हुंकारांचाही इथे मुडदा पाडला जातो; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

हुंकारांचाही इथे मुडदा पाडला जातो; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
तब्बल ५१ तोळे सोनं, एक फॉर्च्यूनर गाडी, अनेक चांदीची भांडी, वेगवेगळ्या भेटवस्तू, बस..एवढेच का? अजून हवंय आम्हाला..कारण आम्ही मानव थोडे आहोत? खुंट्याला बांधलेल्या गाईवर ज्याप्रमाणे कसायाची नजर असते अगदी तशीच नजर आहे आमची तुमच्या मुलीवर. काय म्हणतात ?परिस्थिती नाही देण्याची तुमची, मग तर समजूनच घ्या..अहो, आम्ही अनेकांना धुळीत मिळवलं, आमच्या श्रीमंतीच्या जोरावर अनेकांना चिरडलं. बैलासमोर बाईलाही नाचवलं. तुमच्या मुलीचा..तुमचीच मुलगी, आमची कोण ती ? नातं गोतं टिकवणे माणसांचं काम, आम्हा हैवानांचं नाही. काय म्हणतात ? तिचा हुंकार..असे अनेक हुंकार हवेतच जिरवण्याची ताकद आहे आमच्या पैशांमध्ये. सर्व सिस्टीम हलवणारे आम्ही…हो..हो…आम्हीच…! हुंकार, आक्रोश, हुंदका कसला आलाय ? हुंकाराचा मुडदा पाडणारेही आम्हीच…!!
‘हुंकार.. अंतरात्म्यातून आलेला आवाज’. वेदनेची किंवा लढाईसाठीची साद, आव्हानांसाठी वापरलेला शब्दसंकल्प. मराठी सारस्वत दादा, ताई हुंकार ऐकलाच असेल आपण..? वैष्णवी सारख्या नवविवाहितेच्या स्री मनाचा असो…की एखाद्या नेत्याच्या रॅलीला दिलेलं नाव असो. अवकाळीच्या विळख्यात गारद झालेल्या शेतकऱ्याचा असो…की, ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्या रूपाने असलेल्या मराठी अस्मितेचा असो. असा हा हुंकार समर्थ रामदास स्वामींनी खूप छान शब्दबद्ध केलाय.
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।।
अर्थात मारुतीच्या हुंकारानं पृथ्वी आणि समुद्राची भूकंपासारखी अवस्था झाली. सर्व ब्रम्हांड गडबडलं स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तिन्ही लोकांतील सुर, नर व निशाचर यांनी धाक व भीतीमुळे पळ काढला. असा हा हुंकार रुपी शब्द आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समुहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांच्या नजरेत आला. आणि या विषयावरती अनेक कविता आज सर्वच समूहांमध्ये वाचायला मिळाल्यात.
परीक्षणार्थ रचना वाचताना… कुणी समता, बंधुत्वाचा हुंकार मांडला, तर कुणी वेदना नी भावभावनांचा..कुणी हुंकार मुक्तकंठाचा मांडला तर, कुणी पिंडातून ब्रम्हांडात अवतीर्ण झाल्याचा हुंकार मांडून बाईपणाचा उद्धार केला. कुणी वेदनांचा सांगाती होऊन व्यथा मांडून हुंकार व्यक्त केला. तर कुणी अन्यायाचा प्रतिकार करूनी रणरागिणी बनण्याचा हुंकारही भरला. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
पण थोडं काही….. कवितेत भावनांचे सौंदर्य आणि गहराई असावी. ती वाचकाला विचार करायला लावणारी आणि त्यांच्या मनात भावना निर्माण करणारी असावी.कविता समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आणि एक चांगला बदल घडवणारी असावी. बस..याच अपेक्षेने आपणा सर्वांना शुभेच्छा देते..अजून लेखणीस बहरण्यासाठी..तूर्तास एवढेच.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह