तान्ह्या (लाकडी बैल) पोळ्याला 235 वर्षे पूर्ण
नागपुरातील हा आहे सर्वात मोठा लाकडी बैल
तान्ह्या (लाकडी बैल) पोळ्याला 235 वर्षे पूर्ण
नागपुरातील हा आहे सर्वात मोठा लाकडी बैल
जिल्हा प्रतिनिधी, नागपूर
नागपूर: शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा ) पोळ्यास 235 वर्ष पूर्ण होत आहेत.
भारत हा कृषी प्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केल्या जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही.
सन 1789 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून लाकडी बैल (तान्हा ) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले.
जिवंत बैलाप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकी चे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. या प्रथेला 235 वर्षे पूर्ण होत आहे.
राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले* यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आज सुद्धा एवढा मोठा बैल भोंसले घराण्याकडे आहे. मुधोजीराजे चे निवासस्थान सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आहे. या लाकडी बैलांची उंची आठ फूट लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे.
ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघाली. 235 वर्षानंतर आजही सुद्धा ही प्रथा राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी नियमीत ठेवली व यापुढेही सुद्धा ही प्रथा चालू राहील असे मत महाराजांनी व्यक्त केलेले आहे.