ईडन गार्डन वर भाजपची डबल सेंच्युरी; डॅा अनिल पावशेकर
स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर, नागपूर

ईडन गार्डन वर भाजपची डबल सेंच्युरी; डॅा अनिल पावशेकर
स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर, नागपूर
देशभरात नुकत्याच पाच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून भाजपने ही मालिका ३/२ अशी आपल्या नावे केली आहे. यापैकी प्रचंड चुरशीच्या आणि चित्तथरारक लढतीत भाजपने बंगालची वाघीण अर्थातच पुरोगाम्यांची लाडकी दीदी असलेल्या ममतांचा सपशेल पराभव केला आहे. ममतांच्या दिड दशकांच्या राजवटीचा मोदी, शहांच्या रणनिती पुढे टिकाव लागला नाही आणि भाजपने ईडन गार्डन वर दणदणीत डबल सेंच्युरी म्हणजेच दोनशेच्या वर जागा जिंकून प.बंगालवर भगवा फडकवला आहे.
झाले काय तर प.बंगाल म्हटले की त्यावर पहिले कम्युनिस्ट आणि नंतर ममतांची पोलादी पकड होती. परंतु या दोघांचेही राजकीय तन पोलादी आणि मन अपराधी होते. जणु काही आपल्याला चरायला मोकळे कुरण मिळाल्यासारखे या दोघांनीही राज्याची वाट लावली होती. मग ते बेरोजगारी असो उद्योगधंदे असो की सामाजिक वातावरण असो. मात्र धर्मांधांना कुरवाळण्यात दोघेही एक से बढकर एक होते. कोण धर्मांधांचे जास्त लांगुलचालन करतो यात स्पर्धा असायची. या दोन्ही काळ्याकुट्ट राजवटीत सर्वात जास्त हाल झाले, दमन झाले ते हिंदूंचे.
मां, माटी, मानुषचा नारा देत कम्युनिस्टांकडून सत्ता हस्तगत केल्यावर ममतांनी तिची आभाळागत माया धर्मांध, बांगलादेशी घुसखोर आणि रोहींग्यावर कायम ठेवली. या राष्ट्रद्वेषी त्रिकुटांसाठी ममतांचे राज्य जणुकाही त्यांचे माहेरघर होते. यांच्या एकगठ्ठा मतांमुळे ममतांनी बंगालवर दिड दशक राज्य केले. मात्र या काळात हिंदू, त्यांचे सण, उत्सव आले की त्यावर ममतांची वक्रदृष्टी व्हायची. आपल्या देशात, आपल्या राज्यात हिंदू परांगदा व्हायची वेळ आली होती. धर्मांधांना हाताशी धरून ममतांनी हिंदूंचे मनसोक्त दमन केले होते.
दिवसेंदिवस ममतांची राज्यावर पकड जशी मजबूत होत गेली तशी तिने केंद्रावर वरचढ होण्याचा प्रयत्न केला, केंद्राला डोळे दाखवू लागली होती, जुमानत नव्हती . मग ते केंद्रीय पथकाला राज्यात मज्जाव करणे असो की महत्वाची कागदपत्रे घेऊन चोरासारखे पळणे असो. हम करे सो कायदा या न्यायाने तिने बंगालची पिळवणूक केली होती. ममतांचा शासकीय अत्याचार पाहून सगळेच हतबल झाले होते पण हे चक्रव्यूह तोडणे काळाची गरज होती. एकतर सरळसरळ राष्ट्रपती राजवट लागू करणे किंवा ममतांचा पराभव करणे हे दोन पर्याय होते. राष्ट्रपती राजवट लावली असती तर झाडून पुसून यच्चयावत पुरोगामी, विरोधक देशभर उघडेनागडे नाचले असते. मोदी, शहांनी हिटलरशाही आणली म्हणून दिवसरात्र नंगानाच केला असता.
ममता म्हटले की धरले तर चावते, सोडले तर पळते अशी अवस्था झाली होती. शेवटी भाजपने सोयऱ्याच्या जोड्याने विंचू मारायचे ठरवले आणि त्यात ते १००% यशस्वी झाले. परिकथेतल्या राक्षसाप्रमाणे ममतांचे राजकीय प्राण दडले होते अवैध मतदार, धर्मांध, बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यात. यासोबतच शासन, प्रशासन आणि राज्यभर विणलेले तिचे तृणमूल कॉंग्रेसचे जाळे यामुळे ममतांना तिच्या बालेकिल्ल्यात मात देणे अशक्य कोटीतली बाब होती. मात्र केंद्राने, निवडणूक आयोगाने ममतांची ही खेळी ओळखून एसआयआर नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले, जे ममता नावाच्या भस्मासूरावर तंतोतंत लागू पडले.
एसआयआर लागू होताच ममतांचा तिळपापड झाला आणि इथेच तिच्या बालेकिल्याचे बुरूज ढासळायला सुरुवात झाली. लाखो अवैध मतदार वगळल्याने मतदार याद्या स्वच्छ झाल्या. मात्र तरीदेखील मिशन बंगाल सर करायला ग्राऊंड लेव्हलवर बरेच काम बाकी होते. शासकीय यंत्रणेव्यतिरिक्त ममतांची तृणमूल फौज निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी करण्यात पटाईत होती. शिवाय ममता सैनिकांची तिथे इतकी दहशत होती की निर्भयपणे मतदान होणे कठीण होते. जनतेला ममतांच्या क्रौर्याचा अंदाज असल्याने जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होणे गरजेचे होते. निवडणूका शांततेत, निकोप वातावरणात आणि निर्भयपणे पार पाडणे याची जबाबदारी केंद्र आणि निवडणूक आयोगाची होती.
ममतांच्या तृणमुलचे तिलिस्म भेदण्यासाठी अखेर राज्यात केंद्रीय राखीव दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या. लातों के भुत बातोंसे नहीं मानते हे सुरक्षा यंत्रणेला वेगळे सांगायची गरज नव्हती. ममतांच्या गुंडांचा पद्धतशीरपणे पाहुणचार करण्यात आला. स्थानिक भ्रष्ट यंत्रणेला या निवडणुकी पासून दोन हात दूर ठेवण्यात आले. जागोजागी सुरक्षा बल तैनात असल्याने जनतेने निर्भयपणे मतदान केले. न भुतो न भविष्यती, छप्परफाड मतदान झाले, दिड दशकापासून दडपलेल्या जनभावनेचा ज्वालामुखी फुटला आणि प.बंगाल मध्ये कमळ फुलले.
अपहरण, अत्याचार, दडपशाही, धर्मांधतेचा कळस गाठलेल्या राजकीय सत्तेला जनतेने प्रचंड उत्साहाने सुपुर्दे खाक केले. हेकेखोर, जिद्दी, तिरकस आणि हिंदूंचा दु:स्वास करणाऱ्या ममतांना जनतेच्या रागाचा सामना करावा लागला. ममतांना त्यांचे कर्मफळ भोवले. प.बंगाल मध्ये ममतांचे क्रूर संस्थान जनतेने खालसा करताच देशभरातील हॅपी इंडेक्स मध्ये अचानक वाढ झाली. सुटलो बुवा एकदाचे अशी परिस्थिती झाली. प.बंगाल जिंकणे हे केवळ भाजपसाठीच नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचे होते. कारण ममतांनी प.बंगालला बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यासाठी गेटवे ॲाफ इंडिया करून ठेवले होते. पुर्वोत्तरातील सात राज्यात समन्वय आणि देशाच्या सुरक्षेसाठी ममतांचा पराभव व्हावा ही देशभरातील राष्ट्रवादी जनतेची इच्छा होती. त्याला प.बंगालच्या जनतेने उदंड प्रतिसाद दिला.
प.बंगाल सर करायला भलेही भाजपला अनेक वर्षे लागलीत पण शेवटी तिथले कार्यकर्ते, नेते आणि जनतेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सोबतच मा. पंतप्रधान आणि अमित शहांनी जी रणनिती आखली, त्याला मुर्तरूप दिले, सोबतच भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी जो घणाघाती प्रचार केला, त्याला तोड नाही. प.बंगाल पाठोपाठ आसाम मध्येही कमळ फुलले असून मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांची तिथे जादू अजूनही कायम आहे. सोबतच पुडुचेरी विधानसभेतही भाजपला बहुमत मिळाले आहे. एकंदरीत काय तर केरळ, तामिळनाडू वगळता, प.बंगाल आसाम आणि पुडुचेरी येथील जनतेने भाजपला आपला कौल दिला आहे. विरोधकांना पुरून उरत भाजप पुन्हा एकदा राजकारणात धुरंधर ठरला आहे.
—————————————————
दिनांक ०६ मे २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————



