Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसंपादकीयसांगली

जीवन हे त्याग, करुणा आणि सेवाभावाची प्रेरणादायी प्रकाशज्योत; वृंदा करमरकर

सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

0 6 4 1 8 7

जीवन हे त्याग, करुणा आणि सेवाभावाची प्रेरणादायी प्रकाशज्योत; वृंदा करमरकर

सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण

मानवी जीवनात प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘प्रकाश म्हणजे केवळ अंधार दूर करणारा तेजस्वी किरण नव्हे, तर तो ज्ञानाचे, आशेचे, सकारात्मकतेचे आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे’. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देणारी प्रकाशज्योत ही मानवी जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. म्हणूनच ‘प्रकाशज्योत’ हा शब्द केवळ भौतिक प्रकाशापुरता मर्यादित न राहता त्याला व्यापक भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थ प्राप्त होतो. निसर्गात सूर्य, चंद्र, तारे आणि अग्नि हे प्रकाशाचे प्रमुख स्रोत आहेत. सूर्याच्या आगमनाने सृष्टीला नवी ऊर्जा मिळते. रात्रीच्या काळोखात चंद्राचे शीतल चांदणे मनाला प्रसन्न करते, तर आकाशातील चांदण्यांची लुकलुक आशेचे संकेत देते. एखाद्या अंधाऱ्या खोलीत लावलेला छोटासा दिवासुद्धा संपूर्ण वातावरण उजळून टाकतो. त्याचप्रमाणे जीवनातील निराशा, दुःख आणि संकटांच्या अंधारात आशेची एक छोटीशी ज्योतही जगण्याचे बळ देऊ शकते.

मानवी जीवनात काही व्यक्ती प्रकाशज्योत बनून इतरांचे आयुष्य उजळवतात. आई-वडील मुलांच्या जीवनातील संस्कारांचे दीपस्तंभ असतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञान दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. समाज सुधारक, संत, महात्मे आणि विचार वंत आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा देतात. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा प्रकाश समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविला.

अनाथांची माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून हजारो अनाथ मुलांना मायेची सावली दिली. स्वतःच्या दुःखाचे रूपांतर त्यांनी इतरांच्या आयुष्यातील आनंदात केले. त्यांचे जीवन हे त्याग, करुणा आणि सेवाभावाची प्रेरणादायी प्रकाशज्योत आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षणामुळे प्रगतीचे नवे मार्ग खुले झाले आहेत. तरीही अंधश्रद्धा, अज्ञान, जातीयता, भ्रष्टाचार, स्त्री-पुरुष विषमता आणि सामाजिक भेदभाव यांचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत विवेकाची, मानवतेची आणि सामाजिक बांधिलकीची प्रकाशज्योत प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित होणे आवश्यक आहे.

केवळ स्वतःचे जीवन उजळविण्या पेक्षा दुसऱ्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी माणुसकी आहे. प्रकाश ज्योत आपल्याला स्वार्थापेक्षा परमार्थाची, निराशेपेक्षा आशेची आणि द्वेषापेक्षा प्रेमाची शिकवण देते. “तमसो मा ज्योतिर्गमय” हा उपनिषदांतील अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी मंत्र आहे. याचा अर्थ ‘हे परमेश्वरा, मला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल.’या मंत्राचा जागर होणे गरजेचे आहे.एका दिव्यापासून हजारो दिवे प्रज्वलित झाले तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे ज्ञान, प्रेम, सद्भावना आणि माणुसकी वाटल्याने ती कमी होत नाही, उलट अधिक वृद्धिंगत होते.

दिवाळीच्या निमित्ताने आपण घरासोबत मनही उजळवले पाहिजे. ‘पणत्या लावणे म्हणजे केवळ परंपरा जपणे नव्हे,तर जीवनात सकारात्मक तेचा प्रकाश पसरवण्याचा संकल्प करणे होय’. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, प्रकाशज्योत ही केवळ पणतीच्या ज्योतीपुरती मर्यादित नसून ती माणसाच्या विचारांत, संस्कारांत आणि कृतीतही तेवत असावी. स्वतः जळून इतरांना प्रकाश देणाऱ्या दीपाप्रमाणे आपणही आपल्या ज्ञानाने, प्रेमाने, त्यागाने आणि माणुसकीने इतरांचे जीवन उजळवावे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे आणि स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणारी ही प्रकाशज्योत प्रत्येकाच्या अंतःकरणात अखंड तेवत राहो. कारण अंधाराला दोष देण्यापेक्षा एक छोटीशी ज्योत पेटवणे अधिक महत्त्वाचे असते. हाच प्रकाशज्योतीचा खरा संदेश आणि जीवनाचा सुंदर ध्यास आहे!

वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 1 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे