Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मानवनिर्मित ‘लाकडी खोपा’ फक्त चित्रातून जपा; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 0

मानवनिर्मित ‘लाकडी खोपा’ फक्त चित्रातून जपा; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

अग्गं ये सुमे… ऐकतीय का.. ? बाहेरच्या सोप्यात गृहपाठ करत बसलेल्या सुमीच्या कानावर आईचे शब्द पडले, तशी ताडकन सुमी घरात धावली… काय गं आये.. काय झालं, तशी लुगड्याचा गुडघ्याच्यावर घातलेला घट्ट कासोटा, हातात भांगलणीचं खुरपं, काखेत तिरवडं, डोस्क्यावर इरलं आणि तोंडात मशेरीचा तोबरा भरलेली आई म्हणाली.. सुमे.. दुपारच्याला साळतनं आल्यावर चुलीवर कोरड्यास हाय, भानूसीवर थाबड्यात भाकरी हाय. आडोळाला वाईच खाऊन घे. वायलावर दूध ठेवलय..ते दिवळीत झाकून ठेव. समदं घर आवरून घे. भांडीकुंडी घासून ठेव.. आणि ऐक, चूलीत शेळकुंड घालून ठेव. परड्यातनं छप्परातली लाकडं आणून चुलीवर ठेव..राखेच्या उबीनं जरा शेकतील.. म्हंजी सांजच्याला भिगीद्यान पेटतील.. एवढं सांगून.. अगं ये जने.. चल गं लवकर.. असं शेजारच्या जनाबाईला ओरडून हाक मारतच आईने घराबाहेर धो धो कोसळणार्‍या पावसात धाव घेतली.. तशी सुमी म्हणाली.. आये.. मी करते गं समदं, तू लवकर घरला ये.. चहा करून ठेवती….!!

मंडळी वरील संभाषण ग्रामीण, कोकण भागातील कुटुंबातले आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल.. जुलै महिन्यात सतत कोसळणारा संततधार पाऊस आणि उभ्या पावसात दिवसभर भातशेतीत कामे करणारे खेडूत हे चित्र सगळीकडे पहायला मिळते. घरे साधीच पण ऐसपैस असतात. सैपाकघर, माजघर. लगी, सोपा, जनावरांसाठी गोठा. आतल्या आत माळा वगैरे मांडणी असते. आणि परसाकडील बाजूस घराच्या भिंतीला लागूनच किंवा जागा असल्यास एक स्वतंत्र झोपडी वजा छप्पर असते. अर्धवट चिर्‍यात बांधलेल्या भिंती. वरती आडवे उभे बांबूचे वासे आणि त्यावर कौले, अर्धगोल खापर्‍या, किंवा नारळाच्या झावळ्या अंथरलेल्या असतात.

या छप्पराचा मुख्य उपयोग म्हणजे. जवळपास तीन चार महिने चालणार्‍या पावसाळ्यात वाळलेला लाकूडफाटा. शेणाच्या गोवर्‍या, तुरकाट्या, जोखाट्या, आणि जनावारांची वैरण सुद्धा एका बाजूला रचून ठेवलेली असते. भाताचे पिंजार हमखास असते. ते उबदार असल्याने त्यातच एखादी मांजर बाळंत होऊन पिल्लांना सांभाळत असते. एखाद्या कोपर्‍यात कुत्र्याने स्वतःला जागा करून घेतलेली असते. कोंबड्या कुठेतरी अंग चोरून बसलेल्या असतात. वरती एखाद्या फटीत चिमणा चिमणीचा संसार सुद्धा असतो. लहान मुले याच छपरात लपाछपीचा खेळ खेळत असतात.

काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेसाठी आदरणीय राहुल दादांनी जे चित्र दिले आहे ते कोकण भागातील घरामागच्या अशाच एका छप्पराचे आहे. ज्याचा वापर वरती वर्णन केल्याप्रमाणे होत असतो. खेडेगावात अशी छप्परे सर्रास बघायला मिळतात. घराचा तो एक अविभाज्य भागच असतो. घरात अडगळ वाटणार्‍या अनेक वस्तू. शेतीची अवजारे. हत्यारे, दोर्‍या, दावण्या,कुर्‍हाड, कोयते, पहार, फावडे, गोणपाटे यात दाटीवाटीने विसावलेली असतात.
एकंदरीत ग्रामीण जीवनाचे प्रतिनिधीत्व करणारे हे चित्र एकेकाळची अत्यावश्यक गरज होती.

मात्र “कालाय तस्मै नमः” या उक्तीप्रमाणे खेडीपाडी आज कूस बदलत आहेत. चूलीच्या जागेवर गॅस आला आहे. शेणा मातीच्या जमीनी जाऊन चकचकीत फरशा आल्या आहेत. घरे आरसीसी बनली आहेत.. त्यामुळे चित्रात दिसणार्‍या झोपड्या भावी पिढीसाठी एक दंतकथाच असणार आहे..!नेहमीप्रमाणेच आजही समस्त शिलेदारांनी हायकू रचनांची बरसात करून विषयाला न्याय देण्याचा छान प्रयत्न केला सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा..!!!

विष्णू संकपाळ बजाजनगर. छ. संभाजीनगर
सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे