सैनिक कल्याण निधीसाठी अॅड. प्रविण ठाकूर यांनी दिला एक लाखांचा धनादेश!
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

सैनिक कल्याण निधीसाठी अॅड. प्रविण ठाकूर यांनी दिला एक लाखांचा धनादेश!
स्वतःच्या वाढदिवशी निभावले सामाजिक दायित्व; देशरक्षकांप्रती कृतज्ञतेची अनोखी परंपरा कायम
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि २१) देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत मातृभूमीच्या सुरक्षेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अॅड. प्रविण ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी रायगड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल ₹१ लाखांचा धनादेश सुपूर्द करून सैनिकांविषयीचा आदर आणि सामाजिक उत्तरदायित्व जपले. सैनिक कल्याणासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील व्यवस्था माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या पुनर्वसन आणि कल्याणासाठी कार्यरत असते.
अॅड. प्रविण ठाकूर यांनी वाढदिवस केवळ शुभेच्छा, सत्कार आणि उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजोपयोगी उपक्रमांशी जोडण्याचा संकल्प अनेक वर्षांपासून जपला आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही सैनिक कल्याण निधीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देत त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला.
यावेळी उपस्थितांनी त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. देशाच्या संरक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहून कठोर परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
अॅड. प्रविण ठाकूर यांनी यावेळी सांगितले की, “आपण सुरक्षित आहोत कारण देशाच्या सीमेवर आपले सैनिक जागरूकपणे उभे आहेत. त्यांच्या त्यागाची परतफेड कधीच होऊ शकत नाही; मात्र समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.”
दरवर्षी वाढदिवसानिमित्त सैनिक कल्याण निधीसाठी आर्थिक मदत करण्याची त्यांची ही परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजातील इतरांनीही अशा समाजहिताच्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असा संदेश या कृतीतून दिला गेला आहे.
यावेळी सहा. जिल्हा सैनिक अधिकारी सुभेदार शेख अब्दुल मजीद (निवृत्त) , सुभेदार अभिजीत दशरथ शिंदे (निवृत्त) , हवालदार विनोद ब्रीड (निवृत्त) , नायक बळीराम म्हात्रे, नायक दयाराम घासे, अपूर्वा नाईक, ॲड. काजल ठाकूर, प्रियांका प्रसाद थळे, प्रसाद थळे, नगरसेवक समीर मधुकर ठाकूर, आर. डी.पाटील, रुतुराज पाटील व इतर उपस्थित होते.



