*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*
*☄विषय : झिजलेला देह☄*
*🍂शनिवार : १५ / मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झिजलेला देह*
जळत होता सरणावर आज
माझा झिजलेला देह शांत…
बिलगून काळजास मात्र माझ्या
खुणावत होता लेकरांचा आकांत
शिकार करण्या भाकरीची
तुडवले पायी सारे रान …
गोबऱ्या पिलांसाठी माझ्या
कष्टलो विसरून देहभान
झाल्या वेदना असंख्य
पेटले होते तन..
पिल्लांकडे बघून
कठोर केले मन
शत्रू होते अनेक..
झेलत राहिलो प्रहार
घराची ढाल मी…
कसा मानणार हार?
कर्तव्यपूर्तीसाठी…
झिजलो जरी चंदनासम
सार्थक झाले जीवनाचे..
उरलो लेकरांच्या संस्कारात
हेची समाधान घेऊन उरात
जळतो आज दिमाखात..
चंदनाच्याच शामियानात…
*सौ. तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
झिजलेला देह देतो
आठवण पूर्वीच्या कष्टाची
केले किती श्रम अपार
चालवण्या घडी संसाराची
कर्तव्यपूर्तीसाठी राबलो
काड्या झाल्या देहाच्या
ताकद ना उरली अंगात
आश्रमी वृद्धापकाळाच्या
पडून राहतो खाटेवर
समोर येईल ते खायचं
आता कुणाला ना चिंता
केल कष्टात पाणी रक्ताचं
झिजलेला देह घेऊन
जगतो दिवस मोजत
एक दिवस जाणे आहे
मग कशाला हिशेब शोधत
घ्या रे काळजी वृद्धांची
नका लोटू त्यांना दूर
जाणा त्यांचे कर्तव्य मनी
वाहू द्या प्रेमाचा पूर
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
अडचणींचा बाऊ नाही
तर मात कर
सांगणारा खमका बाबा,
त्याचे अस्तित्व शिकवण होती
शिकवणीची शिदोरी अजूनही सांभाळली आहे…
का कोण जाणे
कधी रडताना दिसलाच नव्हता
अंगात घामाचा वास होता,
पण बाबा घराचा श्वास होता
एक वेगळाच धाक होता….
तसं घराच्या एका कोपऱ्यात तो गहिवरला होता… लेकीची पाठवणी करताना तो हळहळला होता….
दिसण्यात रुबाब नसेलही कदाचित
पण आमच्या अडचणी पेलण्यासाठी तो ढालच होता…
बाबा अजूनही आठवतो तो दिवस रे,
तुझ्या कोर्टाच्या खटल्याचा निकाल होता…
तो निकाल तू हरला होतास
पण येताना अभ्यासासाठी ऐकविस अपेक्षित प्रश्नसंच आणायला तू विसरला नव्हतास….
आज कळते मला काय हिंमत असेल ती…
बाबा हरलास तरी तू तुटला नव्हतास…
बघते आहे मी तुझा जमिनीवर ठेवलेला तो झिजलेला देह
म्हणावं तर बाबा झिजताना
चंदनालाही मागे टाकाव…
चंदन खोडाची अन बाबाच्या झिजण्याची
शर्यत लागली जरी
तरी शर्यतीत बाबा पहिला होता…
*सौ सुरेखा कोरे नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*.
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झिजलेला देह*
कष्टामुळे देह झिजला,
हाती आली काठी
न समज कर्तव्य त्याला,
केले तुझ्यासाठी
उपसले कष्ट तुझ्यासाठी,
संपती केली जेव्हा
कळेल किंमत तिची,
तुझा देह झिजेल तेव्हा
अपेक्षा बस त्यांची,
मिळावा सहवास तुमचा
जावे नातवंडा सवे,
शेवटचा दिवस त्यांचा
नको त्यांना पुरण पोळी,
आस दोन घासाची
शरीरावर लिपी सांगते,
त्यांच्या कहाणी कष्टाची
जे संस्कार तुम्हावर झाले,
तेच मुलावर होतील
तुम्ही असे नशिबवान,
सेवा करायला मिळतील
*प्रा.बालाजी राजूरकर*
*ता.हिंगणघाट,जि.वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
बाप राबतो शिवारी
त्यास मान वंदनाचा
जरी झिजलेला देह
त्यास गंध चंदनाचा.. //
जीणं जीर्ण गरिबीचे
असे वस्त्रे फाटलेली
राखी मातीशी इमान
माया नसे आटलेली.. //
उभा जन्म दिनरात
जाई शेत शिवारात
वात होवूनी जळतो
यावा उजेड घरात.. //
हसू देण्या लेकरांना
आसू पितो घोट घोट
जरी संसार फाटका
माया ममता अलोट.. //
स्वतः नेसूनी ठिगळ
लेकी बाळी सजवतो
स्वतः राहूनी उपाशी
सारी हौस पुरवितो.. //
नसे खंत कांही खेद
जन्म जाऊ दे दुःखात
हरे सारा शिणभाग
लेक पाहता सुखात.. //
वेळू होवून आढ्याचा
पेले डोलारा घराचा
घोर संकटे रोखण्या
होई उंबरा दाराचा.. //
जातो थकून भागून
मार्गी लेकरा लावून
पाळा पुत्रधर्म खरा
बाप बापाचा होवून.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
ओळख सजीव प्राणी
स्पर्श वेदना आम्हास
अनोखे नाते मातीशी
जुडता नाळ व श्वास
बियांना अंकुर फुटले
जपले सदोदित जेव्हा
फुलण्या जीवन अमुचे
मेहनतीचा हात तेव्हा
रोपट्याचे झाले झाड
आधार दिला जनास
विश्रांती फळ फुलांचा
आनंद मात्र तनमनास
किती सूंदर ती काया
लेवून हिरवागार साज
लहानाचा मोठा वृक्ष तो
डोळ्यासमोर हो आज
सावली देणारा सजीव
आम्ही जिवापरी जपला
पर्णहिन झाला हळूहळू
अन् निष्क्रिय रे वाटला
किती निर्दयी जन हो
घेतला उपभोग त्याचा
झिजलेला देह म्हणुन
अंत केला माणुसकीचा
सुख तू शोधण्यासाठी
कधी शोधशील वाटा
प्रदूषणानाने भवताल
झाला मानवास तोटा
नको ईमारतीचा डोंगर
वृक्ष लावा वृक्षास जगवा
कामा पुरता वापर टाळा
उपकाराची जाणिव ठेवा
*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
डोईवरी भार मोळीचा
पोटात आहे भूक
जीर्ण झाला देह परि
नाही कशाचे सुख
पाखरांनी सोडले घरटे
वळून नाही पाहिले
डोळ्यातली पाणी मग तिने
म्हाताऱ्यासाठी लपविले
कष्ट पाचवीला होते पूजले
नशिबी भोग लिहीलेले
म्हातार्याच्या साथीने परि
हसत सर्व झेललेले
काळाने कुंकवाचा धनी गिळला
जीव तिचा तीळ तीळ तुटला
झिजलेला देह परि तिचा
धन्याच्या आठवणीत आणखी वाकला
चालता बोलता देह सोडीव
हीच इच्छा आता आहे मनी
पैलतीरी धन्याला भेटायला
आसुसली आहे ही जनी
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
सोडून गेला जेव्हा धनी
‘मायेची’ ती ‘बाप’ झाली
कणखरपणे कर्तव्याचे
धीरगंभीर माप ल्याली
लुगड्याला पाडून गाठ
थोपटली पोराची पाठ
काटे अपार कष्टाचे,परी
ओलावले ना पापणकाठ
स्व स्वप्नांची देत आहुती
ओवाळली त्यावर प्रिती
लेकराच्या घासा साठी
जलावरी जागवल्या राती
दिन रात करून एक
हौस भागवली प्रत्येक
त्या आंधळ्या प्रेमापोटी
केली ना कधी रोकटोक
घसरले पाद पाऊले
मन झाले अती बेफाम
कशी आवरावी आता
सैल झालेली ती लगाम?
आधाराच्या हाती आज
मदिराचे बेधुंद…. पेय
चार भिंतीत रडतो आहे
मायेचा तो झिजलेला देह!
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
म्हतारपणी झिजलेला देह
पिकले पान केस पांढरे
निकामी फटांगू अवयव
आता कोंच्या कामाचे रे !!
रोगान पिडीत त्रस्त भोगतो
दुःखाची ना घाई या यमास
खाटेले चिपकी बिमारीच धन
जर्जर जिवाचा व्हई तरास !!
लंगडे पाय चालता येईना
एका जागचे पाय हालेना
कुजलेल खोड येई वास
नकुसे येले वांगुये जिवास !!
रंजवी गांजवी नकु बा सजा
घाई कर ने डंगऱ्याला यमराजा
निरोपपतर धाड मरणाच
वाजव डंगडंग बँङबाजा ||
निपटले लग्नयव पोरापोरीचे
नातु पंतु जाले खंडीभर
सगये आटपले कामधंदे
ने रे आता सरणी शरीर !!
जवानीत यंग झिजवुनी काया
कष्टला बुढा जमौली त्यान माया
केर झाले हाडामांसा पडी आठी
टोंगयाअस्थीच्या घसरी वाटी II
*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
झिजलेला देह
आता पेलवत नाही
हाती आली काठी
पाऊल चालवत नाही
आधार या देहाचा
साथ सोडून गेला
होता सखा सोबती
अवचित निघून गेला
प्रेमाचे दोन मोती
वेळ नाही कोणाला
नको झाले मायबाप
गर्दी झाली वृद्धाश्रमाला
लाड कोडकौतुक किती
या डोळ्यांनी पाहिले
आता झालो कमजोर
नकोसे का झाले
राहू दारात बसून
पडेल ते काम करू
नको देहाची विटंबना
पोटच्या गोळ्या तू करू
रात रात जागविली
मांडीवर तुला घेऊन
नको रे जाऊ असा
बाळा तोंड फिरवून
शेवटचा हा प्रवास
तुझी साथ राहू दे
तू नाही इतरांसारखा
जगाला पाहू दे
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
जबाबदारीच्या ओझ्याखाली झिजलेला
देह मी दाखवू कुणाला
सुदिन येतील का जीवनी
पाझर फुटेल का त्या
दगडाच्या देवाला
मिळेल का सौख्या चा मुलामा
नुसती जखमांची गर्दी
सुखाची चाहूल लागताच
दुःख देऊन जाते वर्दी
रोज मनाला एक आशा
एक खंबीर विश्वास
निराशेचे मळभ सरून
यश मिळेल हमखास
काय झाला गुन्हा माझा
रोजच प्रश्न पडे मनी
संकटांची तुटत नाही मालिका
संघर्षच आहे जीवनी
आता खरंच झिजलेला देह
माझा थोडा विसावा मागतोय
थोड्या क्षणांसाठी का होईना
सुखाची ओंजळ मागतोय …….
*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
नांगराचा फाळ
घामाचा साक्षीदार
बा,सरिसरीत झिजला
तेंव्हा पिकलं शिवारं…..१
होई ढेकळाची माती,
मऊसर रान दिसे
चाले बैलं पांभर
चाड्यावर हसू दिसे…..२
झिजलेला देह,
त्याला कष्टाची झालर
जगण्याची झुंज
चाले रानभर……३
दमलेला देह,
ओढ लागली घराची
रान निजले सांजेत
स्वप्न घेऊन नवतीची….४
काळ्या आईची, कूस
सुख घालते जन्माला
दाणे अंकुरून,
आला बहर तुऱ्याला…..५
झिजलेला देह
त्याला कष्टाची झालर
बा,सरीसरीत मुरला
तेंव्हा पिकलं शिवारं….६
*श्री पैठणकर सर नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
माय म्हणती काय हो,
हा पसारा सोडून गेले,
कोण सांभाळणार हो,
नशिबी तेच माझ्या,
ह्या लेकरांना बाप म्हणून,
सांभाळ केला माय म्हणून,
प्रेम दिले माझ्या हातातला,
क्षीण नाही राहीला कुठे शोधू,
कष्टाचे पाणी एक करून जीव,
पै नाही जोडीला स्वतःसाठी,
समजले नाही हे जग स्वार्थी,
ह्या डोळ्याने अश्रू टिपत गेले,
माणसाची हालचाल आहे,
झिजतात हे हात हातातलं,
मनगटात ताकद नाही काय,
ह्या झिजलेल्या देहाला.
झिजलेल्या देहाला महत्त्व,
एक एक रूपया पै पै जोडुन,
गाठी बांधल्या सोन्याचे दागिने,
असतात हे मोलाचं धन.
माणसाच्या माणुसकीची किंमत,
जिव्हाळ्याच्या, रक्ताच्या नात्यात,
तुझे माझे करत ओढतात हे ओझे,
ह्या झिजलेल्या देहाचे……..
*सौ.नंदा नथ्थुजी कामडी चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
जिजामातेपोटी पुत्र जन्मला
आईच्या छत्रछाये खाली वाढला…
शिवाजी त्याचे नामकरण केले
सारे जण हर्षात,आनंदाने नाचले..
जिजामाताने संस्कार कथा ऐकवल्या
रामायण, महाभारतातली कथा मनावर विम्बवल्या…
दादाजींनी राज्य कारभाराचे शिक्षण दिले
शिवबावर शहाजींनी अतोनात प्रेम केले…
शिवरायांनी मित्रमंडळी, मावळे जमवले
राना वनातून अनेक खेळ खेळू लागले…
मावळ्यांसमवेत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली
सर्व मावळे स्वराज्यासाठी झटू लागली…
कोंढाणा, पन्हाळा अनेक गड जिंकले
मुघल बादशाहीला हादरवून सोडले ….
अनेक स्वामीभक्तांनी प्राण पणास लावले
स्वराज्यासाठी कुटुंबाचा विचार न करता लढले…
शिवरायांनी अफजलखानाचा वध केला
शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याला नमावला…
शूरवीर, गुणवंत, जनतेचा राजा
बाईला छळणाऱ्याला देत असे सजा…
झिजवला देह शिवरायांनी स्वराज्यासाठी
स्वराज्य निर्माण केले जनतेसाठी…
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीत शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*
झिजलेला देह सांगे
गूढ वेदनांची कहाणी
उच्च विचार संगतीला
नशिबात साधी राहणी…!!
सर्व काया झाकलेली
जखमांचे थरावर थर
सोसूनिया दुःख खोल
लटकेच हसू गालावर…!!
आसवांचे ढग निरभ्र
पुनवेची पाहती वाट
संपतील ना त्रासदायी
जीवनातील उंच घाट…!!
जीवनाचा अर्थ कळला
पण उपयोग काय आता
नाही कळली कधी कुणा
देहाची कष्टमय ही गाथा…!!
झिजलेला देह आपला
अनंतात विलीन होईल
तेव्हाच जो तो आपल्या
सत्कार्याचे गोडवे गाईल…!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



