माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून कवयित्री निर्मला पवार- मचाले यांच्या ‘नवांकुर’ काव्यसंग्रहाचे कौतुक
मराठीचे शिलेदार' प्रकाशन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून कवयित्री निर्मला पवार- मचाले यांच्या ‘नवांकुर’ काव्यसंग्रहाचे कौतुक
‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूर यांच्याद्वारे प्रकाशित झालेल्या सौ.निर्मला रमेश मचाले- पवार यांचा ‘नवांकुर’ हा कवितासंग्रह भारताचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांना दिल्ली येथे भेट देण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी सौ. निर्मला मचाले पवार यांचे कवितासंग्रहाचे कौतुक केले.
सौ. निर्मला मचाले-पवार या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सणसर ता. इंदापूर जिल्हा-पुणे येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांची सणसर शाळा ही पुणे जिल्हा परिषदेची ‘अध्यक्ष चषक’,विजेती शाळा आहे. तसेच सौ. निर्मला मचाले पवार यांना इंदापूर पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षिका’, पुरस्कार मिळाला असून पुणे जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’, जाहीर झालेला आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,नवी दिल्ली येथे दिनांक २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न झाले. निर्मला मचाले -पवार या ‘मराठी बालकथांचा वाङ्मयीन अभ्यास’ या विषयावर पुणे विद्यापीठाशी संलग्न तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती या अभ्यास केंद्राद्वारे पीएच डी करत असून त्यांनी पीएच डी च्या अभ्यासक्रमाअंतर्गत अभ्यास केंद्राद्वारे क्षेत्रभेट घेणे अनिवार्य केले असल्यामुळे व अहवालात नोंद घ्यावी लागत असल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास दिल्ली येथे हजेरी लावली.
त्यांनी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन,पुस्तक प्रदर्शन, वृत्तवाहिनी मुलाखत यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना भेटून त्यांनी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाद्वारे त्यांनी प्रकाशित केलेला ‘नवांकुर’ हा कवितासंग्रह त्यांना भेट दिला. शरदचंद्रजी पवार यांनी सौ.निर्मला मचाले पवार व त्यांचे पती प्राचार्य श्री.रमेश मचाले यांच्याशी संवाद साधून कौतुक केले.तसेच मराठीचे शिलेदार समूहाचे व प्रकाशन संस्थेचेही त्यांनी कौतुक केले.
सौ.निर्मला मचाले- पवार या मराठीचे शिलेदार समूहाच्या सक्रिय आजीवन सदस्य असून त्यांनी मराठीचे शिलेदार समूहामध्ये अनेक लेख, कविता,चारोळी, हायकू असे लिखाण केले आहे. तसेच त्यांना मराठीचे शिलेदार समूहाचा राज्यस्तरीय ‘साहित्यसेवा पुरस्कार’, नागपूर येथे देण्यात आलेला आहे. मराठीचे शिलेदार समूहाचे प्रमुख राहुलदादा पाटील यांचेसह मराठीचे शिलेदार समुहातील अनेक सदस्य ताई-दादा,अनेक मान्यवर, प्राथमिक-माध्यमिक शिक्षक- शिक्षिका यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.