मतदान केंद्रस्तरीय अधिका-यास नागरिकांनी सहकार्य करावे; मुख्य निवडणूक अधिकारी
जी. बारसागडे, शहर प्रतिनिधी
मतदान केंद्रस्तरीय अधिका-यास नागरिकांनी सहकार्य करावे; मुख्य निवडणूक अधिकारी
कागदपत्रे जमा करायला आता ‘बीएलओ’ येणार घरोघरी
जी. बारसागडे, शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर, (दि ०१): भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे दिनांक २६.०९.२०२६ रोजीचे प्रसिध्दीपत्रक तसेच त्याअनुषंगाने त्यांच्या दिनांक २९.०९.२०२६ च्या पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता, जुळवणी न झालेल्या (No Mapping) किंवा जुळवणी मध्ये तार्किक विसंगती असलेल्या (Logical Discrepancy) ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या असतील व सुनावणीस उपस्थित राहण्यास सुचित केले असेल तरीही आयोगाच्या सुधारीत सुचनांनुसार त्यांना प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहण्याची आवश्यकता नाही.
नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ते कागदपत्र जमा करुन घेतील व त्याआधारे मतदार नोंदणी अधिकारी / सहायक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील. नोटीस प्राप्त झालेले मतदार व्हाट्सअॅपच्या माध्यमातुन सुध्दा संबंधित BLO कडे आवश्यक कागदपत्र/पुरावे सादर करु शकतील. तार्किक विसंगती असलेल्या मतदारांकडून केवळ सदर विसंगतीशी संबंधित कागदपत्रे प्राप्त करुन घेऊन किंवा BLO चा पडताळणी अहवाल / पंचनामा याद्वारे निर्णय घेण्यात येईल.
केवळ अपवादात्मक प्रकरणी (विहित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्राच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसल्यास) संबंधित मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी मतदाराची शक्यतो ऑनलाईन पध्दतीने सुनावणी घेतील. या सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबियातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीस हजर राहता येईल. मतदार नोंदणीसाठी दिनांक ०३,०४,१० व ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरामध्ये सुध्दा नोटीस प्राप्त मतदार आपली कागदपत्रे सादर करु शकतील.
बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील विशेषतः PVTG गटात्तील व्यक्ति, अनाथ गटातील मतदार इ. असुरक्षित गटातील मतदारांकरिता विशेष शिबीरे / मदत कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार मतदार यादीत समावेशनापासून वंचित राहणार नाही याकरिता विशेष काळजी घेण्याचे निर्देश सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
तसेच पर्याप्त पुरावे उपलब्ध नसलेल्या किंवा प्राप्त कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसलेल्या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यापूर्वी मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संधी देणे, सुनावणी घेणे व आदेश पारीत करणे ही कार्यवाही करण्यात येईल. मतदारांशी संपर्क करण्यासाठी व कागदपत्रे जमा करुन घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींशी समन्वय ठेवतील. सर्व संबंधित मतदारांनी कागदपत्रे जमा करण्यास येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (BLO) सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.



