लेखणीचा विजय ! बातमीचा सूड घेण्यासाठी युवा पत्रकारावर रचला खोटा बनाव
६ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर युवा पत्रकार अखिल रोडे यांची निर्दोष मुक्तता
लेखणीचा विजय ! बातमीचा सूड घेण्यासाठी युवा पत्रकारावर रचला खोटा बनाव
६ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर युवा पत्रकार अखिल रोडे यांची निर्दोष मुक्तता
अॅड. अमोल हुंगे यांचा प्रभावी युक्तिवाद; पत्रकाराला अडकवण्याचा कट उधळला उमरेड न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर/ उमरेड (प्रतिनिधी): (दि २६) लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर घाला घालत, एका निर्भीड युवा पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अखेर फसला आहे. बेकायदेशीर दारू विक्रीची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून युवापत्रकार अखिलेश उर्फ अखिल राजू रोडे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या ३२४ च्या गुन्ह्यातून त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उमरेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर. एस. मानकर यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला.
काय होते प्रकरण?
युवापत्रकार अखिल रोडे यांनी महिला तक्रारदाराच्या दुकानातून होणाऱ्या बेकायदेशीर दारू विक्रीबाबतची बातमी धडाक्याने प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे महिला तक्रारदाराचे अवैध धंदे चव्हाट्यावर आले होते. याचाच सूड उगवण्यासाठी तक्रारदाराने अखिल रोडे यांनी आपल्याला धोकादायक शस्त्राने मारहाण केली आणि शिवीगाळ केली, असा बनाव रचून भारतीय दंड संहिता कलम ३२४ आणि ५०४ अन्वये बेला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
६ वर्षे, २ महिने आणि १४ दिवसांचा संघर्ष:
हा खटला तब्बल ६ वर्षांहून अधिक काळ चालला. या प्रदीर्घ कालावधीत अखिल रोडे यांना मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, “सत्य परेशान हो सकता है, पराजित नही” या उक्तीप्रमाणे त्यांनी आपला न्यायालयीन लढा सुरू ठेवला. द्वितीय संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (J.M.F.C.), उमरेड यांच्या न्यायालयात यावर अंतिम सुनावणी झाली.
अखिल रोडे यांच्या वतीने अॅड. अमोल हुंगे आणि अॅड. गंगाधर हुंगे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध केले की, महिला तक्रारदाराने केवळ बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून हा खोटा गुन्हा दाखल केला. घटनेच्या वेळी सांगण्यात आलेली वेळ आणि प्रत्यक्ष पुरावे यात मोठी तफावत आहे. फिर्यादी पक्षाचे साक्षीदार विश्वासार्ह नसून ते केवळ सूड भावनेने साक्ष देत आहेत.
सरकारी वकील जे. एम. बोरकर यांनी मांडलेल्या पुराव्यांमधील त्रुटी अॅड. हुंगे यांनी अत्यंत कौशल्याने खोडून काढल्या.
न्यायालयाचे निरीक्षण आणि निकाल:
सर्व साक्षी-पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश आर. एस. मानकर साहेब यांनी नमूद केले की, आरोपीविरुद्ध लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे. उलट, पुराव्यांवरून असे दिसून आले की, बेकायदेशीर दारू विक्रीच्या बातमीमुळेच हा वाद उद्भवला होता. परिणामी, न्यायालयाने युवापत्रकार अखिल रोडे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
पत्रकार वर्तुळात आनंदाचे वातावरण:
या निकालामुळे बेला, उमरेड आणि नागपूर जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे. भ्रष्ट प्रवृत्तींविरुद्ध लिहिणाऱ्या लेखणीला या निकालामुळे बळ मिळाले असून, अॅड. अमोल हुंगे यांच्या कायदेशीर कौशल्याचेही कौतुक होत आहे.
“६ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर माझी निर्दोष मुक्तता झाली. न्यायालयाच्या तारखांमुळे होणारी मानसिक ओढाताण मी शब्दांत सांगू शकत नाही. अन्यायाविरुद्ध लिहिणाऱ्या लेखणीला जेव्हा स्वतःचा न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, तेव्हा मनावर होणारे घाव खोल असतात. बातमीचा सूड घेणाऱ्यांना न्यायालयाने चपराक दिली आहे. केवळ अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठवला आणि बातमी छापली म्हणून मला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न झाला. हा विजय माझा वैयक्तिक नसून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आणि माझ्या लेखणीचा आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला हा निकाल बळ देणारा ठरेल. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे वकील अॅड. अमोल हुंगे आणि पत्रकार बांधवांचा मी ऋणी आहे.”
अखिल रोडे, युवा पत्रकार उमरेड



