‘अभिजात माय मराठीच्या गौरवार्थ’ एकवटणा-या सर्वांना मानाचा मुजरा..!!
सविता पाटील ठाकरे सिलवासा, दादरा नगर हवेली

‘अभिजात माय मराठीच्या गौरवार्थ’ एकवटणा-या सर्वांना मानाचा मुजरा..!!
“गाऊ तेवढे गुण तेवढी, गोड रसाळ मराठी….
कुणी गोंजारावी अशी, गोंडस बाळ मराठी….,
वारकऱ्यांच्या गळ्यातील, तुळशीची माळ मराठी…
पिढ्यानपिढ्या घडविणाऱ्या, संस्कारांची माळ मराठी…”
अशा माझ्या ‘अभिजात माय मराठीच्या गौरवार्थ’ दि.७ मे २०२५ वार बुधवार रोजी छत्रपतींच्या शंभूभूमीत अर्थात छत्रपती संभाजीनगर येथे ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था’, नागपूर तर्फे आयोजित कार्यक्रमात तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी साहित्यिकांची जणू मांदियाळीच जमली होती. एक बहारदार सोहळा आयोजित केला गेला. या सोहळ्यासाठी उद्घाटक व मुख्य आयोजक म्हणून मा. डॉ पद्मा जाधव वाखुरे, प्रमुख अध्यक्ष मा.आमदार विक्रम काळे, प्रमुख अतिथी मा. नरेश शेळके, डॉ.बालाजी जाधव, समूहाच्या मुख्य परीक्षक व सहप्रशासक स्वाती मराडे, संस्थेचे विश्वस्त अरविंद उरकुडे, ए. बी.पठाण, विजय शिर्के, अशोक लांडगे यांच्यासह अनेक दिग्गज मराठी साहित्यिक,पत्रकार, ज्येष्ठ नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर इत्यादी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीतील हा सोहळा म्हणजे माय मराठीच्या प्रेमाचं जणू यथार्थ दर्शनच होय.
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा…
मराठीच्या समृद्धीचा संकल्प हाच विश्वास, हाच ध्यास आणि हाच खरा प्रयास हे पुन्हा एकदा राहुल सरांनी अधोरेखित केले. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष, समूहाचे सर्वेसर्वां आदरणीय राहुल सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यासाठी गेल्या १०० दिवसापासून रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या राहुल सरांसाठी पुन्हा एकदा मी “कर्मण्येवाधिकारस्ते” हा मूलमंत्र म्हणेन…
माय मराठी साद मराठी.
भाषांचा भावार्थ मराठी
हात मराठी साथ मराठी
जगण्याचा हा अर्थ मराठी
आणि अशी ही मराठी भाषा म्हणजे, ‘आमचा प्राण आणि तिचे संवर्धन म्हणजे आमचे आद्य कर्तव्य’ हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या आठ दहा वर्षापासून झपाटल्यागत काम करणारे मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे सर्वेसर्वा माननीय राहुल पाटील सर मराठीचे साहित्य विश्व समृद्ध करत आहेत. मराठीच्या शिलेदार समूहाचे यशाचं गमक म्हणजे माननीय राहुल पाटील सर…!! ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ यावर त्यांचा विश्वास आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर सरांनी मराठी भाषेला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. विश्वविक्रमी तब्बल २२ पुस्तकांच्या दमदार प्रकाशनासह ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या विशेषांकाची निर्मिती आणि या सर्वांसाठी सरांच्या प्रयत्नांना शब्दात बांधणं कठीण आहे. गेले अनेक दिवस अविरत सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावरच हे शक्य झाले आणि त्यातून एक दर्जेदार साहित्यनिर्मिती झाली. मराठी भाषा सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अजून एक पाऊल पुढे नेलं. आदरणीय सर तुमच्या कार्यकर्तृत्वास त्रिवार वंदन व येणाऱ्या काळात आपल्या हातून अशीच साहित्य सेवा घडो ही आई तुळजाभवानी चरणी मनापासून प्रार्थना.
आदरणीय राहुल सरांच्या कार्यात नेहमीच तोलामोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी एडवोकेट पल्लवी पाटील. पल्लवीताई नेहमीच सरांना मदत करतात विशेष करून पुस्तक निर्मितीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आयएसबीएन क्रमांक मिळण्यासाठी त्या संपूर्ण प्रक्रिया स्वतः करतात. तसेच कार्यक्रमासाठी लागणाऱ्या लहान सहान वस्तूंचं नियोजन करून सर्व व्यवस्थितपणे पाठवतात.
काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जरी त्या या कार्यक्रमात नसल्या, तरी त्यांचे योगदान न विसरण्याजोगं आहे. सरांचे सुपुत्र अखिलेश सध्या त्याची अत्यंत महत्वाची तयारी सुरू आहे. तरीसुद्धा या कार्यक्रमासाठी त्याची मनापासून येण्याची इच्छा होती, परंतु नाईलाज झाला. कुमारी हर्षिता नेहमीच समूहासाठी तत्पर असते याही वेळेस तिने आपल्या काही बातम्यांचे निवेदन तिच्या सुंदर व गोड शब्दात केलेले होते. पुन्हा एकदा या संपूर्ण परिवारासाठी अत्यंत मनापासून कृतज्ञता..!!
कार्यक्रमाच्या आयोजक व उद्घाटक आदरणीय डॉ.पद्माताई जाधव वाखुरे
आदरणीय ताईंच्या निवासस्थानी मी अनुभवलेला माहेरचा सन्मान, मान सारं काही मला अद्वितीय आनंददायी होतं. माझ्या ललिता वहिनींच्या हातचं सुग्रास पुरणपोळीचे जेवण, साडी चोळी, प्रशांत सरांसाठी कपडे…. आशुतोष दादाचा लाघवी आग्रह, प्रीतीची ममता, चिमुकल्यांची किलबिल…. भारावून गेले मी. आदरणीय आई… शब्दात नाही मी बांधू शकत आपली माया..!
शब्दांच्या पलीकडचं आपलं प्रेम आणि शिलेदारी ऋणानुबंध हा माझ्या कुपीतला कस्तुरीगंध आहे. प्रशांत सरांसाठी सुद्धा हा आठवणींचा सुखद अनुभव केवळ आणि केवळ मराठीच्या स्नेहबंधातून साकारलेलं आपलं हे नातं सारंच मनाला निशब्द करणारं आहे. श्री स्वामी समर्थांचे आई साहेबांसोबत घेतलेले दर्शन म्हणजे माझ्या मनातले.. ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” याची आलेली प्रचितीच होत.
सदर कार्यक्रमासाठी प्रशांतसह मी सहा तारखेला दुपारीच छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. आदरणीय विष्णू दादांच्या निवासस्थानी तीन तासापेक्षा अधिक वेळ आयोजित मॅरेथॉन बैठक व सूक्ष्म नियोजन करून घेतले. दादांच्या घरचे आदरातिथ्य शब्दात कसे बांधू शकते?
विष्णूदादा म्हणजे मेहनत, कल्पकता व समायोजन यांचा त्रिवेणी संगमच. गेल्या तीन महिन्यापासून विष्णू दादा, राहुलसर यांच्या खांद्याला खांदा लावून तन, मन धनाने झिजत होते. या आयोजनात त्यांचे योगदान, मेहनत त्याग, सेवा सारं काही केवळ मराठी भाषा सक्षमीकरण्यासाठीच्या संकल्प सिद्धीसाठीचे योगदान होते. दादा मितभाषी, प्रेमळ आहेत व कर्तव्यपरायणचे दुसरे नाव आहेत. आदरणीय विष्णूदादा आपल्या या योगदानास माय मराठी चिरंतर मनात ठेवील हा माझा विश्वास आहे.
आयोजन समितीचे अजून एक महत्त्वाचे नाव म्हणजे माझे मोठे बंधूतुल्य उद्योजक ‘विजयदादा शिर्के’.
अचानक बाबांच्या सोडून जाण्याने विजय दादांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. तरी असता धीरोदात्त वृत्तीने दादा सहा तारखेच्या रात्री दीड वाजेपर्यंत कार्यस्थळी होते. दुसऱ्या दिवशी तेराव्याचा कार्यक्रम असतानाही आपल्या कर्तव्य भावनेतून त्यांची उपस्थिती आम्हास बळ देत होती. विजय दादा म्हणजे स्वतःमधील स्व नेहमीच बाजूला ठेवून ‘मराठीचे शिलेदार’ समूहाशी तत्पर राहणारं व्यक्तिमत्व. यानिमित्तानं विजयदादांच्या निवासस्थानी दिलेली सांत्वनपर भेट..आई व ताईंसोबतचा संवाद. रूपाली वहिनीचे स्मितहास्य सारं काही संस्मरणीयच. दादा सदैव आपल्या ऋणात….!!
आयोजन एक समितीचे सदस्य व प्रमुख अतिथी ए.बी. पठाण सर. सरांविषयी काय बोलावं? मराठी भाषा हाच ज्यांचा ध्यास आणि श्वास आहे आणि जे नेहमी मराठीच्या कल्याणासाठी शिव विचारांच्या संकल्पनेतून कार्य करतात असे अकिल पठाण सरांचे निर्मळ मन नेहमीच या कार्यक्रमासाठी पुढे येत होते. वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व याचा तिहेरी संगम सरांमध्ये मी पहिला. सर आपल्या वाणीस त्रिवार वंदन. आपल्या मुखातून बाहेर पडणारे शब्दफुले त्याचा सडा नेहमी माझ्यासह तमाम मराठी मनांच्या अंतःकरणात घर करून राहील. आपले योगदान निश्चितच अनमोल आहे. खास करून मुख्य अतिथींच्या नियोजनातले आपले कौटुंबिक संबंध या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित झालेत. आदरणीय काळे साहेबांशी असलेलं आपलं भावतुल्य नातं खरंच आम्हास अभिमानास्पद आहे.
अजून एक आयोजनातलं महत्त्वाचं नाव म्हणजे माझी लहान बहीण ‘वर्षा मोटे पंडित’.
आली जरी कष्टदशा अपार.
न टाकी धैर्य तथापि थोर…
खरे तर वर्ष म्हणजे सोशिकता, सहनशीलता यांचे दुसरे नाव… स्वतःचे डोंगराएवढे दुःख बाजूला ठेवून गेल्या तीन महिन्यापासून साहित्य सेवेसाठी ती मेहनत घेत होती. औक्षण, दिप प्रज्वलन, स्वागतसखी, स्टेजवरची सजावट सार काही तिने सांभाळलेलं होतं. स्वराजचा सुंदर पोवाडा व तुझे सूक्ष्मनियोजन मनाला भावून गेले. तुझ्या लेखणीचं कौतुक आणि तुझ्या कर्तृत्वाला मनापासून सलाम..आभारीय शब्द सुमनांची तुझ्यावर मुक्त उधळण..!!
कार्यक्रमांच्या मुख्य अतिथींच्या यादीमध्ये आदरणीय राहुल सरांनी जोडलेलं एक नाव म्हणजे समूहाची मुख्य परीक्षक व सहप्रशासक आणि माझी सखी स्वाती मराडे. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेली माझी स्नेहवेल. माझ्यावर सतत प्रेमवर्षाव करणारा मेघ..आभाळागत विशाल व धरित्रीगत उदार मन असलेल्या स्वातीचा स्वभाव खूप गोड आहे. आणि तिची लेखणीही दर्जेदारच. या सर्व निर्मितीमध्ये तिचे योगदान कौतुकास्पद आहे विशेष करून अनेक काव्यसंग्रहांना प्रस्तावना, शुभेच्छा, विशेषांक यात अमूल्य सहकार्य स्वातीने केले आहे. तसेच सोबतच मी अत्यंत नम्रपणे उल्लेख करू इच्छिते आमच्या सर्व सहप्रशासक टीमचा. विशेष करून विष्णू संकपाळ , स्वाती मराडे, तारका रुखमोडे, शर्मिला देशमुख , संग्राम कुमठेकर, प्रतिमा नंदेश्वर. सर्व मराठी सारस्वत मंडळीकडून साहित्य जमा करणे, त्याची विभागणी करणे, या सर्व जबाबदारी आपापसात वाटून घेतल्या होत्या आणि या एकत्रित प्रयत्नाचे फळ म्हणजे हा दैदिप्यमान कार्यक्रम होय. तेव्हा या सर्वांप्रतीही मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते व यांच्या लेखणीस अधिक बळ मिळत राहील अशी प्रार्थनाही करते.
‘पण थोडं काही माझ्या मनाच्या अंतरंगातून…’
‘मराठीचे शिलेदार’ समूहाची नाळ गेली अनेक वर्षे जिच्या कार्यकर्तृत्वाशी जुळलेली आहे, अशी माझी प्रिय वैशू ताई अर्थात वैशालीताई अंड्रस्कर. प्रकृती अस्वस्थ आणि कौटुंबिक जबाबदारी त्यामुळे या कार्यक्रमापासून ताई शरीराने थोडीशी दूर होती मनाने मात्र अजिबात नाही. गेले तीन महिने सातत्यपूर्ण घडणाऱ्या सर्व घटनांची ती अप्रत्यक्ष साक्षीदार होते. वेळोवेळी मला मार्गदर्शन करत होती. धीर देत होती आणि सांभाळूनही घेत होती. प्रिय ताई तुझी अनुपस्थिती काळीज चिरत होते कित्येक वेळा हॉलमध्ये माझी नजर भिरभिरत होती, तुला शोधत होती आणि पापण्यांच्या कडा अलगत ओलावतही होत्या. ‘शिलेदारी तुझे योगदान कधीही मोजता येणार नाही’. तुझ्या निरामय आयु आरोग्यासाठी शिवचरणी मनापासून प्रार्थना.
सर्व मराठी रसिकांच्या काळजाचा वेध घेणाऱ्या या कार्यक्रमासाठी ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा मनापासून अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळात पुन्हा एकदा आपण सर्वजण माय मराठीच्या संकल्प सिद्धीच्या कार्यात सहभागी होऊया. आदरणीय राहुल सरांनी आरंभलेला हा माय मराठीच्या सक्षमीकरणाचा यज्ञ सतत तेवत ठेवूया याच संकल्प सिद्धीसाठी हार्दिक शुभेच्छा….!!
सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
कार्यकारी संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’





