“महाराज, तुमचे विचार ऐकले जातात, पण पाळले जात नाहीत,’म्हणून पुन्हा येऊ नकाच”; प्रशांत ठाकरे
'शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण'

“महाराज, तुमचे विचार ऐकले जातात, पण पाळले जात नाहीत,’म्हणून पुन्हा येऊ नकाच”; प्रशांत ठाकरे
‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण’
दिनांक 19 फेब्रुवारी… शिवजयंती…महाराज केली ना आम्ही शिवजयंती साजरी! इतिहास आणि विचारांपेक्षा डीजे, प्रचंड आवाज आणि घोषणाबाजी ऐकली…! साधेपणाऐवजी बॅनरबाजी, स्पर्धात्मक मिरवणुका आणि दिखावा पाहिला…!! शिस्तीऐवजी वाहतूक अडथळे, गोंधळ आणि सार्वजनिक गैरसोय अनुभवली….! समाजसेवेऐवजी फक्त उत्साहाचे प्रदर्शन मांडलेले पाहिले. एकतेच्या संदेशाऐवजी भेद, तणाव निर्माण करणारी भाषा सर्वत्र दिसली…!! ग्रंथवाचन, व्याख्याने याऐवजी फोटो, रील्स आणि प्रसिद्धीची हाव तर काही ठिकाणी बीभत्स नृत्यही पाहिले.
छत्रपती शिवाजी महाराज… शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक तेजस्वी पर्व नाहीत, तर स्वराज्य, स्वाभिमान, शिस्त, न्याय आणि लोककल्याण यांची जिवंत संहिता आहेत हे लोक पूर्णपणे विसरले. म्हणून जड अंत:करणाने राजे आपणास हाक घालून म्हणावेसे वाटते, “महाराज, पुन्हा येऊ नका!” कारण आज आपण ज्या पद्धतीने तुमची जयंती साजरी करतो, ती तुमच्या विचारांची नव्हे, तर केवळ घोषणांची मिरवणूक झाली आहे.
एकेकाळी शिवजयंती म्हणजे विचारांची मशाल होती. आज ती अनेक ठिकाणी आवाजांची स्पर्धा, फलकांची झुंबड, आणि क्षणिक उन्मादापुरती मर्यादित राहिली आहे. ‘महाराजांचा आदर्श म्हणजे शिस्त, पण जयंतीच्या दिवशीच नियम पायदळी तुडवले जातात’. महाराजांचा मार्ग म्हणजे संयम, पण उत्सवात उन्मत्तपणा दिसतो. महाराजांचा धर्म म्हणजे प्रजाहित पण कार्यक्रमांचे केंद्र अनेकदा प्रसिद्धी आणि राजकारण बनते.
राजे, तुम्ही स्त्रीचा सन्मान राजधर्म मानला. आज मात्र तुमच्या नावाखाली होणाऱ्या काही कृत्यांमुळे तोच सन्मान दुखावला जातो. तुम्ही तलवार उचलली ती अन्यायाविरुद्ध, पण आज ती केवळ प्रतिक राहून, अन्याय पाहूनही हात खालीच राहतात. तुम्ही किल्ले बांधले ते स्वराज्य टिकवण्यासाठी तर आज आपले विचारांचे किल्ले मात्र उघड्या डोळ्यांनी ढासळताना आम्ही पाहत आहोत.
शिवजयंती म्हणजे मिरवणूक नव्हे….ती मनातली मिरवणूक असायला हवी. घोषणांपेक्षा आचरण मोठे, ढोल-ताशांपेक्षा विवेक मोठा, आणि एका दिवसाच्या उत्सवापेक्षा आयुष्यभराचा आदर्श मोठा हे विसरत चाललो आहोत. त्यामुळेच वाटते, राजे, पुन्हा जन्माला येऊ नका! कारण आजच्या समाजात तुमचे विचार ऐकले जातात, पण पाळले जात नाहीत. तुमचे नाव घेतले जाते, पण तुमचा मार्ग सोडला जातो. खरे तर, राजे, तुम्हाला पुन्हा जन्म घेण्याची गरजच नाही. जर प्रत्येक घरात न्याय जन्माला आला, जर प्रत्येक मनात शिस्त रुजली, जर प्रत्येक कृतीत प्रजाहित दिसले आणि जर शिवजयंती एक दिवसाचा उत्सव न राहता, रोजच्या वागण्यात उतरली तर तुम्ही आमच्यातच जिवंत असाल.
म्हणूनच, महाराज, पुन्हा येऊ नका…
आम्हीच तुमचे विचार जन्माला घालू,
आम्हीच तुमचा वारसा जगू,
आणि तेव्हाच खरी शिवजयंती साजरी होईल.
आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल पाटील यांनी “महाराज पुन्हा येऊ नका” हा विषय दिला. सर्व कवी कवयित्रींनी आपापल्या परीने विषयाला योग्य तो न्याय दिला. काव्य लिखाणासाठी विषय देण्याचा आदरणीय राहुल सरांचा जो हातखंडा आहे त्यास तोड नाही. प्रत्येक वेळेस सर वेळ काळ याच भान ठेवून वास्तववादी कविता लिखाण्यास प्राधान्य देतात. ते पुन्हा एकदा अनुभवास आले. सर्वांनी खूप छान लिहिलं. परंतु आदरणीय ‘बळवंत डावकरे’ दादांची ही काव्य संपदा मला खूपच भावली.
“इथली विदारक परिस्थिती पाहण्या
महाराज पुन्हा येऊ नका…!,
स्वार्थाने बरबटलेल्या मावळ्यांचा
भार शिरावर तुम्ही घेऊ नका..”
तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा मनापासून सर्वांचे धन्यवाद. असेच लिहत रहा मराठी साहित्यास आपणा सारख्या लेखणीची नितांत गरज आहे. मातृभूमीच्या अर्थात मराठी भाषेच्या रक्षणास लेखणी धावती ठेवणे हीच छत्रपती शिवरायांना मानवंदना असेल.
प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली, दीव दमण
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



