Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनगडचिरोलीछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“पोटासाठी दाहीदिशा कधी बदलेल जीवनदशा….!”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू काव्य" स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 2

“पोटासाठी दाहीदिशा कधी बदलेल जीवनदशा….!”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय ‘हायकू काव्य” स्पर्धेचे काव्यपरीक्षण

आरं ये शिरपा…. आरं कुठं हाइस…? चुलीवर भाकरी थापता थापताच म्हातारीनं मारलेली हाक, परड्यात खुरप्याला धार लावत बसलेल्या शिरपाच्या कानात शिरली. आन् व्हटावर दोन उभी बोट ठेवून तोंडातल्या तंबाखूची गुळणी दूरवर फेकत घरात येत शिरपा म्हणाला.. “अगं आये, आलो, आलो थांब की जरा.. खुरप्याला धार लावतुया न्हवं..” म्हातारीनं तव्यातली भाकरी चुलीतला विस्तव बाहेर ओढून त्यावर शेकायला लावली आणि म्हणाली. “आरं खुरपं नगं घिऊस. कुर्‍हाड घे. आन् जरा निसण्यावर चांगली चोळून घे. वाईच भाकरी बी खाऊनशान घे. जरा येरवाळीच निघूया. म्हंजी एखाद दुसरा भारा तरी लाकडं जमत्याल. पावसाचं काय खरं नाय. औंदा लय लवकर वताय लागलाय. समदं रान मिरगाच्या आदीच हिरवं गार झालया. वटल्याली खोडं बी पालावल्यात. पावसाळ्याची बेजमी तर करायला पायजेल ना बाबा..”

शिरपा म्हणाला.” व्हय की आये. तुवा काय काळजी करू नगस. गुदस्ता बक्कळ लाकडं केलती आपुण. आजून खोपीत हायीत. जरा किड लागलीया आन् पावसाचं पाणी बी खोपीत गळतय. जरा आंबट वल्ली झाल्याती. जरा वरच्या अंगाला डोंगरा पल्याड जाऊया म्हंजी भारा दोन भाराभर मिळतीलच बग लाकडं ” म्हातारी म्हणाली.” व्हय लेका,खरय तुझं. चल तर मग म्या आडोळाला भाकरी बांधून घेती. दोरीची खोपरी करून बी घेती सांज व्हायच्या आत परत यायला पायजेल चल.. “

पोटासाठी दाही दिशा फिरून, मिळेल ते काम करत दिवस ढकलणार्‍या कुटुंबातला वरील संवाद ग्रामीण भागातील आहे. आजकाल खेड्यांनी कूस बदलली आहे. डांबरी रस्ते, स्लॅबची घरे, गॅसचा सर्रास वापर, सुधारणेचे वारे वाहत असले तरीही डोंगराळ भागात कांही कुटुंबाना आजही रोजंदारीशिवाय पर्याय नाही. काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र अशाच एका ग्रामीण भागातील लोकजीवनाचे प्रतिनिधित्व करते.

हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत जाणारा चकाचक डांबरी रस्ता प्रगतीचे प्रतिक आहे. मात्र त्याच रस्त्यावरून फाटक्या तुटक्या कपड्यातील एक तरूण डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन चाललेला दिसतो आणि त्याच्या मागोमाग एक वृद्धा आहे जे हलाखीच्या परिस्थितीचे दर्शन घडवतात. आजही अशी अशिक्षित कुटुंबे दारिद्र्याशी झुंज देत जीवन कंठताना दिसतात. चंद्र, मंगळ मोहिमा यशस्वी करणार्‍या विज्ञान युगात भाकरीच्या चंद्रामागे धावणारे कांही अनवाणी पाय आजही उपेक्षेचे जीणे जगत आहेत…

आंम्ही पोटार्थी
सतत भटकंती
नसू लाभार्थी

नेहमीप्रमाणेच आज सुद्धा चित्र येताक्षणीच रचनांचा ओघ वाढला. चित्रातला क्षण पकडण्याचा कांही हायकूकारांनी छानच प्रयत्न केला. मात्र अजूनही काही जण, हिरवी झाडे, काळा रस्ता असे वर्णन करतात. तसेच कांहीजण इंग्रजी शब्दांचाही वापर करतात. तसेच अक्षरसंख्या साधण्यासाठी एकाक्षरे भरीस घालतात ज्याचा मेळ बसत नाही. त्यामुळे हायकू काव्याची अपेक्षित परिणामकारकता कमी होते. सहजता हरवते. अशा गोष्टी टाळून, चित्रतील अदृष्य क्षण अथवा संदेश साकारता यायला हवा. तीच हायकू रचना परिपूर्ण होते. आज मला परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार…!!

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

4.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे