ,परीक्षक, समीक्षक , सहप्रशासक, बीड तसेच स्वाती मराडे आटोळे कवयित्री, सहप्रशासक, परीक्षक, इंदापूर तसेच सविता पाटील ठाकरे सिल्वासा दादरा नगर हवेली, प्रशासक, परीक्षक समीक्षक ,कार्यकारी संपादक आणि अखिल बाबा पठाण, शिक्षक शिवव्याख्याता, छत्रपती संभाजीनगर यांच्या लाभलेल्या आहेत. हा काव्यसंग्रह ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशन संस्था नागपूर यांनी प्रकाशित केला असून संपादक राहुल पाटील नागपूर हे आहेत.
अशा या नवोदित अंगारावर उभ्या असणाऱ्या कवयित्रीला पुढील लेखणीसाठी भरभरून शुभेच्छा. कवयित्रीचा साहित्य प्रवास असाच बहरत ,फुलत राहो .कविताबरोबर कवयित्रीच्या वेदना हलक्या होऊन तिचे जीवन वेदनेंपासून मुक्त होऊन आनंदाने साहित्य क्षेत्रात भरारी घेवो आणि हे पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभो. मराठी साहित्य क्षेत्रात कवयित्रीचा ठसा लवकरच कवयित्रीला शिखरावर घेऊन जावो. अशा कवयित्री वर्षा मोटे पंडित यांना भरभरून शुभेच्छा…!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक,परीक्षक, समीक्षक
बालकवयित्री, लेखिका
कवितासंग्रह:आठवांचे निखारे
कवयित्री: वर्षा मोटे पंडित
प्रकाशन: मराठीचे शिलेदार नागपूर
पृष्ठ संख्या: ८०
किमंत: १५० ₹ (एकशे पन्नास)
=========





