‘नेमेचि येतो पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘नेमेचि येतो पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
निसर्गात घडणारी प्रत्येक गोष्ट, एक अद्भूत अगम्य कोडे आहे. सर्व गोष्टींचे चक्र किती अचूक अव्याहतपणे चालू आहे पाहा. कोण असेल याचा सूत्रधार? दिवसरात्र, अमावस्या पौर्णिमा, भरती ओहोटी, पानगळ पालवी, थंडी गरमी, हिवाळा पावसाळा, आणि अनेक ऋतुनुसार होणारी नैसर्गिक स्थित्यंतरे आपल्याच गतीने चालू असतात. म्हणूनच कुणीतरी म्हंटले असावे की, ‘नेमेचि येतो पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’. वर्षाऋतु अर्थात पावसाळा. हा जेव्हा येतो तेव्हा वैशाख वणव्यात पोळून निघालेल्या धरणीचा कण कण अत्तरगंधात न्हाऊन निघतो आणि अवघी वसुंधरा नवा सृजनसोहळा मांडण्यास सज्ज होते. मात्र जेव्हा हा लहरी होतो तेव्हा, कधी वेळेत, कधी मुदतपूर्व, तर कधी घोर प्रतिक्षा करायला लावत हा असा काही बरसतो की, कधी तृप्तीच्या परिसिमेची अनुभूती, तर कधी आसवांच्या पुराची मरणभिती दाखवून शांत होतो.
आजच्या विज्ञान युगात मात्र. प्रचंड लोकसंख्येने वसलेल्या शहरात याच्या पहिल्याच दमदार फेरीने अवघे जनजीवन प्रभावित होते. वार्याच्या वेगाशी स्पर्धा करणारी वाहतूक काही क्षणात गारद होते. आणि आधुनिक यंत्रणेचे वाभाडे चव्हाट्यावर मांडले जातात. पावसाळ्याच्या पूर्वसंध्येवर शहरातील भूमिगत गटारे, नाले वेळीच साफ न केल्याने, प्रचंड केरकचरा अडकून पाण्याचा निचरा रोखला जातो. परिणामी वाट फुटेल तिकडे सांडपाणी मिश्रीत पावसाचे पाणी दुतर्फा वाहू लागते. सखल भाग तुंबून जातो. ज्यामध्ये जीवघेणे अपघात होतात. जिवित वित्तहानी होते आणि दुसर्या दिवशी संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढत वृत्तपत्रांचे रकाने भरले जातात नि मग “नेमेचि होते हेळसांड…” असे उपरोधिकपणे बोलून वेळ मारून नेली जाते. हे एक दुष्टचक्र नाही का?
अस्मानी लाट
बाधित वहिवाट
अश्रूंचे पाट
काल ‘शुक्रवारीय हायकू: स्पर्धेसाठी आदरणीय राहुल दादांनी या पार्श्वभूमीवर दिलेले चित्र अत्यंत बोलके आहे. एका फूटपाथच्या बाजूने कोंडलेले सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. त्यातच एका तोल जावू पाहणार्या व्यक्तिला दुसरा व्यक्ती सावरतो आहे. हे चित्र एकाच वेळी अनेक पैलू दर्शवते. नैसर्गिक संकट, मानवी हलगर्जीपणा, सुस्त यंत्रणा, मदतीचा हात, बेजबाबदार नागरीक, कचरा निर्मूलनातील उदासीनता, भावी संकटांना आमंत्रण, इत्यादी पैलूंवर हायकू लिहिताना हे सर्व कंगोरे सतरा अक्षरात बद्ध करताना, मार्मिक ताशेरे, धोक्याचे इशारे, प्रबोधनाचे वक्तव्य, यंत्रणेवर फटकारे असे आशय अपेक्षित होते.
सर्व हायकूकारांनी सुरेख लिहिले आहे मात्र. एकसूरीपणा जाणवतो तो टाळून शब्दांच्या पलिकडले शब्दात आणण्याचा कल्पक प्रयत्न करावा. कारण हायकू म्हणजे चारोळी किंवा कविता नव्हे. हा वेगळा प्रकार वेगळेपणाने मांडण्याचा प्रयत्न करावा. आज मला परीक्षण लिहायची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहूल दादांचे आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह