‘बालमनाचा कोपरा चिंब करणारी पावसाची सर’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘बालमनाचा कोपरा चिंब करणारी पावसाची सर’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
” ये ग ये ग सरी, माझे मडके भरी ,
सर आली धावून, मडके गेले वाहून “
आपण बालपणापासून ऐकत आलेले हे बोबडं गीत कितीतरी आठवणींना उजाळा देऊन जाते. अगदी बालमनाच्या कोपऱ्यात रेंगाळत राहिलेल्या आठवणींना ही ‘सर’ पावसात पुन्हा पुन्हा भिजवण्याचे काम करत असते. पूर्वीच्या काळी खूप पाऊस पडायचा. 21 -21 दिवस संततधार पाऊस चालू असायचा. सरीवर सरी येणे ,सरीचे धावून येणे काय असते हे बालपणीच्याच काळी अनुभवलेले. सध्या “येरे येरे पावसा, तुला देतो पैसा” अशी किती जरी आर्त हाक दिली तरी पाऊस सध्या वंचितच ठेवतो आहे. बालपणी गाऱ्या भिंगोऱ्या, येरे येरे पावसा म्हणून भरगच्च काळ्याभोर ढगाखाली नाचताना, गिरट्या घेत घेतलेला आनंद अवर्णनीयच! आज त्या आनंदापासून आजची चिमुकली दुरावली तर नाहीत ना ? होय, दुरावलेच आहेत.
कारण, सरीवर सरी येणे हा प्रकार आजच्या बालपणाला दिसतच नाही आणि पूर्वीसारखे निसर्गाच्या बदलत्या रूपानुसार मोसमी खेळ खेळायला आजच्या चिमुकल्यांना वेळ तरी कुठे आहे. हरवले आहेत ते मोबाईलच्या दुनियेमध्ये… व्हिडिओ गेम, अभ्यास, ट्युशन, ऑनलाईन क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस अशा विविध क्लासमध्ये. त्यांना ढगांकडे पाहायला वेळ आहे की नाही हाच प्रश्न. राहिलेल्या वेळांमध्ये ते विरंगुळा करताना आढळतात आपल्या मोबाईल मध्ये आभाशी दुनियेमध्ये , काल्पनिक जगामध्ये, या बालपणाला काय म्हणावे?
कितीतरी आनंदाला मुकलेले हे बालपण पुन्हा बहरायचे असेल, तर पालकांनी ही जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणे, पर्यावरण संरक्षण- संवर्धन करणे, वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन त्यांच्याकडून करून घेणे तसेच शिक्षकांनी शाळेत हे उपक्रम राबवून घेणे खूप आवश्यक आहे. तरच उद्याचे सुंदर आणि सफल जीवन, निरोगी जीवन पुढच्या पिढीच्या नशिबात असेल. नाहीतर धावून येणारी सर लुप्त व्हायला वेळ लागणार नाही.
आज मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेमध्ये राहुल दादांनी ‘सर आली धावून’ हा विषय दिला आणि या सरीबरोबर सरसर धावणारे बालपण शिलेदारांनी मांडण्याचा निखळ प्रयत्न केला आहे. आज बालकाव्यामध्ये जणू पावसाच्या शब्दरूपी सरीवर सरी पडत होत्या. बालकाव्याचे काही नियम पाळत सर्वांनी लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. यापेक्षाही सुंदर बालकाव्य लिखाणासाठी सर्व शिलेदार बंधू भगिनींना भरभरून शुभेच्छा…!! काय मग, चला तर पडणाऱ्या सरीवर सरी झेलूया अंगावर आणि घेऊया परत बालपणीचा आनंद येताय ना मग पावसात भिजायला? ‘राहुल’ दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण! धन्यवाद…!!!!
शर्मिला देशमुख घुमरे, बीड
मुख्य परीक्षक, लेखिका, कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह


