‘चंदनापरी मधुगंध पसरविणारा झिजलेला देह….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘चंदनापरी मधुगंध पसरविणारा झिजलेला देह….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
फार पूर्वीपासून आपल्या मराठी भावगीत प्रकारात एक गाणं प्रसिद्ध आहे….!
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा
झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा
हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा…
अगदी माध्यमिक शाळेपासून तर महाविद्यालयीन स्पर्धा, अध्यापक विद्यालये या ठिकाणी हे गीत हमखास ऐकायला मिळायचे. एकतर त्या गीतातील गोडवा आणि जीवनविषयक साधे सोपे तत्वज्ञान भरलेले हे गीत मनावर नकळत गारूड करून जाते. हे सर्व आठवायचे कारण म्हणजे, ‘मराठीचे शिलेदार’ समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल दादा पाटील यांनी दिलेला ‘झिजलेला देह’, हा विषय.
खरेतर कोडकौतुकाचे बालपण सरताना अवखळ तारुण्य येते…आणि तारुण्याची कैफ सरता सरता कधी जबाबदारीचे ओझे खांद्यावर येते कळतच नाही. शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, संसार, मुलेबाळे, ज्येष्ठांची जबाबदारी अशा एक ना अनेक व्यवधाने सांभाळताना आयुष्य कधी उतरणीला लागतं कळतच नाही. मग कधीतरी मागे वळून बघताना वाटतं, ‘अरे माझं जगायचं राहूनच गेलं की…!’
हातपाय थरथरायला लागतात, केसांच्या बटांमध्ये चंदेरी तारा चमकू लागतात, धावपळीच्या आयुष्यात आहाराच्या वेळा न पाळणे, व्यायामाचा अभाव यांनी शरीरात निरनिराळ्या व्याधींनी आपला जम बसवायला सुरुवात केलेली असते. निरनिराळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या फाईल्सनी कपाटे भरली जातात. एक्सरे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय अशा एक ना अनेक तपासण्यांचे रिपोर्टस् डोक्याभोवती फेर धरून नाचत असतात. काय अशीच असते ना झिजलेल्या देहाची व्यथा…?
खरे आहे, हे झाले स्वतःपुरते. पण या झिजण्यातूनही एक आनंद मिळवायचा असतो तो वरील गीताने आपल्याला योग्यप्रकारे समजावून दिला आहे. ‘झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा’, जीवन असे असावे की, त्यातून आपल्या सेवेचा सुगंध दरवळला पाहिजे. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती आढळतात ज्यांनी अवघे जीवन समाजसेवेसाठी वाहून दिलेले आहे. बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, शंकरबाबा पापळकर यांसारख्या थोर व्यक्तींनी कितीतरी जणांच्या जीवनात प्रकाश पेरलेला आहे. मग झिजलेल्या देहाची व्यथा उरलीच कुठे..अवघा मधुगंधच पसरला की आसमंतात…!
आता जरा समूहातील रचनांकडे वळू या…. समूहातील रचनांचे अवलोकन करताना खरोखरच मन हेलावले. आपले आईवडील रक्ताचे पाणी करून आपल्याला वाढवतात मात्र म्हातारपणी पंख फुटलेली पाखरे या झिजलेल्या देहाला विसरून जातात, कधी हा झिजलेला देह एखाद्या ताटव्याच्या झोपडीत आपला प्राण सोडतो तर कधी वृद्धाश्रमाच्या पायरीवर. मानवी जीवनाची ही कथा तर मूक प्राण्यांची वेगळीच व्यथा…दिनरात शेतकऱ्यासाठी, मालकासाठी झिजलेला देह कत्तलखान्यात नको देऊ असे मूक अश्रूंनी सांगणारा सर्जा राजा वाचताना ह्रदय हेलावून जातं…खरंच आईबाप, निसर्ग, पशुप्राणी आपल्या सुखसोयींसाठी आपला देह झिजवतात त्याची जाणीव आपण कुठेतरी ठेवली पाहिजे. तरच आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळेल, नाही का…?
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





