“जगमान्य कासवगतीच ती …यशापर्यंत पोहोचणारी”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“जगमान्य कासवगतीच ती …यशापर्यंत पोहोचणारी”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘कासवगती’ शब्द ऐकला की, आठवते ते ‘ससा व कासव’ यांच्या शर्यतीची गोष्ट. आणि त्याच्यावर आधारित असणारे गाणे…
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू अन् डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली….ससा
हे गाणे ऐकताना अजूनही बालपणात हरवण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो. लहानपणापासून ऐकत आलेली ही गोष्ट आजही बाल चिमुकल्यांना सांगताना कोण आनंद मिळतो याचे वर्णन अवर्णनीयच ! आजही ससा आणि कासव ही गोष्ट सांगताना ससा हरलाच कसा? हा प्रश्न मनाला कुठेतरी शिवून जातो. तर या गोष्टी मागच्या तात्पर्याचा जर विचार केला तर कोणत्याही कामामध्ये घाईगडबड न करता अविरत आणि सतत प्रयत्न करत जर राहिले तर यश प्राप्ती नक्कीच होते हाच संदेश कासवामार्फत दिला गेला आहे. तसेच अल्लडपणा, हुल्लडबाजी , चंचल मनोवृत्ती, घाई गडबड करून कोणतेही काम नीट न होता ते काम पुढे चालून कसे बिघडते हे सशाच्या रूपाने दाखवले गेले आहे. सुरुवातीला उत्साहाने कष्ट करायचे आणि नंतर सोडून द्यायचे यामुळे जीवनात असफलता प्राप्त होते.
काही दिवसानंतर या कथेचा पुढचा भाग आला. विचारवंतांनी विचार केला की ससा हरलाच कसा ? मग पुढे सशाने विचार केला आणि परत कासवाकडे जाऊन म्हणाला आपण शर्यत लावूया. कासव म्हणाले एक वेळा हरलास ना ? पोट भरले नाही का ? ससा म्हणाला ..नाही, चल आणखी शर्यत लाव. यावेळी मात्र ससा जिंकला. मग कासव विचार करू लागले. कासव म्हणाले, ‘चल आणखी एकदा शर्यत लावू’, पण यावेळी रस्ता मात्र मी निवडणार. ससा म्हणाला एक वेळा हरलो म्हणून काय झाले परत परत तीच चूक होईल असे वाटते का? कासव म्हणाले, नाही.. परंतु एक वेळा शर्यत लावूच. परत शर्यत लागली पण रस्ता मात्र कासवाने निवडला तळ्याच्या पलीकडे. तळ्यापर्यंत ससा पळत पळत गेला आणि तिथेच थबकला.
पुढे कसे जायचे? कासव हळूहळू चालत तिथपर्यंत आले सशाला म्हणाले चल माझ्या पाठीवर बस आणि दोघांनी मिळून रस्ता पार केला. या पुढच्या जोडलेल्या कहाणीतून हे शिकायला मिळते की अडचण येईल तेव्हा ज्याच्याकडे क्षमता आहे त्यांनी सावरून घेतले तर विजय हा सर्वांचाच होतो. कोणाही एकाचा नाही. ‘कासवगती’ म्हणजे नियमित प्रयत्न आणि सराव करणे होय. ‘मराठीचे शिलेदार’ समूहातील शिलेदार पण असेच कासवगतीने का होत नाही, पण बालकविता लिहिण्याचा छान प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी भरभरून शुभेच्छा. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



