प्रेमरूपी पवित्र नातं जपायला ‘आत्मबंधनाची’ गरज; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
प्रेमरूपी पवित्र नातं जपायला ‘आत्मबंधनाची’ गरज; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
ए प्रिय सख्या..नसू दे मला जेवणात पंचपक्वानं. महागड्या साड्या, गाडी बंगला नकोय मला..! नकोय मला कोणतच भौतिक सुख. मला गरजच नाही याची. तुझ्या झोपडीत मी सुखी आहे..अगदी तशी…..!!
संत तुकडोबा महाराजांनी म्हटलं होतं तसं….
राजास जी महाली,सौख्य कधी मिळाली..
ती सर्व प्राप्त झाली,या झोपडीत माझ्या ||
असू दे माझ्या माहेरची ती गर्भ श्रीमंती. ज्या दिवशी मी तुझ्यासोबत विवाह बंधनात बांधली गेली, त्या दिवशी मी सारं विसरली. माझ्या प्रेमबंधनात मुळी स्थान नव्हतंच अशा गोष्टींना. अरे वेड्या, प्रेम बंधनात तर होतोच आपण. नंतर विवाहबंधन आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुझ्या न् माझ्या मनानं एकमेकांशी बांधलेलं तुझं अन् माझं आत्मबंधन…!!
होय रे सजना….मला मान्य आहे, चुका होतात कधी आपल्याकडून, कधी मी…. तर कधी तू चुकतो…पण एकमेकांना सांभाळणारं हे बंधन आपली संसाररूपी नौका पैलतीरावर नेईल यात मला शंकाच नाही. ठेच एकाला लागली तर वेदना दुसऱ्याला….यालाच म्हणतात ना आत्मबंधन…ती राधा किती निर्व्याज प्रेम करायची कृष्णावर. अगदी अगदी तसंच माझ प्रेम आहे तुझ्यावर….! तू माझा श्वास नाही, तर श्वासातला प्रत्येक अंश आहेस. ‘या प्रेमरुपी पवित्र बंधनात आपण एकमेकांना जपूया, सांभाळूया.. काळजी घेऊ या ना’. सोड ना राग आतातरी….करशील ना तू मला मदत आपली प्रेमबाग फुलवायला… तिला येणारा बहर नक्कीच आपलं प्रेमांगण सजवेल…तू फक्त विश्वास ठेव.
अरे आत्मबंधनात खरी आत्मीयता आहे. प्रेम आहे,जिव्हाळा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्याप्रती माझी असलेली खरी प्रीती आहे. होय, या आत्म..सोबत येणारे आत्मचिंतन, आत्मप्रतिबिंब,आत्मनियंत्रण,आत्मजागरूकता ,आत्मभाव ,आत्मनिर्भरता,आत्मसाक्षात्कार, आत्मविश्वास,आत्मसन्मान ,
आत्मपरिचय ,आत्मकथा,आत्मचिंतन…. येऊ दे कितीही. पण या आत्मसोबत खऱ्या अर्थाने शोभून दिसतं ते तुझं आणि माझं आत्मबंधनच…!
प्रिय सारस्वत कवी, कवयित्रींनो आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर यांनी ‘आत्मबंधन’ हा आगळावेगळा विषय दिला आणि सर्वच समूहात सर्वांच्या लेखणीने भरारी घेतली सर्वजण आपापल्या परीने व्यक्त झालात. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन..अभिनंदन..अभिनंदन.
पण थोडं काही… कविता म्हणजे मनातील कल्पनेची कळी असते, तेव्हा तिला हलकेच मनात तरंगत येऊ द्या. कधी मस्त निखळ मुक्त आनंद तर कधी राग, क्रोध,अन्यायाची चिड, संताप, भेदभावाची खदखद या भावनांना अक्षरांचे कोंदण देऊन उतरवा भरभर. ज्या प्रवाहीपणे कविता मनात घालमेल घालते त्याच प्रवाहीपणे तिला प्रसवू द्या.माठातील पाण्यात वाळा टाकल्यावर ते पाणी पितांना जो सुवास नाकात दरवळतो तशी भावरूपता काव्यात उमटवा. मग बघा आपली कविता किती उंचीवर जाते. विविध भावनांचे रंग दाखवण्यासाठी आपणास माझ्या खूप खूप शुभेच्छा.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





