‘चितपट’ होऊनही ‘राखेतून पुन्हा उभी राहिली’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
‘चितपट’ होऊनही ‘राखेतून पुन्हा उभी राहिली’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
त्याच्या चेहऱ्यावरचा तो ‘आसुरी’ आनंद पाहून माझं काळीज चिरलं जात होतं. एवढ्या खालच्या स्तरासोबतच्या माणसासोबत मी दहा वर्ष संसार केला. एका मुलीला जन्मही दिला. त्याच्या जीवनात “ती” आली आणि माझ्या आयुष्यातल्या सुखाला नजरच लागली. किती पटकन बदलत गेला तो. आमच्यातला वाद विकोपाला गेला, शेवटी वेगळे होण्याचा त्याचा निर्णय मला जड अंतःकरणाने स्वीकारावा लागला.
कोर्टात आज शेवटची तारीख होती, मुलीचा ताबा मला देतानाही तो विकृतपणे हसत होता. त्याच्यातला नवरा तर कधीच मेला होता. पण आज बापही मरताना मी पाहिला. न्यायाधीशांसमोर शेवटची सही करताना डोळ्यात अश्रू आणि मान खाली होती माझी. जेव्हा तो सही करायला आला तेव्हा विजयी मुद्रेने नेहमीसारखंच डोळे वर करत माझ्याकडे पाहत छद्मीपणे हसला. म्हटला कसं “चितपट” केलं तुला? पुन्हा साधी उभी ही राहू शकणार नाहीस तू आयुष्यभर.!
काळ हा मानसिक जखमेवरचे सर्वात प्रभावी औषध असतं असं आई नेहमी म्हणायची, ‘मी अनुभवलं. मोठा काळ गेला मधला’. आज माझ्यासाठी आयुष्यातला सर्वोच्च दिवस होता, माझ्या मुलीचं आय.ए.एस. पोस्टिंग झाल्यावर त्याच्याच गावात सत्कार ठेवला होता तिचा. स्टेजवरूनच मी त्याला शोधत होती, पण कुठे दिसत नव्हता तो. मला कुठे चितपट केलं त्याने? मी राखेतून पुन्हा उभी राहिली स्वतःला जाळलं पण मुलीला उभं केलं. त्याला आज हेच मी सांगणार होते, वासनेच्या द्वंद्वात तू भले मला तेव्हा चितपट केलं असेल; पण माझ्यातली आई आज अभिमानाने व्यासपीठावर बसलेली होती. नियतीने मला पुन्हा उभं केलं होतं. माझी नजर त्याचा शोध घेत होती. पण तो कुठे, अगदी कुठेच दिसत नव्हता. नंतर शेजारी बसलेल्या एका माणसाकडून मला कळलं की तो बारा वर्षांपूर्वीच ‘चितपट’ झालाय तोही कायमचा.
‘चितपट’ अर्थात पूर्ण पराभूत करणे, धुळीत मिळवणे, हरवणे. अगदी तसंच जसं संभाजी महाराजांनी पराक्रमाच्या जोरावर मुघलांना चितपट केलं होतं. साताऱ्याच्या तालमीत अंगाला लाल माती लावून कुस्ती खेळणारे पैलवान एक दुसऱ्याला चितपट करतात अगदी तसेच. गेल्या महिन्यात अमेरिकेत आपण क्रिकेटच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चितपट करत विश्वचषकावर नाव कोरलं. अगदी तसेच.
आज ‘चितपट’ करण्याचं भाग्य आम्हा कवी रसिकांच्या नशिबात आलं, अर्थात निमित्त होतं बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचं. ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी या निमित्ताने हा विषय छेडला आणि आमच्या कवीकवयित्री दादा ताईंनी शब्दांच्या मदतीने हा चितपटचा खेळ खेळायचे ठरवले. त्यात सर्वांना बहुतांशी यश आलंच अनेक सुंदर काव्य फुलांनी आजची ही काव्यमैफील सजली तेव्हा तुम्हां सर्व कवी कवयित्रींचे मनापासून अभिनंदन पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह