“वस्त्रहरण म्हणजे स्त्रीच्या शिक्षणावर घातलेले निर्बंध व विचारांना लावलेली कुलपे; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“वस्त्रहरण म्हणजे स्त्रीच्या शिक्षणावर घातलेले निर्बंध व विचारांना लावलेली कुलपे; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
इतिहास कधी मरत नाही. तो केवळ आपली वस्त्रे बदलतो. महाभारत संपले, कुरुक्षेत्रावरची धूळ शांत झाली, हस्तिनापूरच्या सिंहासनांवर काळाने शेवाळे चढवले. पण एका स्त्रीच्या आर्त हाकेला काळ आजही विसरू शकलेला नाही. त्या सभागृहात उभी असलेली द्रौपदी ही केवळ एका राजघराण्याची राणी नव्हती. ती स्त्रीच्या अस्मितेचे शाश्वत प्रतीक होती. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण स्त्रीत्वाच्या अपमानाचे मौन अभिषेक होते. त्या दिवशी दुःशासनाने वस्त्रे खेचली, परंतु प्रत्यक्षात उघडे पडले होते समाजाचे विवेकहीन अंतःकरण. फाटली होती धर्माची पताका. कोसळला होता न्यायाचा स्तंभ आणि सिंहासनावर बसलेले सामर्थ्य त्या दिवशी स्वतःच्या दुर्बलतेचे दर्शन घडवत होते.
‘वस्त्रहरण’ हा शब्द जितका देहाशी जोडलेला वाटतो, तितकाच तो आत्म्याशीही निगडित आहे. ‘कारण वस्त्र म्हणजे केवळ कापड नसते, ते माणसाच्या सन्मानाचे आवरण असते’. एखाद्याच्या अंगावरील वस्त्र काढणे हा अपराध असतो. पण एखाद्याचा आत्मसन्मान हिरावून घेणे हा त्याहून भयंकर पातक असतो. आजही चिरहरण सुरू आहे. फक्त दुःशासनाच्या हातातील मूठ बदलली आहे. आज वस्त्रे हातांनी कमी आणि नजरेने अधिक फाडली जातात. शब्दांनी अधिक विदीर्ण केली जातात. संशयाच्या सावल्यांनी अधिक मलिन होतात. समाज माध्यमांच्या पडद्यावर एका क्षणात एखाद्या स्त्रीचे आयुष्य उघडे पाडले जाते. अफवांच्या वादळात तिचे व्यक्तिमत्त्व भरकटते. चारित्र्याच्या नावावर तिच्यावर दगड फेकले जातात. तिच्या यशामागे तिची गुणवत्ता नसून संशय शोधला जातो. तिच्या स्वप्नांना परंपरेच्या साखळदंडात जखडले जाते.
आजच्या स्त्रीचे वस्त्रहरण म्हणजे तिच्या शिक्षणावर घातलेले निर्बंध. तिच्या विचारांना लावलेली कुलपे. तिच्या स्वातंत्र्यावर उभारलेल्या अदृश्य भिंती. तिच्या आवाजाला दिलेली उपहासाची शिक्षा. आणि सर्वांत वेदनादायी म्हणजे तिच्या वेदनेवर समाजाने ओढलेली मौनाची चादर. कधी कधी वाटते, महाभारत संपलेच नाही. प्रत्येक घरात थोडासा धृतराष्ट्र आहे जो पाहू इच्छित नाही. प्रत्येक चौकात एखादा दुःशासन आहे.जो अपमानात पराक्रम शोधतो. प्रत्येक गर्दीत काही भीष्म आहेत ज्यांना सत्य दिसते, पण ते मौनाला धर्म समजतात. आणि प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणात एक द्रौपदी आहे जी न्यायासाठी अजूनही आकाशाकडे पाहते.
समाजाचा ऱ्हास कधी एका पाप्यामुळे होत नाही होतो तो सज्जनांच्या मौनामुळे, अन्याय करणारा तलवारीने जखम करतो पण अन्याय पाहून गप्प बसणारा विवेकालाच मृत्यू देतो. “स्त्री ही घराची शोभा नसते तर ती घराला घरपण देणारी प्राणशक्ती असते”. ती संस्कृतीची वाहक असते. तिच्या कुशीत भविष्य वाढते. तिच्या मायेने मानवतेला भाषा मिळते. तिच्या त्यागाने इतिहासाला दिशा मिळते. म्हणून तिच्या सन्मानाचे रक्षण करणे हा केवळ सामाजिक नियम नाही. तो संस्कृतीचा प्राणवायू आहे.
आज गरज कृष्णाच्या चमत्काराची नाही, गरज आहे कृष्णाच्या धैर्याची. प्रत्येक अंतःकरणात असा एक स्वर जागा झाला पाहिजे, जो अन्यायासमोर निःशब्द राहणार नाही. प्रत्येक हात असा उभा राहिला पाहिजे, जो अपमानाला थोपवेल. प्रत्येक डोळा असा जागा झाला पाहिजे, जो स्त्रीकडे देह म्हणून नव्हे, तर चेतनेच्या तेजस्वी रूपात पाहील.
लक्षात ठेवू या…. सभ्यता रस्त्यांच्या रुंदीवर मोजली जात नाही. ती स्त्रीच्या चालण्यातल्या निर्भयतेवर मोजली जाते. संस्कृती मंदिरांच्या उंच कळसांत नसते. ती स्त्रीच्या डोळ्यांतील निःशंक विश्वासात असते. आणि राष्ट्राची महानता शस्त्रांच्या सामर्थ्यावर नव्हे, तर स्त्रीच्या सन्मानाच्या सुरक्षिततेवर उभी असते. म्हणून इतिहासातील द्रौपदीला विसरू नका. ती आजही जगते आहे कधी मुलीच्या रूपात, कधी विद्यार्थिनीच्या, कधी आईच्या, कधी सहकाऱ्याच्या, तर कधी आपल्या स्वतःच्या अंतःकरणातील अस्मितेच्या रूपात. ज्या दिवशी प्रत्येक स्त्रीच्या कपाळावर भीतीऐवजी स्वाभिमानाचे तेज झळकेल, ज्या दिवशी तिच्या पावलांना संशय नव्हे तर सन्मानाची वाट मिळेल, आणि ज्या दिवशी अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच समाजाची सहज वृत्ती बनेल त्या दिवशी महाभारताचा शेवट खऱ्या अर्थाने होईल.
तोपर्यंत… प्रत्येक अपमानित स्त्रीच्या डोळ्यांत द्रौपदीचे अश्रू असतील, प्रत्येक निःशब्द समाजात भीष्माचे मौन असेल, आणि प्रत्येक सजग अंतःकरणात कृष्ण जन्म घेण्याची प्रतीक्षा करत असेल. आज मनातील सर्व बाहेर येण्याचे कारण म्हणजे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने दिलेला ‘चिरहरण’ हा विषय. आपण सर्व कवी, कवयित्रींनी विषयाला न्याय देत सर्वोत्तम रचना साकारल्यात. आपणा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन लेखणीस विराम देते.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



