आरोग्य व शिक्षण
बरसून जा..
0
5
6
8
0
6
बरसून जा..
काळ्याशार मातीत
बीज स्वप्नांचे पेरले
घामाच्या थेंबाथेंबात
उद्याचे दिवस वेचले..
नांगर होता हातामध्ये
विश्वास तुझ्याचवरती
सार्थकी लागेल मशागत
हिरवीगार होईल धरती..
बाबा, यंदा पीक येईल?
लेकरू जेव्हा विचारी
उत्तरा आधी डोळ्यांत
दाटून येई वेदना भारी..
आई उपाशीपोटी निजून
घास मुलां बाळांना देते
भुकेची नि:शब्द ज्वाला
अंतरी धगधगत राहते..
नकोत नभा दयेचे शब्द,
चार थेंब मायेचे बरसू दे
आणि घामाच्या धारांना
जीवनाचा अर्थ मिळू दे..
बरस असा की मातीतून
अंकुर ही गातील गाणी
अन्नदात्याच्या ओठांवरती
फुलावी नवजीवन वाणी..
नको वैभव, नको संपत्ती,
नको नको सोनं नानं चांदी
फक्त मनसोक्त बरसून जा
तीच ठरेल सुखाची नांदी…
सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह
0
5
6
8
0
6
