Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

‘छत्रपती शिवराय’ सदा शक्तिदाता

कार्तिक झेंडे पाटील ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

0 4 8 2 8 4

‘छत्रपती शिवराय’ सदा शक्तिदाता

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील आणि महाराष्ट्राच्या मातीतील अन्याय-अत्याचाराच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र धरता यावे याकरिता आपल्या सबंध आयुष्याच रणकंदन करणारे रयतेचे जाणते राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळात इथली माती आणि माणसं परकीयांच्या गुलामगिरीत भरडली जात होती, मराठी अस्मिता पायदळी तुडवली जात होती, त्यावेळी इथल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी रयतेच्या रक्षणासाठी शिवनेरीच्या माथ्यावरती शिवसूर्य उदयास आला. शिवप्रभूंचा जन्म झाला.

शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंच्या शिकवणीतून दुःखी, पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आणि माय भूमीला परकियांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्य संस्थापनेचा संकल्प केला. माॉ साहेब जिजाऊंनी आदर्श संस्कारांची बीजं शिवरायांच्या मनात रुजवली. साडेतीनशे वर्षांपूर्वी यवनी सैन्य महाराष्ट्राच्या मातीत हैदोस घालत होत. रयतेवरती प्रचंड अत्याचार केला जायचा, माय – भगिनींची अब्रू लुटली जायची, हिंदू देवतांची विटंबना केली जायची, शेतकऱ्यांवरती ही जुलूम जबरदस्ती करण्यात येत. 

अशा काळात शिवरायांसोबत पुण्यात आलेल्या मासाहेब जिजाऊंनी ही परिस्थिती पाहिली. ओसाड माळरानावर हातात सोन्याचा नांगर धरून लाखो प्रजाजनांच्या आयुष्यात मासाहेब जिजाऊंनी समृद्धीचा प्रकाश पेरला. आणि मराठी मायमातीच्या उद्धाराचा काळ सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र हे या मातीत जन्मलेल्या प्रत्येकासाठी एक आदर्श प्रेरणास्थान आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी प्रत्येक सामान्य व्यक्तीला त्याच्या मधल्या असामान्य ताकदीची जाणीव करून दिली लढण्याचं सामर्थ्य दिलं आणि जगण्याचा स्वाभिमान दिला. शिवरायांच्या या स्वराज्य हिताच्या विचाराला जगण्याचे ध्येय मानून याच मराठी मातीतील तानाजी, येसाजी, बाजी, मुरारबाजी, कोंडाजी, नेतोजी अशा लाखो हजारो शूरवीरांनी आपलं सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण केलं. छत्रपती शिवरायांच्या या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याच्या छायेखाली आहोत.

“शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावणाऱ्याची गय केली जाणार नाही” असा आदेश काढणारे छत्रपती शिवराय हे ‘शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते’ होते. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी अनेक तलावांची निर्मिती ही केली शिवरायांचा हा शेतीविषयक दृष्टिकोन महत्त्वाचा वाटतो. शिवरायांच्या अशाच कार्याची प्रेरणा घेऊन आज भारताचे नौदल कार्य करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत.  आपलं संबंध आयुष्य मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय युगपुरुष होते. शिवरायांचा इतिहास या माती जन्माला येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी प्रेरणेचा एक अखंड ऊर्जास्रोत असेल. खचलेल्या मनांना लढण्याचा स्वाभिमान देणाऱ्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचा निश्चय करू. हीच खरी शिवजयंती ठरेल.

कार्तिक झेंडे पाटील
ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे