दगडाला देवपण देणार्या लोकांचं, कष्टप्रद जीणं; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

दगडाला देवपण देणार्या लोकांचं, कष्टप्रद जीणं; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
काळ इतका बलवान आहे की, कोणतीही परिस्थिती जशी आहे तशी रहात नाही. कालौघात त्यात बदल होतोच. किंबहुना परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. यासाठी अनादी काळाचे स्थित्यंतराचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. मानव आणि त्याच्या उदरभरणाच्या पद्धतीत सुद्धा अमूलाग्र बदल झाले आहेत. काही गोष्टी तर कालबाह्य होवून केवळ ऐकण्या सांगण्यापुरत्याच उरल्या आहेत. कधीकाळी एखादी मानवी जमात भल्या मोठ्या दगडी शिळा बाहूबलाने छन्नी, हातोडा, घणाचे घाव घालून फोडत होत्या. ही गोष्ट भावी पिढीला पटणारही नाही. कारण तोपर्यंत विज्ञान इतके पुढे गेले असेल की,हे काम मानवी हाताने केले असेल यावर विश्वास बसणार नाही.
फार दूर नाही आजपासून चाळीस एक वर्षे मागे जाऊन पहा अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कामावरून अनेक जातीत माणूस विभागला होता. काही भटक्या जमातीतील लोक त्याकाळी पोट भरण्यासाठी गाढव, घोडे, वगैरे प्राणी सोबत ठेवून गावोगावी कामाच्या शोधात फिरत असत. त्यापैकीच बेलदार, वडार या जमाती. जे रानात मोठमोठ्या शिळा फोडून त्यांचे बांधकामास योग्य आकारात दगड बनवण्याचे काम करत असत. हे काम प्रचंड ताकदीचे आणि युक्तीचे असायचे. कारण वजनदार पोलादी घण नेमका कुठे कसा किती वेगाने शिळेवर मारायचा याचे एक तंत्र असायचे. कधी कधी शिळेच्या मध्यभागी खोलवर बारीक छिद्र कोरून त्यात स्फोटाची दारू ठासून भरली जायची आणि स्फोट करून ती शिळा दुभंगली जायची. मग त्यातून “वांगीफोड”, “कोपरा” अशा नावाचे छोटे छोटे दगड बनवले जायचे. ते त्यांच्याच महिला गाढवावर लादून गावात हव्या त्या ठिकाणी मागणीप्रमाणे पुरवठा करायचे.
बदल्यात मिळणार्या मानधनावर घरखर्च चालवायचा. आख्खे कुटुंबच या कामात जुंपले जायचे. लहान मुले गाढवे हाकता हाकता दगडफोडे होऊन जायचे.. काम कष्टाचे असल्याने खाणे पीणे भक्कम असायचे.. त्यामुळे शिल्लक किंवा बचत फारशी होत नसे. दगड माझा देव, त्यावरच घण ठेव, पोटासाठी कणभर धन जमवताना मणभर कष्ट उपसणारी या जमाती आज कालबाह्य झाल्या असतील.. कारण बांधकाम क्षेत्रात झालेले अमूलाग्र वैज्ञानिक परिवर्तन. शिवाय याच जमातीतील मुलांनी धरलेली शिक्षणाची वाट.. दारिद्र्याची पाठ सोडण्यास कारण झाली.आणि प्रगतीशी गाठ पडली. तरीही कैक पिढ्या दगडमातीतच
विलीन झाल्या. घामाच्या धारा आणि प्रसंगी रक्ताचे थेंब सांडून पोट भरताना जीवन जगण्याचे तंत्रज्ञान शिळेवर कोरून गेल्या.
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहूल दादांनी दिलेले चित्र याच जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे होते. काळ अव्याहतपणे पुढे जात असतो. मात्र मागे वळून पाहणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. आपलेच पूर्वज बाहूबलावर काय किमया करू शकत होते याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आजचे गड किल्ले पाहता. वाहतूकीची कोणतीही साधने नसताना, दुर्गम भागात इतकी भक्कम कामे कशी उभारली असतील? आणि त्या कामी कोणाचे हात कसे कुठे लागले असतील? याचा किंचित सूक्ष्म विचार केला तरीही काही पिढ्यांचे योगदान अधोरेखित होईल. समस्त हायकूकारांना मनस्वी शुभेच्छा. वाचन.. चिंतन.. आणि मनन ही त्रिसूत्री पक्की लक्षात असू द्या. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनापासून आभार…!
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©कवी, परीक्षक, सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





