“श्रावण सरींनी नटलेला… पाऊस दाटलेला”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण

“श्रावण सरींनी नटलेला… पाऊस दाटलेला”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण
काळ्या काळ्या ढगांखाली
मयूरपिसारा फुललेला
हिरवळीच्या गर्द छायेत
कणकण नटलेला
सरीवर सरी येते अन्
आकाशी पाऊस दाटलेला…
श्रावण – पावसाचा क्षण, हिरवळीचे ऋण, श्रृंगाराचे धन, आनंदलेले मन, सण समारंभाचे गुंजण, नातेसंबंधाचे दर्पण, जे जगावे असा क्षण क्षण… निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांपैकी पाऊसधारेने नटलेला हा ऋतू पावसाळा. तसा हा पावसाळा विविध भागात वेगवेगळा. कुठे जास्त, कुठे मध्यम, कुठे कमी, कुठे तर नजर फिरवतो. पावसाळा सुरू झाला की, वसुंधरा कशी नटून-थटून पावसाचे स्वागत करण्या सज्ज होते. त्यात श्रावण मास आला म्हणजे वेगवेगळ्या सणसमारंभाचा उत्साहाचा काळ येतो. जणू त्या ढगांनाही आनंद होऊन आनंदाचे भरते येते. तसा पाऊस दाटतो आणि आनंदलेल्या सृष्टीच्या चराचरावर धुंवाधार कोसळतो, जणू आनंद सरीच. या आनंद सरीत चिंब चिंब होते ही सृष्टी सारी.
हा पाऊस सर्वांच्याच आवडीचा, सान ,थोर ,तरूण सर्वांच्याच मौजेचा. या पावसावर प्रेम भक्तांनी तर किती काव्य रचले असेल, शब्दांचे उधान जणू. या कविता वाचून तर तो आनंदाने बरसत नसेल! सगळ्यात आनंदाचा काळ म्हणजे लहान मुलांसाठी.” आई मला पावसात जाऊ दे ना”म्हणत ,नको नको म्हणत असतानाही पावसात चिंब होणारी बालके, चिखल पाण्यात उड्या मारताना जगाचे भान विसरून जातात. त्यांचे विश्वच जणू चिखल माती बनते. पाण्याच्या साचलेल्या डबक्यापासून वाट बनवत बनवत पाण्याला वाट करून देताना तासन् तास त्या पाण्यासोबत खेळतानाचा आनंद वर्णू शकेल का कोणी? चिखलापासून विविध आकार बनवताना स्वतः चाच होणारा चिखल आणि मातीचा स्पर्श.कागदी नाव बनवून पाण्यात सोडण्याची संकल्पनाच किती सुंदर !लहान लहान गोष्टीतून आनंद मिळवणारी मुले जणू थोरामोठ्यांना आनंदी जीवनाचा धडाच देत असतात. नदी, नाल्या ओढे भरले म्हणजे प्राणी पक्षी यांच्या आनंदाला पारावार राहत नाही.
सध्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला, पावसाचे प्रमाण कमी झाले आणि या बालचिमुकल्यांचा आनंद जणू मानवानेच हिरावून घेतला. आजचे कोरडे बालपण पाहून कधी कधी त्या पावसाच्या भावनाही दाटतात आणि हा दाटलेला पाऊस मग धो धो कोसळतो भान विसरून. जणू बालकांना, सृष्टीला आनंदाची मेजवानीच घेऊन येतो. जगावे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात, प्रसन्न मन फक्त निसर्ग सहवासात. करा संरक्षण आणि संवर्धन निसर्गाचे, फेडा ऋण धरेचे. ” एक पेड़ माँ के नाम” हा उपक्रम सध्या राबवत आहोत आणि हे पाहून जणू दाटलेला पाऊस आज बालकवितासमूहामध्ये मुसळधार काव्य स्वरूपात बरसला तसाच तो वास्तवातही. सर्व बालकवींच्या रचना अतिशय सुंदर. पावसात नाचणाऱ्या, खेळणाऱ्या, बागडणार्या मुलांप्रमाणेच. राहुलदादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण !चला तर घेऊया आनंद श्रावणधारांचा अन् दाटलेल्या पावसाचा. तूर्तास थांबते.. धन्यवाद !!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/मुख्यपरीक्षक/कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह





