“सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लेखनासाठी समरसता हवी”; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

“सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लेखनासाठी समरसता हवी”; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे, (दि ६ ऑगस्ट): सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लेखन करणा-या साहित्यिकांनी सामाजिक समरसतेवर भर दिलाच पाहिजे. राष्ट्रहित प्रथम हे अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून साहित्यिकांनी लेखनाबरोबर राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे. बंधुता, समानता, समादर, राष्ट्रप्रेम , करुणा आदि शब्द केवळ लेखनात आणून उपयोग नाही, ते शब्द प्रत्यक्ष कृतीत आणायला हवेत. जे लिहिता ते जगा, जे जगता ते लिहा. असे प्रतिपादन 18 व्या साहित्य गौरव संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, साहित्य गौरव संस्थेच्या निमंत्रक मधुकर्णिका सासवडे, मेघना मधुसूदन घाणेकर, ज्येष्ठ ज्योतिर्विद विजय जकातदार आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते संघ कार्यासाठी मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर ब्रम्हनाथकर (लेखक आणीबाणीतले ते दिवस ), ॲड.मिलिंद चिंधडे ( संघ प्रचारकांवरील लेखन ), सुहास समुद्र ( काव्यलेखन श्रीराम ) यांना 2026 चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढत आहे. 2014 पूर्वी भारताला युध्दसामुग्री आयात करावी लागत होती, आता भारत निर्यात करु लागला आहे.भारताची वाढती आत्मनिर्भरता नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.भारत पूर्णपणे बलशाली होण्यासाठी साहित्य -कला- सांस्कृतिक संमेलनांबरोबर शक्तिशाली संमेलनेही आयोजित करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी सांगितले.
संमेलनानिमित्त डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी या अनियतकालिकाच्या 1161 व्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मधुकर्णिका सासवडे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रा.स्मिता गिरी, डाॅ. सविता महाडिक, मकरंद घाणेकर, मंदाताई नाईक, श्रीनिवास तेलंग, अशोक सुलाखे , शैलजा सोमण, ॲड.संध्या देशपांडे ,वसुधा नाईक , स्वानंद समुद्र, डाॅ. राहुल भोसले , विलास बाबर , एम.अजया, वृंदा भांबुरे, प्रिया दामले , राजश्री सोले, अनघा सावनूर , मंजुषा लोंढे आदि सुमारे 40 मान्यवर साहित्यिकांना डाॅ.मधुसूदन घाणेकर, काशिनाथ देवधर या मान्यवरांच्या शुभहस्ते 2026 चा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.



