“आपल्यातलं बालपण अजूनही जिवंत आहे”; स्वाती लभाने
मराठीचे शिलेदार समूहास त्रिवेणीय आभारपुष्प अर्पण

“आपल्यातलं बालपण अजूनही जिवंत आहे”; स्वाती लभाने
मराठीचे शिलेदार समूहास त्रिवेणीय आभारपुष्प अर्पण
आज अचानक सकाळी आदरणीय राहुल सरांचा मेसेज वाचला, ‘तुमचा फोटो पाठवा’…. वाटले… चला आज तरी आपला नंबर लागला! मला वाटले की बालकाव्यासाठी आज माझा फोटो मागविला असेल. मग बालकाव्याच्या ग्रुप मध्ये बराच वेळ ‘आतुरतेने’ ताटकळत राहिले. मायादेवी ताईंची कविता सर्वोत्कृष्ट बालकाव्य म्हणून निवड झाली हे तर कळलेच होते. पण, मला वाटले की नेहमीप्रमाणे अनेक जणांना सर्वोत्कृष्ट स्थान मिळाले असावे. सर्वांचे प्रमाणपत्र तयार करण्यात कदाचित उशीर लागत असावा… म्हणून मी तोच ग्रुप बघत राहिले.
पण, झाले भलतेच… इकडे त्रिवेणी काव्याच्या समूहात माझे प्रमाणपत्र झळकले होते… माझ्या ‘आतुरता’ या त्रिवेणी काव्याला आज सर्वोत्कृष्टचा मान मिळाला होता. अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला होता…!!
माझ्या ‘त्रिवेणी’ या तीन ओळींच्या काव्यासाठी आज अनेक मान्यवरांनी छान छान अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या…. जे मी कधी अपेक्षेलेही नव्हते. आपणा सर्वांच्या या शुभेच्छांमुळे माझा दिवस अगदी सुंदर गेला. खूपच प्रोत्साहन मिळाले!
अभिनंदनामुळे मिळालेल्या प्रोत्साहनाने मन किती प्रफुल्लित होते, याची प्रचिती आज मला आली. आपल्यातलं बालपण अजूनही जिवंत आहे हेही आज उमगले. माझ्यातल्याच ‘म’ला, तुम्ही माझी नव्याने ओळख करून दिली याबद्दल आपले खरेच धन्यवाद!
या आधीही माझ्या ‘कट्टीचा महिना’ आणि ‘फजिती’ या बाल काव्यांना सर्वोत्कृष्ट यादीत स्थान मिळाले होते. तसेच एकदा शुक्रवारीय हायकू स्पर्धेतही माझ्या रचनेला सन्मानित केले गेले होते. तेव्हाही अनेकांनी माझ्यावर आशीर्वाद आणि अभिनंदन याचा वर्षाव केला. या समूहात मी नवीन असूनही मला सर्व आदरणीय ताई ,दादांकडून जे प्रेम मिळत आहे ते खरंच खूप दुर्मिळ आहे.
कारण जमाना आता शहाणपणाचा राहिला नाही. सगळीकडे द्वेष, मत्सर, हेवा आणि चोरी या गोष्टी वाढल्या आहेत. या काळात आपल्यातली सुहृदयता या समूहात आपण जपत आहात. ही खरेच नाविन्यपूर्ण गोष्ट आहे! समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल सर, सविता ताई, स्वातीताई (सर्व), विष्णू संकपाळ सर , गायकवाड सर, पाचभाई सर, ज्योतीताई , संध्याताई, सुनीताताई, सुरेखाताई आणि बरेच यांची नावे आता लिहिता येणार नाही… या सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छिते..!!
स्वाती लभाने, वर्धा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह





