जीवनी ‘वसंत’ फुलतांना यौवनास रंग यावे; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
जीवनी ‘वसंत’ फुलतांना यौवनास रंग यावे; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
अरे, तुझे वर्णन करताना श्रीमद् भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत. ‘ऋतूनां’कुसुमाकर : ! माधव जुलियन तुला म्हणतात…. ‘नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिंडोळ…’ कोकिळे ऐकव तव मधुर बोल ! स्वाध्यायान्मा प्रमदः ….भावगंगेत तर तुला उपमा दिली त्या पांडुरंगाची…. तेव्हाच तर भावगीतात मी वाचले, ‘ऋतू वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले’. पांडुरंग आले आले..पांडुरंग आले. तुझ्या बाबत संत ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार, लावण्यसी! या सर्व चढाओढीत कवी कालिदास कसे बरे मागे राहतील? मदनाची सर्व आयुधे घेऊन फुलविण्यासाठी आलेला योद्धा….!!
अरे..काय हे? लक्ष दे ना माझ्याकडे… होय तुलाच.. “वसंत”..तुलाच मी साद घालित आहे. तू ऋतुराज तर आहेच, तेव्हाच मराठीच्या साहित्याला समृद्ध करणारे वसंत कानेटकर, वसंत सबनीस, वसंत काळे, वसंत बापट..या सर्वांनीच नावाप्रमाणेच साहित्याला बहर आणला. वसंत देशपांडे , वसंत शिंदे, वसंत ठेंगडी हेही अभिनयाने समृद्ध झाले. असा हा वसंत ऋतू म्हणजे सृष्टीला कवळणारा, हसवणारा, रिझवणारा तापवणारा , कोळपवणारा , सुखविणारा आणि तृप्त करणारा जणू सृष्टीचा प्रियकरच.. सुंदर भासणारा निसर्ग या वसंत ऋतूत सोळा सुंदर कलांनी जणू उठून दिसतो. ‘यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल, तर वसंत हे सृष्टीतील यौवन आहे.’
वसंत म्हणजे आशावादाचे प्रतीक… आशा व सिद्धी,कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती,सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय आहे. तू वेडा आहेस. होय, अगदी त्या माझ्या प्रियकरासारखा..तोही प्रेमांगणात आकंठ बुडतो..आणि चिंब करतो मला..आणि तू रंग वेड्या सृष्टीत स्वतः चिंब होतोस. लालजर्द फुलांनी बहरलेला पळस… सोनपिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला बहावा… जांभळ्या छटांनी पखरण करणारा नीलमोहर…..फांद्या फांद्यावर झुपकेदार गजरे माळलेला गिरीपुष्प….!!
तुझ्या स्वागतासाठी निसर्गात सुरू असलेली ही रंगांची उधळण माझ्या डोळ्याचं पारणं फेडते..किती वर्णावी तुझी महती? पण आज निमित्त आहे रे…. ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय ‘राहुल सरांनी ‘रंग वसंताचे’ हा विषय दिला. वसंता, तुझ्यासारख्याच सुंदर, मनभावन रचनांनी सर्व समूह बहरलेत..! एकापेक्षा एक सरस रचनांचा जणू शिलेदारी अंगणात सडाच पडला. तेव्हा माझ्यावर निस्सिम प्रेम करणारे समूहातील सर्व दादा ताईंचे, त्यांच्या प्रतिभाशाली लेखणीचे मनापासून अभिनंदन.. अभिनंदन.. अभिनंदन.. आणि पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा देऊन लेखणीस विराम देते.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





