आनंद अन् भीतीचे मिश्रण.. ‘कडकडाट अन् गडगडाट”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
आनंद अन् भीतीचे मिश्रण.. ‘कडकडाट अन् गडगडाट”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
विजांचा कडकडाट अन्
आकाशी गडगडाट झाला
इवलासा जीव घाबरून दरदरून घाम फुटला
जीव मग गोष्टीतला ससोबा झाला…
अचानक आकाशात काळे ढग दाटून येतात अन् दिवसाढवळ्या पृथ्वी अंध:कारात झाकाळून जाते. विजा चमकायला लागतात. आता बालमनाला पडणारा प्रश्न म्हणजे आकाशात विजेची निर्मिती कशी होते? वीज म्हणजे एक प्रकारचा विद्युत ऊर्जा प्रवाह. जेव्हा आकाशात भरपूर उष्णता, ओलावा आणि ढग तयार होतात तेव्हा त्यामध्ये विद्युत शुल्क तयार होऊ लागतात. वीज तयार होण्यासाठी ढग अनिवार्य असतात, हे ढग म्हणजे वाफ, जलकण, बर्फाचे साठे असतात. हवेमुळे ते थंड होऊ लागतात त्यावेळी त्यांच्यामध्ये सतत घर्षण घडत असते. या घर्षणामुळे धन विद्युत आणि ऋण विद्युत तयार होतात. ते एकमेकांपासून विभक्त असतात पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा म्हणजेच वीज.
जेव्हा वीज चमकते तेव्हा त्या ठिकाणी हवेचा दाब अचानक वाढून उष्णता सेकंदात ३०,०००अंश सेल्सिअस इतकी म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाच्या पाचपट वाढते. त्यामुळे एक पोकळी निर्माण होते व ती भरून काढण्यासाठी हवा चौफेर आत घुसते आणि गडगडाट निर्माण होतो. यालाच मेघगर्जना म्हणतात. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक असतो म्हणजेच प्रकाशाचा वेग सुमारे तीन लक्ष किमी /सेकंद तर ध्वनीचा वेग 343 मीटर/सेकंद. त्यामुळे वीज प्रथम चमकते व गडगडाट नंतर ऐकू येतो. हे झाले विज्ञान. आश्चर्य म्हणजे दर एक मिनिटाला वीज सुमारे ६००० वेळा चमकते, यातील शंभर पैकी एक वीज जमिनीवर आदळते. अशी वीज जनावरे, माणसे, घर, झाडे, यंत्रसामग्री यांना हानी पोहोचवते. एका विजेचा डिस्चार्ज दहा कोटी व्होल्ट पर्यंतचा असतो.
सध्या या कडकडाट आणि गडगडाटाचा रोमांचकारी अनुभव सर्वजण प्रत्यक्ष घेत आहेत. आमचे बाल मनाचे शिलेदार हा रोमहर्षक अनुभव आपल्या लेखणीतून वर्षा ऋतूप्रमाणे जणू बरसवत आहेत. बालमनाचे हे उधाण पाहून मन हर्षित, प्रेरित, आनंदित झाल्यापासून राहिले नाही. निसर्गाच्या या अनमोल ठेव्यावर भरभरून प्रतिसाद विजांच्या कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह समूहात अवतरला. या समूहातील मी एक पामरच.. पण निदर्शनास आलेली एक टीप म्हणजे थोडेसे शब्दांच्या शुद्धतेकडे लक्ष दिले तर मराठीच्या महीमेत नक्कीच आपण वाढ कराल. नेहमी वैचारिक मंथन करावयास भाग पाडणाऱ्या राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल भरभरून ऋण. वर्षा राणीच्या आनंदात सहभागी होऊन हिरवळीचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद…!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/कवयित्री/संकलक/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



