हेच तर दडलंय, ‘न उमगलेले ‘संकेत’ अन् संस्काराचा अभाव’; स्वाती मराडे
मुख्य परीक्षक स्वाती मराडे पुणे
हेच तर दडलंय, ‘न उमगलेले ‘संकेत’ अन् संस्काराचा अभाव’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र काव्य स्पर्धेचे परीक्षण
एक अपघात होतो नि काळजाचा ठोका चुकतो. गाडीची अवस्था पाहून मनात धस्स होतं. अपघातात सापडलेला ठीक तर असेल ना! मनास कोडं पडतं अन् कुणाचं काळीज धडधडतं.. तर कुणी आक्रमक होऊन चालकास मारहाण करतं. रस्त्यावर होणारे अपघाताचे अनेक प्रकार. अनवधान, अज्ञान, घमेंड, नशा.. कारणे अनेक परंतु काहींचा यात हकनाक बळी जातो.अपघातातीलच सध्या गाजत असलेला ‘हिट अँन्ड रन’ प्रकरणाचा मुद्दा आठवला तो आजचे चित्र चारोळी स्पर्धेचे चित्र पाहून. का बरं घडत असेल असे.. काहीतरी दडलंय यात. अगदी लहानपणापासूनचे होत जाणारे वाहतुकीचे संस्कारही आहेत.
आजकालच्या धकाधकीच्या जगात वाहतुकीचे नियम व संकेत माहित असणे अनिवार्य असताना, शैक्षणिक पातळीवर मात्र ते कुठेच शिकण्यासाठी अनिवार्य आहेत असे आढळत नाही. दैनंदिन जीवनातही मुले जेव्हा पालकांसोबत गाडीवर जात असतात तेव्हा सिग्नल तोडणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे असे सर्रास वाहतुकीचे नियम कसे मोडले जातात याचाच वस्तुपाठ घेतात. चुकून छोटा मोठा अपघात झाला तर माझी चूक नव्हेच पासून अरेरावीची भाषाही ते सहजपणे टिपतात. मोठे झाल्यावर तीच मुले तसेच अनुकरण करत राहतात. आणखी काय दडलंय बरं याचाही विचार आला.
चालकांसाठी दिला जाणारा परवानाही लाचखोरीतच अडकलेला दिसला. परवाना असणा-या किती लोकांना वाहतूक चिन्हांचा अर्थ माहीत आहे याचा शोध घेतला तर नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखी परिस्थिती आहे. वारंवार नियम मोडले म्हणून परवाना रद्द झाला असेही कुठे आढळत नाही. याशिवाय नागरी संस्कृतीत वाढत असलेले अमली पदार्थांचे प्रमाण व त्यात अडकत चाललेली तरुणाई. यामुळेही अपघात वाढतच आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची घमेंड तर आणखीनच वेगळी असते. ‘माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही’, ही भावना बेफिकीर वृत्तीने गाडी चालवण्याचे आणखी एक कारण. अपघातात माणसे मेल्यावरही कीडे मुंगी मारल्यासारखे सहजपणे स्विकारणे ही मृतप्राय संवेदनाही दडलीय ना यात.
सोबतच धनदांडग्यांचा प्रशासनावरील दबाव, त्यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांचे मूकपण. हेसुद्धा. असे कसे होतात अपघात, कुणीच घेत नाही बोध.. काहीतरी दडलंय म्हणून, कारणांचा घेतला थोडा शोध. अल्प विश्रांतीनंतर आज समूहात ‘चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी सद्य घडामोडींवर आधारित अपघातग्रस्त वाहनाचे चित्र आले नि जरा हटके विषय पाहून सर्वांच्या लेखन गतीनेही थोडा विसावा घेतला असे वाटले. आदरणीय राहुल दादा नेहमीच वेगळेपण जपत वैविध्यपूर्ण विषय स्पर्धेसाठी देतात. वेगळेपणाने लिहिण्याचा आपणा सर्वांचा प्रयत्नही मनोवेधक. वेगळेपण जपूया आणि लिहित राहूया. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन.आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक,लेखिका
मराठीचे शिलेदार समूह