“कल्पनेच्या कुंचल्याचा अद्भूत अविष्कार म्हणजे जिवंत चित्रकारीता”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“कल्पनेच्या कुंचल्याचा अद्भूत अविष्कार म्हणजे जिवंत चित्रकारीता”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
कल्पनेतून स्वप्न की, स्वप्नातून कल्पना जन्मते हे सांगणे खूप कठिण आहे. मात्र निसर्गाने या दोन गोष्टीचे दान काही व्यक्तींना इतके भरभरून दिलेले असते की, या माध्यमातून त्या व्यक्ती इतर लाखो व्यक्तींना स्वप्नरंजन किंवा कल्पनेच्या कुंचल्याचे जादूई दर्शन घडवत असतात. आणि यामुळेच माणूस स्वतःच्या वैयक्तिक ताणतणावातून किंवा मानसिक घुसमटीतून काही क्षणांचा सुखद विरंगुळा मिळवू शकतो. म्हणून तर कुणीतरी म्हंटले आहे की, माणूस स्वप्नावर जगतो तो काय उगीच…!!
स्वप्न अथवा कल्पनेला अंगभूत प्रतिभेची तोलामोलाची जोड मिळाली की, अनेक अजरामर कलाकृती निर्माण होतात. अशाच विविध कलाप्रकारापैकी चित्रकारीता ही एक अद्भूत कला आहे. केवळ कुंचल्याच्या जोरावर कागदावर वेड्या वाकड्या रेषेतूनही भावविश्व जिवंत उभे करण्याची क्षमता चित्रकाराची असते. आर. के. लक्ष्मण, बाळ ठाकरे, थाॅमस नास्ट या कांही दिग्गज व्यंगचित्रकारांनी एक काळ गाजवला होता. तसेच राजा रवी वर्मा, एम. एफ हुसेन,अमृता शेरगील हे कांही नामवंत भारतीय चित्रकार आहेत. ज्यांनी स्वतःच्या कुंचल्याची जादू लाखो जनमानसावर कोरली होती. अचूक, कल्पक रंगसंगती व कुंचला आणि कॅनव्हास या माध्यमातून नाना भावभावनांचे विभ्रम चित्रातून त्यांनी अक्षरशः जिवंत उभे केले. म्हणूनच हा एक शक्तिशाली तरीही युक्तीप्रयुक्त असा अद्भूत प्रतिभा असलेला कलाप्रकार आहे. मन मेंदूत कल्पिलेले हाताच्या सहाय्याने कागदावर उतरवून त्यात भावना ओतणे साधी गोष्ट नाही. म्हणूनच आपण जेव्हा एखादे विस्मयकारक चित्र पाहतो तेव्हा चित्रकाराच्या हस्तकलेला दाद देऊन जातो.
आज हा सारा चित्रप्रपंच मांडण्याचा उद्देश म्हणजे काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी आ. राहुल दादांनी दिलेला सुंदर चित्र विषय! या चित्रात, लाल गुलाबी सुंदर फुलांची छत्री माथ्यावर धरलेली जपानी युवती दिसते. मात्र प्रत्यक्षात ते एका भिंतीवर रेखाटलेले सुंदर युवतीचे चित्र असून, त्यामागे लाल गुलाबी फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे छत्रीत रूपांतर करून ती छत्री युवतीने स्वतःच्या डोक्यावर धरल्याचा आभास निर्माण करण्याची अचाट अद्भूत कल्पकता एका चतुर चित्रकाराने साकारली आहे. आणि ते चित्र जिवंत केले आहे.
आता अशा चित्रावर हायकू रचना करण्याचे आव्हान समूह प्रमुख आ. राहुल दादांनी समस्त शिलेदारासमोर ठेवले. आणि या गुलाबी चित्राने इतकी भुरळ घातली कि, हे आव्हान अनेकांनी लिलया पेलले. मात्र काहीजण गुलाबीपणातच अडकले. चित्राचे बारकाईने निरिक्षण करून रचना लिहिण्याचा विचार अपेक्षित असतो. विषय पोस्टमध्येच “काल्पनिक चित्र” असा मथळा दिला होता. त्या अनुषंगाने कयास लावून हायकू साकारणे अभिप्रेत होते. तरीही समस्त रचनाकारांनी खूप सुंदर भाव रंग भरण्याचा प्रयत्न केला याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन..!! आज मला परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांंचे मनापासून आभार व्यक्त करतो.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक,सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





