हळुवार भावना अन् …एक भेट चांदोबाशी: शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
हळुवार भावना अन् …एक भेट चांदोबाशी: शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“किती अनोखी अन् सुंदर
क्षण मंतरलेला अन् घालमेल मनाची,
रोज भेटतो परि ती अनोखी
असेल अनमोल एक भेट चांदोबाची”
चांदोबा म्हटले की, कितीतरी प्रेमळ सुंदर अन् आपुलकीचे प्रत्येकाने जपलेले एक नाते समोर येते. भौगोलिक -वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेले तर चांदोबा म्हणजे आपल्या पृथ्वीचा एक उपग्रहच की ! आपली भारतीय संस्कृती म्हणजे निसर्गपूजक आणि या निसर्गाच्या प्रेमातून सृष्टीशी निर्माण केलेले नाते किती अनमोल आणि सुंदर ना ! मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय वाचता क्षणीच एक प्रेमळ भाव मनात तरळून गेला. एक भेट चांदोबाशी …ज्या चांदोबाला समस्त स्त्री जातीचा भाऊ, लहान मुलांचा मामा, परिराज्यात वावरणारा, चांदण्यांशी संवाद करणारा तो चांदोबा..!!
त्याची ती सुंदर बाग ,बागेतील सुंदर सुंदर फुले आणि त्या विश्वात रमणारी छोटी छोटी मुले . किती रमावे या बालकल्पनांमध्ये ?किती नाजूक ,कोमल ,हळव्या या भावना. कितीही मोठे झालो तरी या कल्पनांमध्ये रमायला आजही तितकेच आवडते ना ? नाही ,त्याहीपेक्षा जास्त आवडते. माझे तर उत्तर हेच असेल. नसेल वेळ कदाचित व्यवहारीक या दुनियेमध्ये, वाटत असेल कमी महत्त्व या बालमनाला. पण बालपण बालमन जपणे म्हणजे खरे जिवंतपणाचे लक्षण !असेच मी तर म्हणेन…
विसरून जावे क्षणभर ,हिरमुसलेले ते वारे
जबाबदारीने वाकलेले मन, अन् सदा चिंतेचे घेरे
पुन्हा घ्यावी अवखळ भरारी, मुक्तपणे त्या गगनामध्ये
भेटावे क्षणभर त्या चांदोबास अन् पुन्हा जगावे बालपणामध्ये
प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळे नाते निर्माण करणारा तो आकाशीचा चांदोबा, आज बालकाव्यातून वेगवेगळ्या रूपामध्ये, कल्पनांमध्ये समूहात उतरला. पौर्णिमेचा चंद्र जणू बालसमूहामध्ये मनसोक्त फिरला. हे सौख्याचे क्षण अनुभवण्यासाठी इतके सुंदर सुंदर विषय देण्याचा राहुल दादाचा हातखंडाच! या प्रेमळ अनुभूतीसाठी राहुल दादाची मुख्य परीक्षक म्हणून तर मी ऋणीच पण बालमनाच्या सर्व समूहातील बालपण जपणाऱ्या कवितर्फे सुद्धा ऋण..!
बालकविता म्हणजे खूप अवघड वाटणारा विषय आज समूहातील कवी अगदी सहजतेने पेलताना दिसत आहेत आणि हे पाहून मन चंद्राप्रमाणे फुलले नाही तर नवलच! फक्त वाचक असणाऱ्या कवींनीही लेखनाचा प्रयत्न करावा ,नक्कीच जमेल. लोभस बालपण जपण्यासाठी सर्व बालकवी दादा, ताईंना भरभरून शुभेच्छा. मी तर चालले चांदोबाची एक भेट घेण्यासाठी.. मग काय? येताय ना माझ्यासोबत ? धन्यवाद… !!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्यपरीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



