तिसरीचे पोरं म्हणाताहेत, ‘हाफ चड्डी नको ‘फुल पँंट’ हवा’..!!
समिती म्हणतेय बारक्यांनो चड्डीतच रहा

तिसरीचे पोरं म्हणाताहेत, ‘हाफ चड्डी नको ‘फुल पँंट’ हवा’..!!
पहिल्याच दिवशी चड्डीवरून ताणतणाव
समिती म्हणतेय बारक्यांनो चड्डीतच रहा
पोरं म्हणताहेत, ‘आम्हाला चड्डीची लाज वाटतेय’
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड: मराठवाड्यात नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून (16 जून) सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पण, या दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका चिमुकल्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यंदा तिसरीत गेलेल्या या मुलाने आता चड्डी नको. घालायला लाज वाटते. पँट हवी, अशी मागणी केली. चिमुरड्याचा हा व्हिडीओ जिल्हाभर चांगलाच व्हायरल झाला. आता, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
विद्यार्थ्याची मागणी चर्चेत-
उस्माननगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी लोकप्रतिनिधीही पोहोचले होते. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यादरम्यान विद्यार्थ्यांना गणवेशाचेदेखील वाटप करण्यात आलं. गणवेशात शर्टसोबत चड्डी मिळाली. यावर विद्यार्थ्यांनी “आम्हाला हाफ चड्डी नको फुल पॅन्ट द्या. हाफ चड्डी घालायला लाज वाटते,” अशी मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार होईल-
विद्यार्थ्यांच्या या मागणीवर शिक्षण अधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी बचत गटांना गणवेश शिलाईचं काम दिल्यानं सर्व बट्ट्याबोळ झाला होता. आता यावर्षी शालेय व्यवस्थापन समितीला अधिकार देण्यात आले आहेत. जर विद्यार्थ्यांची मागणी असेल तर पँट शिवून देऊ”. परंतु समिती म्हणतेय पोरं बारके आहेत तर चड्डीतच बरे.
विद्यार्थ्यांच्या स्वागताला सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिधींची हजेरी-
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताला पालकमंत्री, आमदार, खासदार, तहसीलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी हे त्या त्या भागातील शाळेत पोहोचले होते. उस्माननगर येथील शाळेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुलांचे स्वागत केले. तसेच, त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण चड्डीचा विषय राज्यभर गाजला.