Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

आनंद या जीवनाचा… सुगंधापरी दरवळावा..!!

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

0 5 6 8 0 0

आनंद या जीवनाचा… सुगंधापरी दरवळावा..!!

‘आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा’ या गीतातील शब्द कानावर पडतात आणि मन प्रसन्न होऊन जाते. या एकाच ओळीत जीवन जगण्याचे सुंदर तत्त्वज्ञान दडलेले आहे. परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांत अनमोल देणगी म्हणजे जीवन. संतांनी सांगितल्याप्रमाणे चौऱ्यांशी लक्ष योनींनंतर लाभलेला हा मानवजन्म एकदाच मिळतो. म्हणून ‘हा जन्म आनंदाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने जगणे, हेच जीवनाचे खरे सार आहे.’

आज प्रत्येक जण आनंदाच्या शोधात धावत आहे. कुणाला तो पैशात दिसतो, कुणाला पद-प्रतिष्ठेत, तर कुणाला ऐश्वर्यात. पण आनंद हा कोणत्याही वस्तूचा किंवा परिस्थितीचा कैदी नसतो. तो मनाची एक सुंदर अवस्था आहे. ‘समाधानाच्या मातीत उमलणारे ते सुगंधी फूल आहे.’
संत तुकाराम महाराज म्हणतात….

आनंदाचे डोही आनंद तरंग,
आनंदचि अंग आनंदाचे.’

हा आनंद बाहेर शोधून मिळत नाही; तो आपल्या अंतःकरणात जागवावा लागतो. एक राजा सतत दुःखी असायचा. राज्य, संपत्ती आणि वैभव असूनही त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते. एका संतांनी त्याला एका गरीब शेतकऱ्याकडे नेले. दिवसभर कष्ट करूनही तो आनंदाने गाणे म्हणत घरी परतत होता. राजाने त्याच्या आनंदाचे रहस्य विचारले. शेतकरी हसून म्हणाला, “माझ्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा, जे आहे त्याबद्दल मी रोज देवाचे आभार मानतो.” त्या एका वाक्यात आनंदाचे रहस्य दडलेले होते. ‘कृतज्ञतेतूनच खरा आनंद जन्माला येतो.’

परिस्थितीपेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. ‘अर्धा भरलेला ग्लास कुणाला अर्धा रिकामा वाटतो, तर कुणाला अर्धा भरलेला. परिस्थिती तीच असते; बदलतो तो विचार.’ म्हणूनच ‘आनंद बाह्य परिस्थितीत नसून आपल्या मनाच्या स्वीकारात असतो.’ आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मोठ्या आनंदाच्या शोधात धावत राहतो; पण छोट्या-छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो. आईच्या हातचा गरम चहा, मित्राचा प्रेमळ फोन, मुलांचे निरागस हास्य, एखादे आवडते पुस्तक, निसर्गातला फेरफटका, पक्ष्यांचा किलबिलाट किंवा कुणाला केलेली छोटीशी मदत यांतचं जीवनाचा खरा आनंद दडलेला असतो. हिंदी चित्रपट “आनंद” मधील राजेश खन्ना यांचा एक संवाद आजही जीवनाचा अर्थ सांगून जातो “ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं.” खरंच, आयुष्य किती वर्षे जगलो यापेक्षा ते किती अर्थपूर्ण, समाधानाने आणि आनंदाने जगलो, हे अधिक महत्त्वाचे आहे.

आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला तर तो दूर उडून जातो; पण आपण वर्तमानात जगलो, मन समाधानी ठेवले आणि प्रत्येक क्षणाचा स्वीकार केला, तर तो अलगद आपल्या आयुष्यात येऊन विसावतो. चला तर मग, ‘प्रत्येक दिवसाचे हसतमुखाने स्वागत करू या. ‘आपल्या चेहऱ्यावरचे एक हास्य दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकते.’ ‘आनंद ही अशी संपत्ती आहे की ती वाटल्याने कमी होत नाही; उलट अनेकपटींनी वाढते.’

‘आनंदाचा दीप अंतरी अखंड तेवत राहू दे,’
‘प्रेमाचा सुगंध जगभर अलगद दरवळू दे.’
‘हसत जगू, हसवत जगू हा जीवनाचा ध्यास असू दे’,
‘प्रत्येक श्वासागणिक आनंदाचा उत्सव फुलू दे…!’

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे