फसव्या पिढीने लुकलुकत जिद्दीचा काजवा शोधणे हे खऱ्या जीवनातलं स्थैर्य: सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
फसव्या पिढीने लुकलुकत जिद्दीचा काजवा शोधणे हे खऱ्या जीवनातलं स्थैर्य: सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
सप्टेंबर २०२५ नेपाळच्या इतिहासातला सर्वात ऐतिहासिक महिना…!! सोशल मीडियावर घातलेला प्रतिबंध आणि देशात वाढलेला भ्रष्टाचार याच्या विरोधात जेन-झी द्वारा आंदोलन करण्यात आले. यात सरळ राज्यकर्त्यांना लक्ष केलं गेलं. अन् “न भूतो न भविष्यती”अशी क्रांती घडवत विद्यमान सरकार या तरुणाईने उलथवलं. डिजिटल युगातील सामाजिक व राजकीय बदलाचं हे पहिलं उदाहरण ठरलं. ही तरुणाई, ही नवी पिढी कशी आहे नेमकी ?
आक्रमक पण आहे… वेगवान पण आहे.समजदार पण आहे आणि फसवी सुद्धा आहे. खरंतर तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेल्या या पिढीच्या हातात आज सर्व काही आहे. लॅपटॉप, टॅब, मोबाईलच्या स्क्रीनवर चमकणारी लाईक्सची फुलं त्यांना खऱ्या यशापेक्षा अधिक दिपून टाकतात हे सत्य आहे. येथे…. हल्ली कौशल्यापेक्षा दिखावा…. विचारांपेक्षा द्वेष आणि सत्यापेक्षा क्षणिक प्रदर्शन… यावर सहज विश्वास ठेवणारे हे लोक.
“दिसतं तसं नसतं” हे आपल्या काळातील वाक्य त्यांनी कालबाह्य करतौ “दिसणं म्हणजेच असणं” असं मनात ठरवलेलं असतं .अर्थात त्यामागे काळाचे काही डावही कारणीभूत आहेत त्यात शंकाच नाही. मग वेग, स्पर्धा, झगमगाट, तुलना, असुरक्षितता ही प्रलोभने त्यांना अस्वस्थ करतात. त्यांना हे समजवणारं कुणीतरी हवं आहे आज गरज आहे ती पहाटेच्या प्रकाशाच्या प्रामाणिकतेची. पावसाच्या थेंबासारख्या स्वच्छ मनाची आणि मातीसारख्या स्थैर्याची. दिसणं, “दाखवणं आणि फसवणं म्हणजे जीवन नव्हे तर लुकलुकत जिद्दीचा काजवा शोधणे हे खऱ्या जीवनातलं स्थैर्य आहे”, हे या नव्या पिढीला समजवावं लागणार आहे. ही पिढी जिद्दी असली तरी क्रांती करण्याचं बी जन्मजात त्यांच्यात रोवले गेलेले आहे, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल.
‘फसवी पिढी’ हा सामाजिक मंथनास प्रवृत्त करणारा विषय आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय ‘राहुल सरांनी’ दिला. नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक विषयाला सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन पैलू असतात. परीक्षणार्थ रचना वाचताना यातील सकारात्मकता कुठेतरी लोप पावलेली मला दिसली. अपेक्षा हीच की विषयाच्या दोन्ही अंगांना जर आपण स्पर्श केला तर आपलं काव्य दर्जेदार ठरेल. आपण सर्वांनी विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यात शंका नाही तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा. धन्यवाद.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



